घरताज्या घडामोडीमहापौरांनी विरोधी पक्षनेतेपदाची फेटाळली मागणी

महापौरांनी विरोधी पक्षनेतेपदाची फेटाळली मागणी

Subscribe

गटनेतेपदी प्रभाकर शिंदेंचे नाव घोषित करत महापौरांनी विरोधी पक्षनेतेपदाची मागणी फेटाळली. महापालिकेचे विरोधी पक्षनेते पदी काँग्रेसचे रवीराजाच राहणार आहेत.

मुंबई महापालिकेच्या विरोधी पक्षनेतेपदावर दावेदारी ठोकणार्‍या भाजपची मागणी महापौर किशोरी पेडणेकर यांनी फेटाळून लावली. महापालिका सभागृहात भाजपच्या गटनेतेपदी प्रभाकर शिंदे यांच्या नावाची घोषणा करतानाच महापौरांनी विरोधी पक्षनेत्यांची रितसर नेमणूक झाल्याचे सांगत भाजपला विरोधी पक्षनेते पदापासून दूर सारले. मुंबई महापालिकेतील पहारेकरी असलेल्या भाजपने आता राज्यातील सत्ता जाताच विरोधी पक्षनेतेपदावर दावा केला आहे. त्यामुळे भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक प्रभाकर शिंदे यांचे नाव विरोधी पक्षनेतेपदासाठी जाहीर करत याबाबतचे पत्र महापौर किशोरी पेडणेकर यांना दिले होते. तर पक्षाच्या गटनेतेपदी विनोद मिश्रा यांचे नाव जाहीर केल्यानंतरही त्यांचे पत्र महापौरांना सादर केले नव्हते. परंतु गटनेताच विरोधी पक्षनेता होतो ही बाब लक्षात येताच भाजपने प्रभाकर शिंदे यांचे नाव भाजपच्या गटनेतेपदासाठी महापौरांना सादर केले.

हे पत्र गुरुवारी झालेल्या महापालिकेच्या सर्वसाधारण सभेपुढे आला असता महापौरांनी ८३ नगरसेवक संख्या असलेल्या भाजपच्या गटनेतेपदी प्रभाकर शिंदे यांचे नाव घोषित केले. त्यानंतर विरोधी पक्षनेते पदासाठी प्रभाकर शिंदे यांच्या नावाच्या पत्रावर महापौरांनी, महापालिकेच्या अधिनियमातील तरतुदीनुसार विरोधी पक्षनेतेपदाची रितसर नेमणूक केलेली असल्याचे सांगितले. मात्र, यापलिकडे महापौरांनी कोणतेही विधान न करत भाजपची विरोधी पक्षनेतेपदाची मागणी फेटाळत काँग्रेसचे रवीराजाच विरोधी पक्षनेते म्हणून राहतील, असे अप्रत्यक्ष स्पष्ट केले.

- Advertisement -

भाजपला आता न्यायालयाचे दरवाजे ठोठावे लागणार

भाजपला विरोधी पक्षनेतेपदाची मागणी फेटाळत महापौरांनी महापालिकेचे नवीन अतिरिक्त आयुक्त जयश्री भोज यांची सभागृहात ओळख करून देत त्यांचा अभिनंदनाचा प्रस्ताव मांडण्यास सुरुवात केली. यावर भाजपचे नगरसेवक अभिजीत सामंत यांच्यासह प्रभाकर शिंदे यांनी हरकतीचा मुद्दा उपस्थित करण्याची मागणी केली. परंतु भाजपची मागणीकडे लक्ष न देता महापौरांनी भोज यांचा अभिनंदनाचा प्रस्ताव मांडून सभागृहाच्या कामकाजाला सुरुवात केली. त्यामुळे भाजपच्या नगरसेवकांनी जोरदार घोषणाबाजी करत महापौरांचा तीव्र निषेध करण्यास सुरुवात केली. नहीं चलेगी, नही चलेगी.. दादागिरी नही चलेगी… न्याय द्या, न्याय द्या… महापौर न्याय द्या… अशा घोषणा देत भाजपच्या नगरसेवकांनी सभागृह दणाणून सोडले. दरम्यान, विरोधी पक्षनेतेपदासाठी भाजपला आता न्यायालयाचे दरवाजे ठोठावे लागणार आहे.

लोकशाहीचा गळा घोटला

भाजपच्या गटनेतेपदाची घोषणा केल्यानंतर विरोधी पक्षनेतेपदाची घोषणा केली नाही. त्यामुळे आम्ही चर्चेची मागणी केली होती. परंतु आम्हाला बोलायला न देता लोकशाहीचा गळा घोटण्याचे काम महापौरांनी केले आहे. लोकशाहीनुसार आम्हाला चर्चा करण्याचा पूर्ण अधिकार आहे. त्यामुळे याचा निषेध म्हणून सर्व नगरसेवकांनी सभागृहाशेजारील व्हरांड्यात बसून घोषणाबाजी केली. – प्रभाकर शिंदे, भाजपचे नवनिर्वाचित महापालिका गटनेते

- Advertisement -

 भाजपचे न्यायालयात काय सर्वोच्च न्यायालयात जावे

सत्ता गेल्यामुळे भाजपवाले सैरभैर झाले आहेत. महापौरांनी जो निर्णय घेतला तो योग्यच आहे.  यापूर्वीचे भाजपचे गटनेते आणि खासदार मनोज कोटक यांनी आम्ही पहारेकरीच म्हणून राहणार असे त्यांनीच आधीच जाहीर केले. म्हणून विरोधी पक्षनेतेपद आम्हाला मिळाले आहे. जर पहारेकरी आहात तर विरोधी पक्षनेतेपद आता कशाला हवे. त्यामुळे हे पहारेकरी नाहीत सोयीचे पहारेकरी आहेत. त्यामुळे भाजपने उच्च न्यायालयातच नाही तर सर्वोच्च न्यायालयात जावे. – रवी  राजा, विरोधी पक्षनेते, मुंबई महापालिका

आता बसा पहारेकरी म्हणूनच

भाजपचे तत्कालिन गटनेते मनोज कोटक यांनी पहारेकरी म्हणून भूमिका बजावण्याचे जाहीर करत विरोधी पक्षनेतेपद नाकारले होते. त्यामुळेच दुसर्‍या क्रमांकाच्या पक्षाला अर्थात काँग्रेसला विरोधी पक्षनेता पद देण्यात आले आहे. त्यावेळी त्यांनी महापौरांनी घेतलेला निर्णय मान्य असल्याचे जाहीर केले होते. त्या आधारेच महापौरांनी गुरुवारी सभागृहात विरोधी पक्षनेतेपदाबाबत आपला निर्णय दिला. परंतु विरोधी पक्षनेतेपद नाकारले म्हणून भाजपने थयथयाट करण्याची गरज नाही. त्यांनी याचा जाब आधी मनोज कोटक आणि मंगलप्रभात लोढा यांना विचारावा, मग आमच्या विरोधात बोलावे. त्यांना आधी शिंदेंना गटनेतापद द्यायचे नव्हते. म्हणूनच त्यांनी आधी विरोधी पक्षनेतेपदाचे पत्र दिले. त्यामुळे त्यांच्यातच राजकारण असून आता विरोधी पक्षनेतेपद नाकारल्याने आता बसा पहारेकरी म्हणून दांडुका आपटत. – विशाखा राऊत सभागृहनेत्या, मुंबई महापालिका


हेही वाचा – बोरीवलीतील प्रकल्पबाधितांच्या सदनिकांचे बांधकाम होणार


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -