घरमुंबईदररोज 9,612 प्रवाशांच्या मोबाईलची चोरी

दररोज 9,612 प्रवाशांच्या मोबाईलची चोरी

Subscribe

मुंबईतील उपनगरीय रेल्वे स्थानके आणि लोकलगाड्या यामध्ये होणार्‍या चोर्‍या आता नित्याच्या झाल्या आहेत. कालपर्यंत पाकीटमारांनी रेल्वे स्थानकांमध्ये हैदोस घातला होता. मात्र आता डिजिटल मनी अर्थात प्लास्टिक मनी यामुळे पाकीटमारांच्या हाती विशेष काही लागत नाही. त्यामुळे आता या भुरट्या चोरांनी पाकीटमारी कमी करून मोबाईल चोरीवर भर दिला आहे. गेल्या आठ महिन्यांत पश्चिम व मध्य रेल्वेच्या उपनगरीय रेल्वे स्थानकांवर तब्बल ९ हजार ६१२ मोबाईल चोरीच्या घटना घडल्या आहेत. तर १,०३० इतके मोबाईल हरवल्याच्या तक्रारी नोंदवण्यात आल्या आहेत. या आकडेवारीनुसार रेल्वे स्थानके आणि लोकल गाड्या यामधून दररोज ४२ मोबाईल फोनची चोरी होत असून प्रत्येक महिन्याला १ हजार ३३० मोबाईल चोरी अथवा हरवल्याच्या घटना घडत असल्याचे स्पष्ट होत आहे. अशा प्रकारे मोबाईल चोर हे लोहमार्ग पोलिसांकरता मोठी डोकेदुखी होऊन बसले आहेत.

वाढत्या मोबाईल चोरीच्या घटनांचा शोध लावण्यासाठी तसेच या चोरीच्या घटना थांबवण्यासाठी लोहमार्ग पोलीस विविध क्लृप्त्या लढवत असतात, तरीदेखील लोहमार्ग पोलिसांना यामध्ये अपेक्षित यश मिळत असल्याचे दिसून येत नाही. मोबाईल चोरीच्या घटनांची संख्या पाहून आता प्रवाशांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. दादर, चर्चगेट, मुंबई सेंट्रल, सीएसएमटी, वांद्रे, कुर्ला आणि कर्जत या लोहमार्ग पोलीस ठाण्याअंतर्गत येणार्‍या उपनगरीय रेल्वे स्थानकांत जानेवारी ते ऑगस्ट या ८ महिन्यांच्या कालावधीत मोबाईल चोरी आणि मोबाईल हरवल्याच्या एकूण १० हजार ६४२ घटना घडल्या आहेत. त्यामधील आतापर्यंत ८२० गुन्हे उघडकीस आले आहेत. ८४८ मोबाईल चोरांना अटक करण्यात आली आहे. माहिती अधिकारांतर्गत ही माहिती समोर आली आहे. २०१६ साली मात्र जानेवारी ते ऑगस्ट या कालावधीत या उपनगरीय रेल्वे स्थानकांमध्ये मोबाईल चोरी आणि मोबाईल हरवल्याच्या घटना १५ हजार ३६२ इतक्या घडल्या होत्या. मागच्या दोन वर्षांत ही संख्या ४ हजारांनी घटली आहे.

- Advertisement -

मोबाइल चोर नेहमी वेगवेगळी पद्धत अवलंबत असतात. पूर्वी फटका गँगची लोकल प्रवाशांमध्ये दहशत होती. मात्र पोलिसांनी या गँगला उधळूण लावले. तरीही मोबाईल चोरीच्या घटना कमी झालेल्या नाहीत. या चोरांना पकडण्यासाठी लोहमार्ग पोलीस खबर्‍यांचीही मदत घेतात. मोबाईल चोरणारे सराईत गुन्हेगार असतात त्यांच्या नोंदवहीचीही मदत घेतली जाते. त्याचप्रमाणे स्टेशन परिसरात मोबाईल चोरी झाल्यास सीसीटीव्ही कॅमेर्‍यांच्या मदतीने लोहमार्ग पोलीस चोरांना पकडण्याचा प्रयत्न करत असतात.

मोबाईल आणि पाकीट चोरीची प्रकरणे ही सर्वसाधारणपणे सकाळी किंवा संध्याकाळी या कार्यालयीन वेळेत गर्दीमध्ये घडतात. त्यामुळे पोलीस नेहमी याच वेळेत अधिक सतर्र्क राहतात. मुंबईत दररोज ७० लाखांहून अधिक प्रवासी लोकल गाड्यांमधून प्रवास करतात. प्रवाशांनीही त्यांच्याकडील साहित्यांची काळजी घेणे गरजेचे आहे. तसेच लोकलच्या दरवाजाजवळ उभे राहून मोबाइलवर बोलणे टाळावे, असे आवाहन लोहमार्ग पोलीस अधिकारी करतात.

- Advertisement -
वांद्रे, कुर्ला रेल्वे स्थानकांत सर्वाधिक चोरी

जानेवारी ते ऑगस्ट २०१८ या कालावधीत कुर्ला, वांद्रे, दादर, सीएसएमटी आणि मुंबई सेंट्रल या चार रेल्वे स्थानकांमध्ये सर्वाधिक मोबाईल चोरीच्या घटना घडल्या. त्यातही कुर्ला रेल्वे स्थानकात ३ हजार १०२ मोबाईल चोरी आणि हरवल्याच्या घटना घडल्या आहेत. आतापर्यंत २०४ चोरलेले मोबाईल पोलिसांना जप्त करण्यात यश आले, तर १९५ चोरट्यांना अटक करण्यात आली आहे. तर वांद्रे रेल्वे स्थानकात २ हजार २१२ इतकी प्रकरणे समोर आली आहेत. त्यापैकी वांद्रे लोहमार्ग पोलिसांनी २०७ चोरलेले मोबाईल जप्त करून २३८ मोबाईल चोरांच्या मुसक्या आवळल्या.

सर्व रेल्वे स्थानकांवर पोलिसांची गस्त वाढविण्यात आली असून सीसीटीव्ही कॅमेर्‍याच्या माध्यमातून आम्ही पाकीटमार आणि मोबाईल चोरट्यांवर बारीक नजर ठेवून असतो. चोरीला गेलेल्या मोबाईलचे रजिस्ट्रेशन असल्यामुळे मोबाईल शोधताना खूप मदत होते. सोबतच पोलिसांच्या रेकॉर्डवर असलेल्या चोरट्यांवरही लक्ष ठेवून असतो. त्यामुळेच आता मोबाईल चोरीमध्ये घट झाली आहे. मात्र या चोर्‍यांवर पूर्णत: अंकुश कसा येईल, त्यादृष्टीने आमचे युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत.
– पुरुषोत्तम कराड, लोहमार्ग रेल्वे पोलीस उपायुक्त.

लोहमार्ग पोलीस यापूर्वी मोबाईल चोरीची प्रकरणे बहुतांश वेळा मिसिंगमध्ये नोंदवत असत. आता मात्र मिसिंगऐवजी चोरीच्या प्रकारात त्यांची नोंद करतात, मात्र आज हरवलेले आणि चोरी झालेले मोबाईल खूप कमी प्रमाणात सापडतात. त्यामुळे लोहमार्ग पोलिसांनी या चोर्‍यांचा गंभीरपणे विचार करून मोबाईल चोरांच्या मुसक्या आवळण्याचा प्रयत्न करावा.
– राधेश्याम शर्मा, सामाजिक कार्यकर्ता, मुंबई

प्रवाशांनो, कशी काळजी घ्याल?
* दारात उभे राहून मोबाईलवर बोलणे टाळा.
* लोकलमध्ये चढताना-उतरताना मोबाईलवर बोलू नका.
* लोकलच्या दारात उभे राहून व्हॉट्सअ‍ॅप चॅटिंग करू नका.
* स्वत:कडील साहित्यांची विशेष काळजी घ्या.
* प्रवास करताना चारही बाजूकडे लक्ष द्या.
* लोकलमध्ये हेडफोन लावून झोपू नका.
* इतर प्र्रवाशांना स्वत:चा मोबाईल देऊ नका.

२०१६ साली चोरीचे प्रमाण घटलेले
जानेवारी ते ऑक्टोबर २०१६ च्या आकडेवारीनुसार कुर्ला – 3250, वांद्रे -3343, दादर – 1814, सीएसएमटी – 1233, मुंबई सेंट्रल – 2400, वाशी – 1351, चर्चगेट – 1814, आणि कर्जत 157 अशा एकूण आठ रेल्वे स्थानकांच्या हद्दीत १५ हजार ३६२ मोबाईल चोरी आणि मिसिंगच्या प्रकरणांची नोंद करण्यात आली होती.

===================================
जानेवारी ते आक्टोबर 2018 (मोबाईल चोरी-मिसिंग)
==================================
2018 जप्त केलेले मोबाईल अटक
==================================
कुर्ला – 3102 204 195
वांद्रे – 2212 207 238
दादर – 1569 58 58
सीएसएमटी – 1400 105 84
मुंबई सेंट्रल – 1260 121 137
वाशी – 759 54 58
चर्चगेट – 225 56 60
कर्जत – 144 15 18
====================================
एकूण 10641 820 848
======================================

Nitin Binekar
Nitin Binekarhttps://www.mymahanagar.com/author/bnitin/
गेल्या ५ वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सार्वजनिक वाहतूक, शैक्षणिक विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -