घरमुंबईमुंबईकरांचा ‘ऑक्सिजन’ संपत चाललाय

मुंबईकरांचा ‘ऑक्सिजन’ संपत चाललाय

Subscribe

उद्यानांकडे पालिकेचे दुर्लक्ष

जसजशी मुंबई वाढत गेली तसतसा मुंबईतील उद्याने आणि दम तोडायला सुरूवात केली. वाढत्या लोकसंख्येबरोबरच घरांची मागणी वाढत गेली आणि आपल्या सोईसाठी उद्याने दुय्यम होत गेली. मुंबईमध्ये 550 उद्याने आणि मैदाने आहेत. पण त्यांना उद्याने किंवा मैदाने म्हणावीत का हाच प्रश्न पडतो? ही उद्याने व मैदान शहराची ऑक्सिजन केंद्रे समजली जातात. उद्याने व मैदानांमध्ये सकाळी व सायंकाळी नागरिक योग व व्यायाम करण्यासाठी जातात.त्यांची वर्षांपासून दुरवस्था होत असल्याने पालिकेकडून कंत्राटदारांकडून मलमपट्टी केली जाते. मात्र, काही दिवसांत उद्यानांची अवस्था ‘जैसे थे’ होते. यामुळे पालिकेकडून खर्च केल्या जाणार्‍या कोट्यवधींच्या निधीचा चुराडा होत आहे.

महापालिकेची उद्यान

राजकीय नेत्यांकडील भूखंडांचे काय ?

मुंबईत सव्वा कोटी लोक राहतात. लोकसंख्येच्या प्रमाणात तरुण मुले, विद्यार्थी यांना खेळायला उद्याने आणि मैदाने उपलब्ध नाहीत. उद्याने आणि मैदानांसाठी विकास आराखड्यामध्ये आरक्षण ठेवण्यात आले आहे. मुंबईतील 216 मोकळे भूखंड खासगी संस्थांना देखभालीसाठी दिले आहेत. संस्थांकडे असलेली मैदाने आणि उद्याने मुंबई महानगरपालिकेने ताब्यात घ्यावीत अशी मागणी जोर धरू लागल्यावर राजकीय नेत्यांकडे असलेले भूखंड वगळता सर्व भूखंड ताब्यात घेण्यात आले. आता पुन्हा खासगी संस्थांना म्हणजेच राजकीय नेत्यांना सदर भूखंड देण्याचे धोरण पालिकेकडून बनवण्यात आले आहे. यामुळे सामान्य मुंबईकरांना खेळण्यासाठी मैदाने व उद्याने मिळतील का, याबाबत शंका आहे.

- Advertisement -

कचरा आणि गर्दुल्ल्यांचे साम्राज्य

लहान मुलांना खेळण्यासाठी उद्यान आहे की नागरिकांना कचरा टाकण्यासाठी किंवा गर्दुल्ल्यांना नशापानी करण्यासाठी असा प्रश्न लोअर परेल पूर्वेकडील ना. म. जोशी मार्गावरील डिलाईल रोड भागातील बीडीडी चाळीतील डॉ. बापूसाहेब म्हसकर उद्यानाला पाहिल्यावर पडतो. लोअर परेल येथील बीडीडी चाळीत हे एकमेव उद्यान असल्याने या मैदानात परिसरातील लहान मुले मोठ्या प्रमाणात खेळण्यासाठी येतात. पण शेजारील इमारतीतून खाली टाकण्यात येणारा कचरा हा थेट उद्यानात पडतो. हा कचरा उचलण्याकडे पालिकेकडून दुर्लक्ष करण्यात येत असल्याने लहान मुलांना कचर्‍यातच खेळावे लागते. नागरिकांकडून उद्यानात भंगाराचे सामानही ठेवले जाते. उद्यानात सुरक्षारक्षक नसल्याने रात्रीच्यावेळी गर्दुल्ले सर्रासपणे नशापानी करत असतात.

हे गर्दुल्ले उद्यानात दारूच्या बाटल्या टाकून जातात, अनेकदा यातील बाटल्या फुटलेल्या असतात. त्यामुळे फुटलेल्या बाटल्या मुलांच्या पायाला लागून त्यांना इजा होण्याची शक्यता असते. सर्वत्र पसरलेला कचरा व दारुच्या बाटल्यांमुळे लहान मुलांना उद्यानात खेळताना त्रास होत असताना उद्यानातील खेळणीही तुटलेली असल्याने मुलांचा पडून अपघात होण्याची शक्यता आहे. उद्यानातील अनेक खेळणी ही चोरीला गेली आहेत. शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत, आमदार सुनील शिंदे व नगरसेविका स्नेहल आंबेकर यांच्या मतदार संघात लोअर परेल हा परिसर येतो. असे असूनही या मैदानाची तीन ते चार वर्षांपासून दुरवस्था झाली आहे. 2009-10 मध्ये उद्यानाचे नुतनीकरण करण्यात आले होते. मात्र, त्यानंतर त्याच्याकडे पालिका व स्थानिक लोकप्रतिनिधींनी विरोध केल्याने त्याची दुरवस्था झाल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे.

- Advertisement -

कार्यक्रमामुळे खेळ बंद

घाटकोपर पंतनगर येथील आचार्य अत्रे मैदान हे या विभागातील सर्वात मोठे मैदान समजले जाते. अत्रे मैदानातील काही भाग ब्रह्मकुमारी या संस्थेला भाडेतत्त्वावर दिला आहेे. उर्वरित भागावर या विभागातील मुले खेळण्यासाठी येतात. या उद्यानात विविध कार्यक्रम केले जातात. हे कार्यक्रम सुट्टीच्याच दिवशी होत असल्याने मुलांनी खेळायचे कुठे असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

डेंग्यू, मलेरियाला कुरण

घाटकोपर पंत नगर विभागातील दुसरे मोठे उद्यान म्हणजे जनरल अरुणकुमार वैद्य उद्यान. या उद्यानावर स्थानिक आमदार व गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता दर दोन वर्षांनी निधी खर्च करतात. उद्यान नवीन झाले की दोन महिन्यांनी त्याच्या जाळ्या तुटणे. उद्यानाची दुरवस्था होणे असे प्रकार सुरू होतात. उद्यानाबाहेर कचरा टाकला जातो तसेच उद्यानात भंगाराचे सामान ठेवले जाते. यामुळे उद्यानात मच्छरांचे साम्राज्य असल्याने उद्यानात येणार्‍यांना मलेरिया डेंग्यूसारखे आजार होण्याची शक्यता आहे.

उद्यानातील जीमच्या साहित्याला गंज

चेंबूर पश्चिमेकडे असलेल्या रघुनाथराव शिसोदे उद्यानाची काही महिन्यांपासून दुरवस्था झाली आहे. शिसोदे उद्यानात नागरिक सकाळी मोठ्या प्रमाणात योग व व्यायाम करण्यासाठी येतात. नागरिकांना व्यायाम करण्यासाठी महापालिकेकडून काही दिवसांपूर्वी उद्यानात ओपन जिम सुरू करण्यात आली होती. यामध्ये व्यायामाचे साहित्यही बसवण्यात आले. मात्र, सामानाची देखरेख ठेवण्यात येत नसल्याने या साहित्याला गंज चढू लागला आहे. त्यामुळे साहित्याचा वापर करण्याचे नागरिकांकडून टाळण्यात येत आहे. रघुनाथराव शिसोदे उद्यानाबाबत स्थानिक नागरिकांनी स्थानिक नगरसेवक आणि पालिकेच्या उद्यान विभागाकडे वारंवार तक्रार करूनही त्याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे.

अनेक महिन्यांपासून दिवे बंद

चेंबूर मधील कै. कुमार जगदीश उर्फ पप्पू डोळस उद्यान सकाळी ६ ते रात्री ९ वाजेपर्यंत सुरू असते. मात्र, उद्यान विभाग एम.चेंबूरच्या ढिसाळ कारभारामुळे हे उद्यान फक्त काही काळच सुरू ठेवले जाते. अनेक महिन्यांपासून उद्यानातील दिवे बंद आहेत. त्यामुळे सायंकाळच्या वेळी या उद्यानात नागरिक येण्याचे टाळतात. तसेच काही दिवसांपूर्वी उद्यानात एका मुलाला शॉक लागला होता. मात्र, तो थोडक्यात बचावला होता. या परिसरातील नागरिकांनी स्थानिक नगरसेवक आणि संबंधित विभागाकडे वारंवार तक्रारी केल्यानंतरही उद्यानातील दिवे सुरू करण्यात आलेले नाहीत. त्यामुळे बृहन्मुंबई महापालिका मुंबईतील उद्यानाच्या विकासासाठी कोट्यवधी खर्च करूनही उद्यानाची परिस्थिती वाईट आहे.

फुलपाखरूचे पार्टी हॉलमध्ये रूपांतर

भाजपचे आमदार प्रवीण दरेकर हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत असताना त्यांनी बोरिवलीतील मागाठाणे येेथे टाटा पॉवरजवळ फुलपाखरू हे उद्यान साकारले होते. ज्येष्ठ छायाचित्रकार मोहन वाघ यांच्या स्मृतीपित्यर्थ ते बनवण्यात आले होते. मात्र आता या उद्यानाचे पूर्णपणे बाजारीकरण करण्यात आले आहे. सध्या मोठ्या प्रमाणात व्यावसायिक वापरासाठी उद्यानाचा वापर करण्यात येत आहे. उद्यानामध्ये लग्न, पार्टी व विविध समारंभ सर्रास करण्यात येतात. त्यामुळे या उद्यानाचा वापर मुलांना खेळण्यासाठी कमी व समारंभासाठी अधिक होतो.

बोरिवलीतील देवीपाडा येथे असलेले मैदान सध्या ओसाड अवस्थेत आहे. या मैदानाचा वापर फक्त दहिहंडी व शिवसेनेच्या कार्यक्रमावेळीच केला जातो. स्थानिक आमदार प्रकाश सुर्वे यांना मैदानात मुलांच्या खेळण्याची साहित्य उपलब्ध करून द्यावे, तसेच हे मैदान अत्याधुनिक करावे असा विचारही येत नाही. याबद्दल परिसरातील नागरिकांकडून खंत व्यक्त करण्यात येत आहे.

मैदानाचे बाजारीकरण

दहिसर पूर्वेकडील अलकनंदा मैदानावर शिवसेनेचे माजी नगसेवक उदेश पाठेकर यांनी बेकायदा ताबा मिळवला आहे. मैदानावर वर्चस्व प्रस्थापित करून पाठेकर यांनी मैदानाचे बाजारीकरण केले आहे. मैदानात त्यांच्यामार्फत खासगी क्रिकेट क्लास, फुटबॉल क्लास चालवले जातात. यासाठी त्यांनी स्थानिक मुलांना खेळण्यासाठी प्रवेश बंद केला आहे.

राजकारणामुळे उद्यानाला फटका

मैदान सम्राट समजले जाणारे खासदार गोपाळ शेट्टी यांनी पुढाकार घेऊन बोरिवली पश्चिमेकडील एक्सर गाव लिंक रोड येथे पालिकेच्या राणी लक्ष्मीबाई उद्यानाचे जॉगर पार्कमध्ये रुपांतर केले होते. हे उद्यान एकेकाळी बोरिवलीतील नंदनवन समजले जात होते. मात्र स्थानिक राजकारणामुळे सध्या मैदानाची दुरवस्था झाली आहे. मैदान भकास झाले असून ते डागडुजीची वाट पाहत आहे.

ठाण्यातील कै धर्मवीर आनंद दिघे उद्यानाची दुरवस्था

शिवसेनेचे ठाणे जिल्हा प्रमुख कै. धर्मवीर आनंद दिघे यांच्या नावाने ठाण्यातील चेंदणी कोळीवाडा परिसरात साकारलेल्या उद्यानाची खूपच दुरवस्था झाली आहे. ठाण्यातील प्रत्येक निवडणुकीत कै. धर्मवीर आनंद दिघे यांच्या नावाने राजकारण चालते. ठाण्यात शिवसेनेची सत्ता असतानाही धर्मवीर आनंद दिघे यांच्या उद्यानाची दुरवस्था झाली आहे. सत्ताधार्‍यांचे याकडे दुर्लक्ष होत असल्याने ठाणेकरांमध्ये व बाळगोपाळांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे.

ठाणे महापालिकेची ११० उद्याने, सात बाल उद्याने, तीन सहलीची ठिकाणे आणि १९ मैदाने आहेत. ठाण्यातील बहुतांशी उद्यानांची अवस्था चांगली असून, अनेक उद्यानात सुरक्षारक्षकही आहेत. मात्र ठाणे पश्चिमेतील चेंदणी कोळीवाडा येथे महापालिकेच्या मालकीचे धर्मवीर आनंद दिघे उद्यान हे अपवाद ठरले आहे. लहान मुलांसाठी या उद्यानाची निर्मिती करण्यात आली. मात्र, उद्यानाच्या नादुरूस्तीमुळे लहान मुले फारसे फिरकताना दिसत नाही. उद्यानात तुटलेली खेळणी तसेच इतर साहित्य व बसण्याची आसने धूळ खात आहेत. उद्यानांची साफसफाई होत नसल्याने अस्वच्छता पसरलेली असते. अनेकवेळा भिकारी आणि गर्दुल्ल्यांनी ठाण मांडलेले असल्याचे स्थानिक नागरिकांकडून सांगण्यात येते. दरवर्षी पालिकेच्या निधीतून या उद्यानाची डागडुजी आणि दुरूस्तीही केली जाते.

महापालिकेच्या शेजारी असलेले शहीद मैदान, दादोजी कोंडदेव स्टेडियम शेजारी असलेले पंडीत जवाहरलाल नेहरू या उद्यानाच्या फलकावरील त्यांच्या नावाची काही अक्षरे गायब झालेली आहेत. त्यामुळे नवख्या माणसाला मैदान शोधताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. मात्र, या किरकोळ गोष्टींकडे पाहण्यास पालिका अधिकार्‍यांकडे वेळ नसल्याने वर्षोनुवर्षे ही नावे जशाच्या तसे मोडलेल्या अवस्थेत आहेत. त्यामुळे महापालिकेकडून महापुरूषांच्या नावाचाही अपमान होत असल्याने संबधितांवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे.

अजेयकुमार जाधव, विनायक डिगे, नितीन बिनेकर, कृष्णा सोनारवाडकर

छायाचित्र : संदीप टक्के, अमित मार्कंडे

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -