घरमनोरंजन'बिस बॉस'चा अभ्यास करूनच घरात आले - मेघा धाडे 

‘बिस बॉस’चा अभ्यास करूनच घरात आले – मेघा धाडे 

Subscribe

बिग बॉस मराठीच्या पहिल्या पर्वाच्या विजेतेपदावर मेघा धाडेने नाव कोरलं. आपणच विजेता होणार याची खात्री तिला पाहिल्या दिवसापासूनच होती आणि त्याच जिद्दीने ती या घरात वावरली. मेघा धाडेची लोकप्रियता वाढली ती तिच्या टास्क खेळण्याच्या पध्दतीमुळे! मेघाचं सतत बोलणं, तिचा मेकअप, घरातील तिच भांडण कायम चर्चेत राहिलं. या सगळ्याबाबत मेघाने 'आपलं महानगर'ला सांगितलेल्या या खास गोष्टी! 

अखेर तुझं स्वप्न पूर्ण झालंय. हातात विजयाची ट्रॉफी आहे. कसं वाटतंय? 

मी बिग बॉसची खुप आधीपासून मोठी फॅन आहे. आणि या घरात पाऊल ठेवलं होतं ते फक्त जिंकण्यासाठीच! माझं हे स्वप्न होतं आणि अखेर आज ते पूर्ण झालं आहे. माझ्या इतकीच शर्मिष्ठा राऊतदेखील बिग बॉसची खुप मोठी फॅन आहे. मला असं वाटतं फक्त मी आणि शर्मिष्ठा हा खेळ जिंकण्यासाठी खेळलो. बाकी सगळे केवळ मज्जा-मस्ती करायला ‘बिग बॉस’मध्ये आल्यासारखे वागले.

तू कायम चर्चेत राहिलीस. त्यामुळे घरातील सदस्य म्हणायचे, की ‘तू कॅमेरासाठी सगळं करतेस’, हे खरं आहे का?

बिग बॉसच्या घरात ५० कॅमेरे आहेत. त्यामुळे तुम्ही काय करता यावर कॅमेऱ्याची नजर असतेच. अगदी तुम्ही चालतानादेखील कॅमेरा तुमच्यावर लक्ष ठेऊन असतो. त्यामुळे तुम्ही काय बोलता, काय खाता, कसं वागता, कधी झोपता हे सगळं कॅमेरात कैद होत असतं. त्याकरता कॅमेऱ्यासाठी वेगळं काही करण्याची गरज मला कधीच भासली नाही. वेगळं काही करतेय असंही मला वाटलं नाही.

- Advertisement -

स्पर्धेसाठी खेळणारी मेघा प्रेक्षकांनी पाहिली. पण खरी मेघा धाडे बाहेर कशी आहे? 

तशीच, जशी मी शंभर दिवस बिग बॉसच्या घरात होते. तशीच मेघा धाडे बाहेरच्या जगातही आहे. अनेकवेळा मी रागात म्हटलंय, की ‘बाहेर या, मेघा धाडे कशी आहे ते कळेल.’ पण खरंतर मी आहे तशीच घरात वावरले. ते फक्त रागाच्या भरात मी बोलले. बिग बॉसच्या घरापेक्षा मी माझ्या स्वतःच्या घरी यापेक्षा जास्त अल्लड आहे. खूप बोलते, मस्ती करते. बिग बॉसच घर असं आहे की, तुम्ही जास्त दिवस अॅक्टींग करू शकत नाही. तुम्ही आहात तसेच राहावं लागतं. त्यामुळे मेघा घरात होती तशीच बाहेरही आहे.

एक चूक झाली आणि सईसोबत मैत्री तुटली असं वाटतं का? 

नाही, अजिबात नाही. मी इथे खेळायला आले होते. नाती जपायला नाही. त्यामुळे माझ्या मनात जेव्हा जे आलं ते मी केलं. मी आधीच्या टास्कमध्ये केलेल्या चुका मला पुन्हा करायच्या नव्हत्या. माझ्या मनात असलेलं गिल्ट मला  ठेवायचं नव्हतं. त्यामुळे मी अस्तादला माझं मत दिलं. पुष्कर आणि सईने गैरसमज करून घेतला. पण ते त्यांचं मत होतं. त्यांच्या मताचा मी कायम आदरच केला आहे. त्यामुळे मला वाटतं नाही, की माझं काही चुकलंय.

- Advertisement -

 तू सगळा अभ्यास करून आली आहेस, हा आरोप तुझ्यावर कायम होत होता. कसं पाहतेस याकडे?

हो, मी बिग बॉसला खूप आधीपासून फॉलो करत आलेय. त्यामुळे हो ‘मी अभ्यास करून आले होते’, हे मी मान्य करते. पण माझ्याप्रमाणेच इतर स्पर्धकांनीही अभ्यास करून येणं गरजेचं होतं. आपण एखाद्या स्पर्धेत जातो तेव्हा पूर्ण तयारी करून जातो. त्यामुळे मी अभ्यास करून आले यात काही चूक आहे, असं मला वाटतं नाही.

 आता तू बिग बॉसच्या घरातून बाहेर आली आहेस. सर्वात जास्त कोणत्या गोष्टीची तुला आठवण येईल?

घरातून बाहेर पडल्यानंतर सर्वात जास्त मला बिग बॉसचा आवाज प्रकर्षाने आठवेल. त्या आवाजाची मला खूप सवय झाली आहे. बिग बॉसचा आवाज मला माझ्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड करून घ्यायचा आहे. त्याचबरोबर मी माझं स्वयंपाक घर, माझा आणि सईचा बेड जास्त मिस करेन. ज्या बेडवर बसून जास्तीत जास्त वेळ गप्पा मारायचो, गॉसिप करायचो, त्याचप्रमाणे घराच्या बाहेरचा आमचा बाक, ज्या बाकावर बसून आम्ही पाच जणं सकाळचा चहा घ्यायचो. हे सगळंच अविस्मरणिय आहे.

 तू जिंकली नसतीस तर कोण जिंकावं असं तुला वाटतं होतं?       

मी जर जिंकले नसते तर शर्मिष्ठा राऊतने बिग बॉस जिंकावं असं मला वाटत होतं. कारण ती तेवढी या खेळासाठी पॅशनेट आहे. ती पण बिग बॉसची खुप मोठी फॅन आहे. तीपण या सगळ्याचा अभ्यास करून या घरात आली होती.
——————-

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -