घरमुंबईमालमत्ता कर थकविणा-यांच्या गाड्या, वस्तु होणार आता जप्त

मालमत्ता कर थकविणा-यांच्या गाड्या, वस्तु होणार आता जप्त

Subscribe

मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिका प्रशासनाचा कठोर निर्णय गाड्या, वस्तु जप्ती टाळण्यासाठी मालमत्ता कर तातडीने भरण्याचे आवाहन

लोकसंख्या व लोकसंख्येची घनता याचा विचार करता, आशियातील सर्वात मोठी महापालिका ही बृहन्मुंबई महापालिका आहे. आपल्या क्षेत्रातील नागरिकांना पाणी, रस्ते, आरोग्य, मलनि:सारण, स्वच्छता यासारख्या विविध नागरी सोयी सुविधा पुरविण्यासाठी असणारी निधीची आवश्यकता ही ज्या विविध स्रोतांमधून भागविली जाते, त्यामध्ये मालमत्ता कर हा एक आपल्या महापालिकेच्या उत्पन्नाचा महत्त्वाचा स्रोत आहे. चालू आर्थिक वर्षात रुपये ५ हजार ५०० कोटी एवढ्या रकमेची वसूली मालमत्ता करापोटी होणे अपेक्षित होते. मात्र, फेब्रुवारी अखेरपर्यंत केवळ ३ हजार १५४ कोटी एवढीच मालमत्ता कराची वसुली झाली आहे. मालमत्ता कराची झालेली अल्प वसुली लक्षात घेता यंदा प्रथमच अचल संपत्ती सोबतच चल संपत्तीवर देखील जप्तीची कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्याची तात्काळ अंमलबजावणीही सुरु करण्यात आली आहे. त्यामुळे मालमत्ता कर थकबाकीपोटी आता दुचाकी, चारचाकी, घरातील फर्निचर, टिव्ही, फ्रीज आदी वस्तुंवर देखील कारवाई केली जाणार आहे. विलेपार्ले परिसरात नुकतीच करण्यात आलेली दोन हॅलिकॉप्टरवर अटकावणीची कारवाई देखील चल संपत्तीवरील कारवाईचे उदाहरण आहे. त्यामुळे चल व अचल संपत्तीवर होणारी अप्रिय कारवाई टाळण्यासाठी मालमत्ता कर तातडीने भरावा, असे आवाहन बृहन्मुंबई महापालिका प्रशासनाद्वारे करण्यात आले आहे.

मालमत्ता कर थकबाकीपोटी यापूर्वी ‘बृहन्मुंबई महापालिका अधिनियम १८८८’च्या कलम २०३ अन्वये जलजोडणी खंडीत करणे, मालमत्तेची अटकावणी करणे, मालमत्तेची जप्ती करणे यासारखी कारवाई करण्यात येत असे. मात्र, यंदा मालमत्ता कर वसुली अपेक्षेपेक्षा फारच कमी प्रमाणात झाल्याने या कर वसुलीसाठी विविध स्तरीय प्रयत्न करण्यात येत आहेत. या अंतर्गत प्रामुख्याने संबंधित थकबाकीदारांशी संवाद साधणे, सामाजिक माध्यमांसह विविध संवाद माध्यमातून जनजागृती साधणे यासारख्या बाबी देखील सातत्याने करण्यात येत आहेत. मात्र, असे करुनही अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्यास पूर्वी केवळ जलजोडणी खंडीत करणे, मालमत्तेची अटकावणी वा जप्ती करणे यासारखी कारवाई करण्यात येत असे.

- Advertisement -

तथापि, कार्यवाही आणि कारवाई करुन देखील अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याने आता अधिक कठोर कारवाई करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. या अंतर्गत आता प्रथमच ‘बृहन्मुंबई महापालिका अधिनियम १८८८’ च्या कलम २०५ व २०६ चा वापर करुन थकबाकीदारांची दुचाकी, चारचाकी वाहने, फर्निचर, टिव्ही, फ्रीज, वातानुकूलन यंत्रणा यासारख्या चल संपत्ती असणा-या बाबी जप्त करण्याची कारवाई सुरु करण्यात आली आहे. तथापि, ही कारवाई करताना स्त्री-धन, जडजवाहिर, दागिने यासारख्या वस्तु या कारवाईतून वगळण्यात येणार आहेत. दिनांक २५ फेब्रुवारी २०२० रोजी विलेपार्ले परिसरातील एका मालमत्ता थकबाकीदाराचे दोन हॅलिकॉप्टर जप्त करण्यात आले आहेत. यंदा प्रथमच करण्यात येत असलेल्या चल संपत्ती जप्ती सारखी अप्रिय कारवाई टाळण्यासाठी मालमत्ता धारकांनी त्यांच्या करांचा भरणा शेवटच्या तारखेची वाट न बघता तातडीने करावा, असे आवाहन बृहन्मुंबई महापालिका प्रशासनाद्वारे करण्यात आले आहे.

आर्थिक वर्ष २०१६–१७ आणि आर्थिक वर्ष २०१७–१८ मध्ये ५ हजार ४०० कोटी रुपये मालमत्ता करापोटी जमा करण्याचे लक्ष्य निर्धारित करण्यात आले होते. या दोन्ही वर्षात अनुक्रमे रुपये ४ हजार ८४७ कोटी आणि ५ हजार १३२ कोटी रुपये महापालिकेकडे जमा करण्यात आले होते. तर त्यानंतरच्या वर्षी म्हणजेच आर्थिक वर्ष २०१८–१९ मध्ये ५ हजार ४३९ कोटी एवढे लक्ष्य होते, ज्यापैकी ५ हजार ४० कोटी एवढी वसुली झाली होती. तर यंदाच्या आर्थिक वर्ष २०१९–२० मध्ये ५ हजार ५०० कोटी एवढे लक्ष्य ठरविण्यात आले असून ज्यापैकी २४ फेब्रुवारी २०२० पर्यंत केवळ ३ हजार १५४ कोटी रुपयांचा भरणा मालमत्ता धारकांनी केला आहे. हे लक्षात घेता, यंदाची मालमत्ता कर वसुली ही लक्ष्यापेक्षा सुमारे २ हजार ३४६ कोटींनी मागे आहे. जी गेल्या काही वर्षांच्या तुलनेत लक्षणीय प्रमाणात कमी आहे. ही बाब लक्षात घेता आणि आर्थिक वर्ष संपण्यास केवळ एका महिन्याचा कालावधी शिल्लक आहे, हे देखील विचारात घेता दररोज किमान ८० कोटींची मालमत्ता कर वसुली करण्याचे लक्ष्य आता निर्धारित करण्यात आले असून त्यासाठी मालमत्ता व वस्तु जप्तीसारखी अप्रिय व कठोर कारवाई देखील सुरु करण्यात आली आहे. ही कारवाई टाळण्यासाठी मालमत्ता कर धारकांनी आपल्या मालमत्ता कराचा भरणा तातडीने करण्याचे आवाहन महापालिकेच्या करनिर्धाकर व संकलक खात्याद्वारे करण्यात आले आहे.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -