मुंबईतल्या कारागृहात कोरोनाचा विस्फोट ! इंद्राणी मुखर्जीसह ३८ महिला कैद्यांना कोरोना

indrani mukerjea
इंद्राणी मुखर्जी

महाराष्ट्रातील कारागृहांमध्ये कोरोनाचा शिरकाव झाल्याची आकडेवारी गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असतानाच, आता मुंबईतील भायखळा येथील कारागृहातही महिला कैद्यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. भायखळाच्या कारागृहात ३९ महिला कैद्यांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. या महिलांमध्ये शीना बोरा हत्याकांडात अटकेत असलेल्या इंद्राणी मुखर्जीलाही कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळेच आता कारागृहात कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे गृह विभागाचे धाबे चांगलेच दणाणले आहे. महाराष्ट्रातील कारागृहामध्ये अनेक ठिकाणी कोरोनाचा शिरकाव झाल्याची आकडेवारी काही दिवसांपासून समोर येत आहे. त्यातच आता भायखळा कारागृहाचीही भर पडली आहे. गेल्या पाच दिवसात कारागृहात कोरोनाच्या आकडेवारीत ७९ रूग्णांची भर पडली आहे. त्यामध्ये ६१ कैद्यांचा आणि १८ कारागृहातील कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. मुंबईतल्या भायखळा कारागृहात सापडलेल्या कैद्यांची संख्या ही राज्यातील कोरोनाच्या केसेसमध्ये सर्वाधिक अशी आहे.

गेल्याच आठवड्यात एक महिला कैदी कोरोना पॉझिटिव्ह आल्याने त्या महिलेला उपचारासाठी जेजे रूग्णालयात नेण्यात आले होते. पण बेड्स उपलब्ध नसल्याने त्या महिलेला सेंट जॉर्ज येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. या घटनेची दखल घेऊनच कारागृहातील ३५० कैद्यांनी कोरोना चाचणी करण्यात आली. त्यामध्ये ३९ जण कोरोना पॉझिटिव्ह आले. या ३९ जणांमध्ये इंद्राणी मुखर्जीचाही समावेश आहे. या सर्व कैद्यांना सध्या भायखळा येथील पाटणवाला उर्दू शाळेत तात्पुरत्या कोविड केअर सेंटरमध्ये स्थलांतरीत करण्यात आले आहे. त्याठिकाणी सर्वांना क्वारंटाईन करण्यात आल्याची माहिती जेल प्रशासनाने दिली. आर्थर रोड येथील कैद्यांनाही कोरोनाची लागण झाल्याने या कैद्यांनाही याच शाळेत क्वारंटाईन करण्यात आले आहे. त्यामध्ये पुरूष कैद्यांचाही समावेश आहे. महिला आणि पुरूष कैद्यांची वेगवेगळी व्यवस्था असून सीसीटीव्ही आणि सुरक्षा रक्षकांमार्फत या क्वारंटाईन सेंटरमध्ये काळजी घेण्यात येत असल्याचे जेल प्रशासनाकडून सांगण्यात आले.

राज्यातील कारागृहांमध्ये कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण सापडत असल्यानेच कारागृहातच क्वारंटाईन सेंटर्स उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच या रूग्णांवर कारागृह परिसरातच उपचाराचा निर्णय घेण्यात आला आहे. डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली राज्यातील अनेक कारागृहात सध्या कोरोनाचा रूग्णांचा उपचार सुरू आहे. गृह विभागाकडून मिळालेल्या आकडेवारीनुसार राज्यात १९८ जणांना कोरोनाची लागण झाल्याची आकडेवारी आहे. त्यामध्ये आर्थर रोड जेलमध्ये १८, ठाणे मध्यवर्ती कारागृहात २६, येरवडा मध्यवर्ती कारागृहात ३१, कोल्हापूर जिल्हा कारागृहात ३१, नाशिकमध्ये १५, नागपूरमध्ये १० आणि येरवडा तसेच कल्याण येथे १ कैद्याला कोरोनाची लागण झाल्याची आकडेवारी आहे. त्यामध्येच आता भायखळा येथील कोरोना रूग्णांचीही भर पडली आहे.

काय आहे शीना बोरा प्रकरण ?

शीना बोरा या मुलीची २०१२ मध्ये गळा आवळून हत्या करण्यात आली. हत्या केल्यानंतर मृतदेह रायगडमधील जंगलात फेकण्यात आला होता. या प्रकरणात २०१५ मध्ये इंद्राणीला अटक करण्यात आली होती. तेव्हापासून इंद्राणी तुरुंगावास भोगत आहे. तसेच या प्रकरणात माजी मिडीया दिग्गज पीटर मुखर्जी आणि इंद्राणीचा पहिला पती संजीव खन्नाही आरोपी होते. पीटर मुखर्जी हे नुकतेच जामीन मिळाल्यामुळे तुरुंगातून बाहेर आले आहेत.