घरमुंबईम्हाडाची ९२१ घरे रिकामीच !

म्हाडाची ९२१ घरे रिकामीच !

Subscribe
मुंबईतील म्हाडाच्या घरांना एकीकडे प्रचंड मागणी होत असल्याने यंदा म्हाडाने मुंबई मंडळ तसेच कोकणच्या ३३०० घरांच्या लॉटरीची तयारी केली असून पुणे मंडळाच्या घरांच्या लॉटरीचीही तयारी केली आहे. असे असताना दुसरीकडे म्हाडाने नाशिक आणि औरंगाबादमध्ये बांधलेल्या तब्बल ९२१ घरांची विक्री न झाल्याने सुमारे २६३ कोटी रुपयांचे झालेल्या नुकसानाकडे म्हाडाने दुर्लक्ष केले आहे. हे नुकसान भरून काढण्यासाठी म्हाडाने हालचाली सुरू केल्या असून यासाठी या घरांच्या किंमती कमी करण्यात येणार आहेत. मात्र जादा दराने घरे बांधणाèया कंत्राटदारांना तर म्हाडाने क्लिनचिट दिली आहे.
म्हाडाने २ ते ३ वर्षांपूर्वी नाशिकमध्ये ९०१ तर औरंगाबादमध्ये २० घरे बांधली. त्यामध्ये म्हाडाने  सुमारे २६३ कोटी ८४ लाख रुपये गुंतवले. मात्र नाशिक आणि  औरंगाबादमधील खासगी विकासकांच्या तुलनेत म्हाडाच्या घरांचे दर जास्त आहेत. त्यामुळे या घरांकडे ग्राहकांनी पाठ फिरवली. खरे तर या घरांच्या बांधकामाचा दर मुंबईतील बांधकामाच्या दरावर आधारित होता. वास्तविक मुंबईतील बांधकामाच्या दरांपेक्षा नाशिक व औरंगाबादमधील बांधकामाचे दर फारच कमी आहेत. मात्र  म्हाडा प्रशासनाने मुंबईतील दरानेच नाशिक व औरंगाबादमधील घरे बांधण्याचे कंत्राट देऊन टाकले. या दरांना म्हाडा प्राधिकरणाच्या बैठकीत मंजुरी देणे आवश्यक होते. पण बैठकीत या दरांविषयी मान्यता घेण्यात आली नाही.
घाईघाईने सर्क्युलर पद्धतीने या दरांना मान्यता देण्यात आली. दरांच्या फाइलवर संबंधित वरिष्ठ अधिकाèयांची मंजुरी घेऊन दर निश्चित करण्यात आले. बांधकामांचा दर जास्त असल्याने घरांच्या किमतीही वाढल्या. परिणामी घरांच्या विक्रीवर परिणाम झाला. घरे विक्रीविना पडून राहिली. ही घरे बांधणारे कंत्राटदार मेसर्स बी.जी.शिर्के कंपनीला २६३ कोटी  ८४ लाख रुपये म्हाडाने अदा केले. मात्र घरांची विक्री न झाल्याने म्हाडाच्या तिजोरीवर प्रचंड आर्थिक बोजा पडला आहे. गेल्या ३ वर्षात या नुकसानाकडे म्हाडाने दुर्लक्ष केल्याने नुकसानीचा आकडा २६३ कोटी  ८४ लाख रुपयापेक्षा अधिक वाढला आहे.  अखेर आता म्हाडाने नुकसान भरून काढण्यासाठी घरांच्या किमती सुमारे २० टक्के किंवा त्यापेक्षा अधिक टक्क्याने कमी करण्याचा निर्णय घेतला आहे.
नाशिक मंडळ  दर कमी करण्याचा प्रस्ताव लवकरच प्राधिकरणाकडे मंजूरीसाठी पाठवणार आहे. मात्र या प्रकल्पात कंत्राटदार म्हणून मेसर्स बी.जी.शिर्के यांनाही जबाबदार धरले पाहिजे, असे प्राधिकरणाच्या धोरणात नमूद करण्यात आले आहे. असे असतानाही घरांच्या किमती कमी करण्यास निघालेल्या म्हाडाने  मात्र कंत्राटदार मेसर्स बी.जी.शिर्के यांना क्लिनचिट दिली असल्याची चर्चा म्हाडात आहे.
घरांच्या किमती कमी करणार..
घरे पडून असल्याने या घरांच्या किमती काही टक्क्यांनी कमी करून त्यांची विक्री करण्याचे आमचे प्रयत्न आहेत. सध्याची मंदी लक्षात घेऊन ग्राहकांना कमी किमतीत घरे उपलब्ध करून देणार आहोत. याबाबतचा प्रस्ताव लवकरच प्राधिकरणाला पाठवण्यात येणार आहे.
– रमेश मिसाळ, मुख्य अधिकारी नाशिक गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळ
मेसर्स बी.जी.शिर्के कंपनी जबाबदार?
प्राधिकरणाच्या धोरणानुसार कंत्राटदारास कार्यारंभ आदेश देण्यापूर्वी घरांची मागणी आजमाविण्यात येते, मात्र मुंबई मंडळानुसार खुल्या विक्रीच्या गाळ्यांची जाहिरात नमुना सदनिका तयार झाल्यानंतर देण्याचे प्रस्तावित आहे. भविष्यात सदर योजनेमुळे म्हाडास कोणत्याही प्रकारचा तोटा व नुकसान झाल्यास शासनाचे दिनांक २ मार्च २००१ च्या पत्रानुसार त्याची जबाबदारी मेसर्स बी.जी.शिर्के कंपनी यांच्यावर राहील. ते भरपाई करून देतील, या आशयाचे त्यांच्याकडून हमीपत्र (अंडरटेकिंग) घेण्यात येईल. मगच संपूर्ण  बांधकाम हाती घेण्यासंबधी कार्यादेश मंजुरी देण्यात येईल.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -