घरगणपती उत्सव बातम्यागणेशोत्सव महामंडळाचा लोकांना ‘मानसिक आधार’

गणेशोत्सव महामंडळाचा लोकांना ‘मानसिक आधार’

Subscribe

काळाचौकी विभाग सार्वजनिक उत्सव मंडळाने नागरिकांसाठी मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टरांच्या कार्यशाळेचे आयोजन केले आहे.

कोरोनामुळे मुंबईसह महाराष्ट्र संकटात सापडला आहे. त्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाला यंदा गणेशोत्सव साधेपणात आणि आरोग्य सेवा वर्ष म्हणून साजरा करण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार सार्वजनिक मंडळांनी ठिकठिकाणी आयोजित केलेल्या रक्तदान शिबिर, आरोग्य शिबिर आणि प्लाझ्मा दान शिबिरांमुळे यंदा गणेशोत्सवाला आरोग्य उत्सवाचे रूप प्राप्त झाले आहे. मात्र, या आरोग्य सेवेत काळाचौकी विभाग सार्वजनिक उत्सव मंडळ नागरिकांना मानसिक संतुलन सुधारण्यासाठी विशेष प्रयत्न करत आहे. मंडळाने नागरिकांसाठी मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टरांच्या कार्यशाळेचे आयोजन केले आहे.

नागरिकांचे मानसिक संतुलन सुधारणार 

राज्यासह देशभरात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन लागू करण्यात आले होते. यामुळे गेल्या चार महिन्यांपासून अनेक उद्योगधंदे बंद होते. त्यामुळे अनेकांच्या हाताला काम नाही. अनेक नागरिकांच्या या काळात नोकर्‍या गेल्या आहेत. आर्थिक परिस्थिती दुबळी झाली असून कुटुंबियांचा गाडा हाकलणे कठीण झाले आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये ताण-तणाव वाढला आहे. याची परिणती कधीकधी मानसिक आजारातही होऊ शकते. या आजाराला वयही नसते. त्यातून बाहेर पडण्यासाठी मानसोपचार तज्ज्ञांची मदत उपयुक्त असते. त्यामुळे यंदा कोरोनाचे संकट बघता काळाचौकी विभाग सार्वजनिक उत्सव मंडळाने रक्तदान शिबिर आरोग्य शिबिराबरोबरच आता नागरिकांसाठी ऑनलाईन मानसोपचार कार्यशाळा घेण्यात येणार आहे. ज्यामध्ये नागरिकांना मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टरांची कार्यशाळा मार्गदर्शन करण्यात येणार आहे. तसेच त्यांच्या समस्या ऐकून घेऊन त्यांच्या प्रश्नाचे उत्तर मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टरांकडून देण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांचे मानसिक संतुलन सुधारण्यात मदत होणार आहे, अशी माहिती काळाचौकी विभाग सार्वजनिक उत्सव मंडळाने दैनिक आपलं महनगरशी बोलताना दिली आहे.

- Advertisement -

मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टरांची अशी असणार कार्यशाळा

मंडळाकडून मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टरांची कार्यशाळा नि:शुल्क असणार आहे. या कार्यशाळेत सहभाग घेण्यासाठी अगोदर काळाचौकी विभाग सार्वजनिक उत्सव मंडळाकडे नोंदणी करायची आहे. ही संपूर्ण मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टरांची कार्यशाळा ऑनलाईन असणार आहे. प्रत्येक कार्यशाळेत सहभागी होणार्‍या नागरिकांना पासवर्ड आणि युजर आयडी मंडळाकडून देण्यात येणार आहे. एका कार्यशाळेत जवळ जवळ ३०० नागरिकांना सहभाग घेता येणार आहे. तसेच मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टरांकडून नागरिकांच्या उपचारासंबंधी सल्ले सुध्दा देण्यात येणार आहेत, अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष विजय लिपारे यांनी दैनिक आपलं महानगरशी बोलताना दिली आहे.

विविध शिबिरांचे आयोजन

मंडळाने रविवारी रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. एकूण १८१ नागरिकांनी रक्तदान केले आहे. तसेच काळाचौकीच्या महागणपती कार्यालयात प्राथमिक आरोग्य तपासणी सुरु करण्यात आली आहे. आरोग्य शिबिरांबरोबरच विविध आजारांच्या चाचण्या, मोफत औषध वाटप तसेच महिलांसाठी कर्करोग तपासणी शिबिरही मंडळाच्या वतीने आयोजित केले जात आहे. तसेच कोरोनाशी लढा देण्यासाठी काळाचौकी विभाग सार्वजनिक उत्सव मंडळाच्या वतीने मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी ३ लाख २ हजार ६६० रुपये निधी देण्यात आला आहे.

- Advertisement -

ऑनलाईन चॅलेंज आंतर विभागीय स्पर्धा

दरवर्षी मंडळाकडून गणेशोत्सवाच्या कालावधीत विद्यार्थ्यांना अभ्यासात सहाय्य करणारे उपक्रम आणि स्पर्धा राबवण्यात येतात. मात्र, यंदा कोरोनाचा संसर्ग लक्षात घेता मंडळाकडून ‘ऑनलाईन चॅलेंज’ आंतर विभागीय स्पर्धांचे आयोजन केले आहे. ज्यामध्ये विविध वयोगटातील स्पर्धकांसाठी वक्तृत्व स्पर्धा, आंतरविभागीय एकेरी नृत्य स्पर्धा, घरगुती गणेश दर्शन स्पर्धा असे विविध स्पर्धांचे आयोजन केले जाणार आहे. त्यामुळे मुलांच्या कलागुणांना वाव मिळणार आहे.

Nitin Binekar
Nitin Binekarhttps://www.mymahanagar.com/author/bnitin/
गेल्या ५ वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सार्वजनिक वाहतूक, शैक्षणिक विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -