महाडपाठोपाठ मुंबईतही इमारत दुर्घटना; घटनास्थळी मोठी गर्दी!

mumbai nagpada building collapse incident

तीन दिवसांपूर्वी रायगडच्या महाडमध्ये एका ५ मजली इमारतीचे ३ मजले कोसळले होते. या दुर्घटनेत १० जणांचा मृत्यू झाला असून काही जण जखमी झाले होते. ही घटना ताजी असतानाच आता मुंबईच्या नागपाड्यातही अशीच काहीशी दुर्घटना घडली आहे. नागपाड्यात एका जुन्या इमारतीचा काही भाग दुपारच्या सुमारास कोसळला आणि परिसरात एकच गोंधळ सुरू झाला. घटनेची माहिती मिळताच मुंबई महानगर पालिका आणि अग्निशमन दलाच्या पथकांनी घटनास्थळी धाव घेतली आणि बचाव कार्य सुरू केलं. ग्राऊंड फ्लोअर आणि वर २ मजली असणारी मिश्रा बिल्डिंग नागपाड्याच्या आयेशा कंपाऊंडमध्ये आहे. या इमारतीच्या एका मजल्यावरच्या टॉयलेटचा काही भाग दुपारी १ च्या सुमारास अचानक कोसळला.

ताजी माहिती मिळेपर्यंत अग्निशमन दलाच्या ५ गाड्या, १०८ रुग्णवाहिका आणि पालिका कर्मचाऱ्यांचं पथक तातडीने घटनास्थळी दाखल झालं असून वेगाने बचावकार्य सुरू आहे. पाऊस पडत नसल्यामुळे या ठिकाणी बचावकार्य करण्यात मदत होत असल्याचं सांगितलं जात आहे. अजूनही घटनास्थळावरचा ढिगारा उपसण्याचं काम सुरू असून काही जण ढिगाऱ्याखाली अडकले असण्याची शक्यता आहे. दरम्यान, या घटनेत अद्याप कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचं समजतंय.