मनसेनं मानले केंद्र सरकारचे जाहीर आभार!

MNS Chief Raj Thackeray
मनसे अध्यक्ष राज ठाकरे

काही दिवसांपूर्वीच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्षाच्या पहिल्या वहिल्या अधिवेशनामध्ये पक्षाच्या नव्या झेंड्याचं अनावरण केलं आहे. त्यासोबतच हिंदुत्वाचा नारा राज ठाकरेंनी दिल्यामुळे मनसे भाजपच्या जवळ जात असल्याची चर्चा सुरू झाली. त्याच पार्श्वभूमीवर आज तमाम विरोधी पक्ष अर्थसंकल्पावर टीका करत असताना मनसेने मात्र अर्थसंकल्पाचं, अर्थमंत्र्यांचं कौतुक करत मोदी सरकारचे आभार मानले आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा मतदारांच्या आणि जनतेच्या भुवया उंचावल्या आहेत. राज ठाकरे खरंच भाजपसोबत युती करणार का? आणि भाजप त्यांच्यासोबत युतीसाठी तयार होणार का? हे प्रश्न पुन्हा चर्चेत आले आहेत.

सामान्य करदात्यांना अर्थसंकल्पात दिलासा

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज लोकसभेमध्ये देशाचा २०२०-२१ या आर्थिक वर्षासाठीचा अर्थसंकल्प सादर केला. यामध्ये सामान्य करदात्यांना मोठा दिलासा देत ५ लाखांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त करण्यात आलं आहे. तसेच, त्यापुढच्या देखील उत्पन्न मर्यादांमध्ये भरावयास लागणाऱ्या कर शुल्कामध्ये घट करण्यात आली आहे. त्यामुळे सामान्यांना हा मोठा दिलासा मानला जात आहे.


वाचा सविस्तर – करदात्यांसाठी अर्थमंत्र्यांचा धमाका, ५ लाखांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त!

दरम्यान, यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते बाळा नांदगावकर यांनी ट्वीट करून अर्थमंत्री आणि मोदी सरकारचे आभार मानले आहेत. ‘धन की बात, जन के साथ. आम्ही अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर अर्थमंत्र्यांना ठेवींवरील विमा संरक्षण १ लाखापासून वाढवून ५ लाख करावे आणि कर शुल्क कमी करावे अशी जाहीर मागणी केली होती. त्याची दखल घेऊन आमच्या मागण्या जशाच्या तशा मान्य केल्याबद्दल अर्थमंत्र्यांचे जाहीर आभार. त्यामुळे मध्यमवर्गीयांना मोठा दिलासा मिळेल’, असं नांदगावकरांनी या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.