घरमुंबईकर्जतमधील कुपोषणात धक्कादायक वाढ!

कर्जतमधील कुपोषणात धक्कादायक वाढ!

Subscribe

122 बालके एप्रिलमध्ये बाधित

तालुक्यातील बालकुपोषणाने शंभरी पार केली असून त्यात होणारी वाढ लक्षात घेऊन रायगड जिल्हा प्रशासन सतर्क झाले आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, तसेच महिला व बालकल्याण समितीच्या सभापतींनी तालुक्याला धावती भेट देऊन कुपोषित बालकांची पाहणी केली. दरम्यान, कम्युनिटी अ‍ॅक्शन फॉर न्यूट्रिशन प्रकल्पांतर्गत बालरोग तज्ज्ञ डॉक्टर तालुक्यासाठी देण्याची मागणी दिशा केंद्र या संस्थेने केली आहे.

गेल्या महिन्यात प्रकल्पांतर्गत काही भागात जाऊन अंगणवाडीमधील बालकांची तपासणी करण्यात आली होती. त्यावेळी धक्कादायक प्रकार समोर आला. गेल्या काही महिन्यात खाली आलेले तालुक्यातील लहान बालकांचे कुपोषण प्रचंड वाढले असल्याचे दिसून आले होते. ही बाब दिशा केंद्र या संस्थेच्या माध्यमातून प्रसार माध्यमांना देण्यात आली होती. त्यामुळे रायगड जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाच्या सभापती उमा मुंढे यांनी उप मुख्य कार्यकारी अधिकारी शीतल पुंड आणि कर्जत तालुक्यातील एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी यांच्यासह टेंबरे भागात जाऊन कुपोषित बालकांची पाहणी केली होती. त्यांची ही भेट गुप्त ठेवण्यात आली होती. या भेटीत अंगणवाडी सेविकांना धारेवर धरण्यात आल्याचे बोलले जाते.

- Advertisement -

त्यानंतर रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश देवरूषी यांनी ग्रामीण आणि आदिवासी भागात जाऊन कुपोषित बालकांची पाहणी करण्यासाठी अंगणवाडी केंद्रे गाठली. त्यावेळी त्यांनी स्वतः बालकांची वजने घेतली, उंची मोजली आणि अशा कुपोषित बालकांना अतितीव्र कुपोषित आणि तीव्र कुपोषित गटातून बाहेर काढण्यासाठी उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या. गेले 15 दिवस कुपोषित बालकांची तपासणी करणार्‍या दिशा केंद्र या शासनाने जबाबदारी दिलेल्या संस्थेचा अहवाल तपासला. त्यात अंगणवाडीमध्ये एकात्मिक बालविकास कार्यालयाचे प्रकल्प अधिकारी आणि पर्यवेक्षक यांच्या भेटी महिन्याला होत नाहीत, त्याचवेळी आरोग्य तपासणीदेखील वेळेवर होत नाही, असे नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे देवरूषी यांनी संबंधित अधिकार्‍यांची कानउघाडणी केली.

एप्रिल महिन्यात कुपोषणात मोठी वाढ झाल्याने सर्वांनी सतर्क राहण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांनी दिले आहेत. एप्रिल 2019 मध्ये तालुक्यात 24 अतितीव्र कुपोषित आणि 98 तीव्र कुपोषित बालके असल्याने जिल्हा प्रशासन जागे होईल, असा विश्वास देवरुषी यांनी व्यक्त केला आहे. यावेळी त्यांच्या समवेत गटविकास अधिकारी बालाजी पुरी, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सी. के. मोरे, एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी निशिगंधा भवाळ, ए. एन. पालकर व अन्य अधिकारी उपस्थित होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -