ठाणे, पालघरमधील बुलेट ट्रेन प्रकल्पातील भू संपादनाची विभागीय आयुक्तांमार्फत होणार चौकशी

Investigation land acquisition in bullet train project in Thane, Palghar will be conducted through Divisional Commissioner

ठाणे, पालघर जिल्ह्यांतील जमिनी या प्रस्तावित बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी संपादित केल्या जात आहेत. मात्र या भू संपादनात शेतकऱ्यांची फसवणूक होत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. या सर्व तक्रारींची आता विभागीय आयुक्तांमार्फत चौकशी करुन दोषींवर कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी विधानपरिषदेत दिले आहे.

ठाणे आणि पालघर जिल्ह्यांत समृद्धी महामार्ग, बुलेट ट्रेन मार्ग, मुंबई बडोदा महामार्ग अशा अनेक विकास प्रकल्पांचे काम सुरु आहे, या प्रकल्पांसाठी जमीन संपादन करताना उपविभागीय कार्यालय, भिवंडी या कार्यालयाकडून शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याच्या प्रकरणाची चौकशी करण्यासंदर्भात विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी प्रश्न उपस्थित केला होता. या प्रश्नाला उत्तर देताना मंत्री विखे पाटील यांनी यावर सविस्तर माहिती दिली आहे.

भिवंडी तालुक्यातील जमीन मोबदल्यामुळे शेतकऱ्यांच्या झालेल्या फसवणूक प्रकरणी भिवंडीचे तत्कालीन उपविभागीय अधिकारी आणि विद्यमान उपविभागीय अधिकारी यांना निलंबित करण्याची घोषणा यावेळी महसूल मंत्री विखे पाटील यांनी केली आहे.

अंजूरगाव येथील शेतकरी उंदऱ्या दोडे यांच्या मृत्यूचीही विभागीय आयुक्तांमार्फत चौकशी करण्यात येईल, या चौकशीतून शेतकऱ्यांच्या मृत्यूस संबंधित अधिकारी जबाबदार असतील तर त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासंदर्भात कार्यवाही केली जाईल, असंही विखे पाटील म्हणाले.

भूसंपादनामध्ये ज्या शेतकऱ्यांना अद्याप मोबदला मिळालेला नाही त्यांना लाभ देण्याची तात्काळ कार्यवाही करण्यात येईल, असही विखे पाटील म्हणाले. शेतकरी दोडे यांच्या मृत्यूप्रकरणी त्यांच्या कुटुंबियांना आकस्मिक मदत करण्याचे तसेच त्यांच्या जमिनिचा मोबदला संबंधितांना मिळेल, या अनुषंगाने तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिले.


हिमालय पुलाचे गर्डर बसविण्यासाठी रविवारचा मुहूर्त; नववर्षात हिमालय सर्वांसाठी खुला होणार