घरमुंबईम्हाडाच्या बांधकाम प्रयोगशाळेस आयएसओ प्रमाणपत्र

म्हाडाच्या बांधकाम प्रयोगशाळेस आयएसओ प्रमाणपत्र

Subscribe

महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या बांधकाम साहित्य चाचणी प्रयोगशाळेस अद्ययावत गुणवत्ता व्यवस्थापन प्रणालीनुसार इंटिग्रल सर्टिफिकेशन या मान्यताप्राप्त संस्थेतर्फे ISO ९००१:२०१५ गुणवत्ता प्रमाण पत्र सोमवारी मिळाले. म्हाडाच्या वांद्रे येथील मुख्यालयात आयोजित कार्यक्रमात सोर कन्सल्टिंग सर्व्हिसेस (पुणे) यांचे प्रतिनिधी समीर रूपलग व इंटिग्रल सर्टिफिकेशनच्या लीड ऑडिटर सेजल यांच्या हस्ते ISO ९००१:२०१५ गुणवत्ता प्रमाण पत्र म्हाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद म्हैसकर यांना प्रदान करण्यात आले.

म्हाडाच्या बांधकाम साहित्य चाचणी प्रयोगशाळेतील सर्व प्रक्रियांचे सूसंचालन, दस्तऐवज व अभिलेखांवर नियंत्रण प्रस्थापित करण्यासाठीचे कार्यपद्धती विवरण पत्रिका (sop) कार्यान्वित करण्यात आल्या आहेत. तसेच या प्रणालीमार्फत अभिलेखांचे वर्गीकरण संकलन व पुनर्प्राप्ती सुलभ व सोपी झाली आहे. सादर प्रणाली अंतर्गत विकसित केलेल्या कार्यपद्धतीनुसार विकासक/ कंत्राटदार याना नोंदणी अर्ज भरणे व साहित्य चाचणीचे शुल्क भरण्याकरिता २४/७ ऑनलाईन सुविधा उपलब्ध झाली आहे, अशी माहिती याप्रसंगी माहिती दक्षता व गुण नियंत्रण कक्षाचे कार्यकारी अभियंता किशोरकुमार काटवटे यांनी दिली.

- Advertisement -

यापूर्वी म्हाडाच्या या प्रयोगशाळेस ISO ९००१ : २००८ हे गुणवत्ता प्रमाण पत्र प्राप्त होते. विविध गृहनिर्माण योजनांच्या बांधकामावर गुणनियंत्रण ठेवण्यासाठी ऑगस्ट १९७४ मध्ये बांधकाम साहित्य चाचणी प्रयोग शाळा सुरू करण्यात आली. सुरूवातीला म्हाडातर्फे होणार्‍याच बांधकाम साहित्याची चाचणी करण्यात येत असे मात्र काही दशकांच्या कालावधीमध्ये बांधकाम साहित्य चाचणी प्रयोगशाळेने प्रगती करत अनेक इतर अनेक शासकीय संस्था ,आणि त्याचबरोबर उच्च दर्जाचे बांधकाम करणारे नामांकित खासगी कंत्राटदारही आपल्या बांधकाम साहित्याची चाचणी म्हाडाच्या प्रयोगशाळेतून करीत आहेत.

याप्रसंगी म्हैसकर अभियंता वर्गाचे कौतुक करताना म्हणाले की, म्हाडाच्या दक्षता आणि गुणनियंत्रण विभागातील अभियंत्यांच्या मेहनतीमुळेच बांधकाम साहित्य चाचणी प्रयोगशाळेस हे प्रमाणपत्र प्राप्त झाले असून प्रयोगशाळेच्या इतिहासात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. आधुनिक काळाची आव्हाने समोर ठेवता गुणवत्ता व्यवस्थापन प्रणालीचे निकष पूर्ण करणे आव्हानात्मक आहे परंतु पारदर्शकता, कागदविरहित कार्यप्रणाली आणि कमीतकमी वेळेत अद्ययावत तंत्रज्ञाचा वापर करून ग्राहकांना अचूक सोयी उपलब्ध करून देण्याचे ध्येये आणि उद्दिष्टे या माध्यमातून बांधकाम साहित्य चाचणी प्रयोगशाळेने गाठले आहे. तसेच भविष्यात अशीच कामगिरी करून यश मिळावे याकरिता त्यांनी याप्रसंगी शुभेच्छा देखील दिल्या. याप्रसंगी म्हाडाचे मुख्य अभियंता धीरजकुमार पंदिरकर , उपमुख्य अभियंता दक्षता व गुण नियंत्रण कक्ष राजेंद्र गळदगेकर , कार्यकारी अभियंता किशोरकुमार काटवटे व प्रयोगशाळेतील अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -