घरमुंबईकोविड काळातही मुंबईत पोलिओ लशीची मोहिम फत्ते

कोविड काळातही मुंबईत पोलिओ लशीची मोहिम फत्ते

Subscribe

एकाच दिवशी ५ लाख १२ हजार ८६० बालकांना दिली लसीची मात्रा

कोविडच्या काळातही मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागाने पोलिस लसीकरणाची मोहिम सुरक्षित अंतर राखत तसेच स्वत:ची आणि इतरांची काळजी घेत पार पाडली. २० सप्टेंबरला झालेल्या या एक दिवसीय मोहिमेत एकूण ५ लाख १२ हजार ८६० बालकांना पोलिओ लसीची मात्रा देण्यात आली आहे. मात्र, ज्‍या बालकांनी दिनांक २० सप्‍टेंबर २०२० रोजी पल्‍स पोलि‍ओ लसीचा लाभ घेतला नसेल; त्या बालकांना दुस-या टप्प्यात सलग पाच दिवस घरोघरी जात पोलिओ लसीची मात्रा देण्यात येणार आहे. यानुसार येत्‍या शुक्रवारपर्यंत म्‍हणजेच दिनांक २५ सप्‍टेंबर २०२० पर्यंत पोलिओची लस देण्‍यात येत असल्याचे महापालिकेच्या सार्वजनिक आरोग्य खात्याने स्पष्ट केले.

मुंबई ‘कोविड – १९’ या संसर्गजन्‍य आजाराच्‍या अनुषंगाने नियंत्रण व औषधोपचार कार्यवाही सुरु असताना आरोग्‍यविषयक इतर मोहिमादेखील यथायोग्‍यप्रकारे राबविण्‍यात येत आहेत. याच अंतर्गत ‘कोविड’ बाबत आवश्‍यक ती सर्व प्रतिबंधात्‍मक काळजी घेत दिनांक २० सप्टेंबर २०२० रोजी मुंबईत पल्स पोलिओ मोहीम यशस्‍वीपणे राबविण्‍यात आली. या मोहिमेंतर्गत मुंबईत सर्वत्र ४ हजार ७९७ ‘बुथ’चे आयोजन करण्यात आले होते. ज्‍यासाठी १३ हजार ९९२ व्‍यक्‍ती कार्यरत होत्‍या. यामध्‍ये महापालिका कर्मचारी, आरोग्य स्वयंसेविका, आंगणवाडी सेविका तथा मदतनीस, शिक्षकवर्ग, विद्यार्थी तसेच सामाजिक कार्यकर्ते यांचा समावेश होता. ही मोहीम कोविडच्‍या पार्श्‍वभूमीवर होत असल्‍याने मोहिमेत सहभागी होणा-या सर्वांना बालकांना स्‍पर्श न करता लस पाजण्याचे प्रशिक्षण देण्‍यात आले होते. त्‍याचबरोबर योग्‍यप्रकारे मास्‍क वापरणे, सॅनिटायझरचा योग्‍य वापर करणे आणि बुथवर एकावेळी कमीत-कमी व्‍यक्‍ती शारीरिक अंतर राखत उपस्थित असतील या बाबींचीही काळजीपूर्वक अंमलबजावणी करण्‍यात आली.

- Advertisement -

या एक दिवसीय मोहिमेत एकूण ५ लाख १२ हजार ८६० बालकांना पोलिओ लसीची मात्रा देण्यात आली. दरवर्षी राबविण्‍यात येणा-या पोलिओ लसीकरण मोहिमेची दोन टप्प्यात विभागणी केली जाते. पहिल्‍या टप्प्यात मोहिमेच्या प्रथम दिवशी म्‍हणजेच एका रविवारी बुथद्वारे ०-५ वयोगटातील बालकांना पोलिओ लसीची मात्रा दिली जाते. तर दुस-या टप्प्यात सलग पाच दिवस गृहभेटींद्वारे उर्वरि‍त बालकांना पोलिओ लसीची मात्रा देण्यात येते.

भारत सरकारच्या आदेशान्‍वये पल्स पोलिओ कार्यक्रम २० सप्टेंबर २०२० रोजी आयोजित करण्यासंदर्भात आदेश प्राप्त झाले होते. मात्र, कोविड – १९ विषयक आपत्‍कालीन परि‍स्थितीत जनमानसांत असलेल्या कोविड-१९ या आजाराच्या भयामुळे तसेच उपलब्ध मनुष्यबळ कोविड-१९ या आजाराच्या उपाययोजना व रुग्ण व्यवस्थापन यामध्ये व्यस्त असल्यामुळे सदर मोहीम राबविणे आव्हानात्मक होते. तरीही मुंबई महानगरपालिकेच्‍या सार्वजनिक आरोग्‍य खात्‍याद्वारे करण्‍यात आलेल्‍या सुव्‍यवस्थित नियोजनामुळे मोहिमेचा पहिला टप्‍पा यशस्‍वीपणे राबविण्‍यात आला आहे.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -