घरमुंबईनेरूळ-खारकोपर रेल्वे मार्गाला मुहुर्त सापडेना

नेरूळ-खारकोपर रेल्वे मार्गाला मुहुर्त सापडेना

Subscribe

प्रवाशांची प्रतीक्षा संपेना

नवी मुंबई: सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी सिडकोच्या संचालक पदाची सूत्रे हाती घेताच अनेक महत्वाचे प्रकल्प मार्गी लावण्यावर भर दिला. नेरूळ-खारकोपर रेल्वे मार्गाचा मुहुर्त त्यांना सापडेनासा झाला आहे. १५ ऑगस्ट, २ ऑक्टोबर, असे लोकेश चंद्र यांनी काढलेले मुहुर्त चुकले. त्यामुळे नेरूळ-खारकोपर रेल्वे मार्गाचा ‘चंद्र’ कधी उगवणार अशी चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे.

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळासह अनेक महत्वाचे प्रकल्प पनवेल भागात येत असल्याने अनेक नोड झपाट्याने विकसित झाले आहेत. त्यातील उलवे नोडमध्ये नागरिकांची वाढ झाल्याने तेथील नागरिकांना उलवे ते नेरूळ असा रोज खासगी गाड्यांनी प्रवास करावा लागतो. याचा भार नेरूळ रेल्वे स्थानक परिसरात पडताना दिसतो. नेरूळ रेल्वे स्थानकाच्या पूर्व भागात उरणला गाड्या जात असल्याने सायंकाळच्या सुमारास या ठिकाणी मोठ्या रांगा लागल्याचे दिसून येते. या सर्वांना नेरूळ – खारकोपर रेल्वे मार्ग सुरू होण्याची प्रतीक्षा आहे.

- Advertisement -

व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी नुकताच खारकोपर रेल्वे स्थानकाचा पाहणीदौरा केला. त्यावेळी २ ऑक्टोबरपर्यंत या मार्गावर रेल्वे सुरू होईल, अशी शक्यता त्यांनी वर्तवली होती. मात्र तोही मुहूर्त चुकल्याने आता पुन्हा ही सेवा कधी सुरु होणार, हा प्रश्न कायम आहे. दसरा अथवा दिवाळीच्यामध्येच ही सेवा सुरू होईल असे सांगण्यात येत असले तरीही आता सिडको अधिकारी निश्चित तारीख सांगण्यास नकार देत आहेत.

लोकेश चंद्र यांनी पदभार स्वीकारल्यानंतर २४ जून रोजी त्यांनी खारकोपर रेल्वे स्थानकाची पाहणी केली आणि नेरुळ – खारकोपर रेल्वे सेवा स्वातंत्र्य दिनी सुरु होईल, असे जाहीर केले. मात्र स्वातंत्र्यदिनी रेल्वे सुरु न झाल्याने कोणत्या आधारे लोकेश चंद्र यांनी रेल्वे सुरू होणार अशी घोषणा केली होती, असा प्रश्न उपस्थित झाला होता. नेरुळ-उरण रेल्वे मार्गावर १० स्थानके असून त्यातील पहिल्या टप्प्यात नेरुळ ते खारकोपर हा मार्ग सुरू करण्यात येणार आहे. तरघर स्थानकाचे बरेच काम अजून व्हायचे बाकी आहे.

- Advertisement -

तरघर रेल्वे स्थानकाचे काम पूर्ण झाले तरी पहिल्या टप्प्यात या स्थानकावर उपनगरीय रेल्वे थांबणार नाही. परंतु तरघर स्थानकाचे आवश्यक कामही पूर्ण न झाल्यामुळे रेल्वेला त्यापुढील कामे करता येत नाहीत. सीवूडस् ते खारकोपर या पहिल्या टप्प्याचे अंतर १२ किमी असून पुढे खारकोपर ते उरण हे अंतर १५ किमी आहे. एकूण २७ किमीचे हे रेल्वे जाळे विकसित करण्यासाठी सिडकोकडून ६७ टक्के आणि रेल्वेकडून ३३ टक्के गुंतवणूक करण्यात येत आहे. या मार्गावरील एकूण १७८२ कोटी रुपये खर्चाचा हा प्रकल्प असून यात ४ उड्डाणपूल, १५ सबवे मार्गिका, रस्ते यांचा समावेश आहे. सर्व रेल्वे स्थानकांवर दुहेरी फलाट, प्रवाशांसाठी भुयारी पादचारी मार्ग, पिण्याचे पाणी, रेल्वे कार्यालये आणि सलग्न सुविधा व फोरकोर्ट एरियाचा विकास, या सर्व विकासकामांचा समावेश आहे.

२ ऑक्टोबरपर्यंत नेरूळ ते खारकोपर मार्गावर रेल्वे सुरू करण्याचे आमचे प्रयत्न असतील, असे सांगण्यात आले होते. मात्र रेल्वे प्रशासनाकडून यात दिरंगाई होत असल्याने आता नक्की तारीख सांगता येणार नाही. सिडकोकडून स्थानकांची सर्व कामे झाली आहेत. आता फक्त रेल्वेची कामे बाकी आहेत. त्यांच्या कामानंतरच ही सेवा कधी सुरू होईल हे सांगता येईल.
प्रिया रणतांबे, प्रशासन अधिकारी, सिडको.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -