Wednesday, February 24, 2021
27 C
Mumbai
घर मुंबई वरळी स्मशानातील अंत्यदर्शन आता परदेशातील नातेवाईकांना ऑनलाईन घेता येणार

वरळी स्मशानातील अंत्यदर्शन आता परदेशातील नातेवाईकांना ऑनलाईन घेता येणार

Related Story

- Advertisement -

मुंबईतील वरळी येथील स्मशानभूमीत मुंबई महानगरपालिकेकडून अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत.या स्मशानभूमीत पालिकेकडून आठ विद्युतदाहिन्या, प्रार्थनास्थळ आणि ‘नक्षत्र उद्यान’ विकसित करण्यात येणार आहे. तसेच परदेशात राहणाऱ्या जवळच्या व्यक्तीला अथवा नातेवाईकांना ऑनलाईन अंत्यदर्शन अशी सुविधा महापालिकेने उपलब्ध केली आहे. अशा प्रकारचे नियोजन असणारी ही महापालिकेची पहिलीच स्मशानभूमी असल्याचे महापौर किशोरी पेडणेकर यांनी सांगितले. मृत व्यक्तीचे कोणी नातेवाईक, मित्र, परिचित हे दूर परदेशात असतील तर त्यांना काही अडचणींमुळे तेथून मुंबईत अंत्यसंस्काराला उपस्थित राहता येत नाही. ही अडचण ओळखून आता वरळी येथील स्मशानभूमीत खासगी सहभागातून आधुनिक यंत्रसामग्रीचा वापर करून अंत्यसंस्काराचे व्हिडीओ रेकॉर्डिंग करून त्याची लिंक पालिकेच्या वेबपोर्टलवर ठेवण्यात येणार असून ती लिंक घेऊन ते अंत्यसंस्कार परदेशातील व्यक्तींना, नातेवाईकांना आणि मित्रमंडळी यांना ऑनलाईन पाहता येणार आहेत.

मुंबई शहरात अशा प्रकारचा प्रयोग वरळी येथील माता रमाई आंबेडकर स्मशानभूमी येथे करण्यात येणार आहे. येत्या ऑक्टोबर २०२१ पर्यंत ही सुविधा उपल्बध होणार आहे. त्यासाठी हिरालाल पारीख परिवार चॅरिटेबल ट्रस्टतर्फे ४० कोटी रुपये खर्चण्यात येणार आहेत. दादरच्या छत्रपती शिवाजी महाराज मैदानाजवळील भागोजी किर आणि वरळी येथील माता रमाई आंबेडकर स्मशानभूमीची मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी आज पाहणी करून पहिल्या टप्प्यातील कामाचा संबंधित महापालिका अधिकाऱ्यांकडून आढावा घेतला. यावेळी जी/दक्षिण विभागाचे प्रभाग समिती अध्यक्ष दत्ता नरवणकर जी / उत्तर विभागाचे सहाय्यक आयुक्त किरण दिगावकर, जी /दक्षिण विभागाचे सहाय्यक आयुक्त श्री.शरद उघडे, अभिजीत पाटील तसेच संबंधित महापालिका अधिकारी उपस्थित होते.

- Advertisement -

वरळी स्मशानभूमी ही मुंबईतील सर्वात मोठ्या स्मशानभूमीपैकी एक असलेली ही स्मशानभूमी आहे. महापालिकेच्या साडेनऊ एकर जागेमध्ये ही व्यापलेली आहे. सध्या एका सामाजिक संस्थेच्या वतीने तीन टप्प्यांमध्ये स्मशानभूमीच्या नूतनीकरणाचे काम करण्यात येत आहे. पहिल्या टप्प्याचे काम सद्यस्थितीत वेगाने सुरू असल्याचे महापौरांनी सांगितले.
या स्मशानभूमीत आठ विद्युतदाहिनीची व्यवस्था असणार आहे. प्राथमिक सोयी सुविधांनी सुसज्ज, अशी ही स्मशानभूमी असंणार आहे. येथील विकास कामांच्या अंतर्गत स्मशानभूमीत होणाऱ्या अंत्यसंस्काराच्या संपूर्ण विधीचे व्हिडिओ रेकॉर्डिंग होणार असून याची लिंक तयार करून ही लिंक महापालिकेच्या पोर्टलवर टाकण्यात येणार असल्याचे महापौरांनी सांगितले.
जेणेकरून एखाद्या अंत्यसंस्काराच्या वेळी कोणी नातेवाईक परदेशातून अंत्यसंस्काराला उपस्थित राहू शकला नाही तर या लिंकच्या माध्यमातून अंत्यसंस्काराचा विधी ते परदेशात बसून बघू शकतील, अशा प्रकारची नियोजन करणारी ही पहिली स्मशानभूमी असणार आहे.

त्यासोबतच अंत्यसंस्कारापूर्वी करण्यात येणारा प्रार्थनेसाठी याठिकाणी प्रार्थनास्थळसुद्धा विकसित करण्यात येणार आहे. तसेच, रुंद रस्ते, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, स्वच्छता आणि पर्यावरणपूरक व्यवस्था यावर विशेष भर देण्यात येणार आहे.
त्याचप्रमाणे, या स्मशानभूमीलगतच्या परिसरामधील नक्षत्र उद्यानाचाही विकास करण्यात येणार असल्याचे महापौरांनी सांगितले. आगामी अडीच ते तीन वर्षांमध्ये हे संपूर्ण काम पूर्ण होणार असून अत्याधुनिक सोयी सुविधांनी सुसज्ज अशी ही स्मशानभूमी तयार करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.


हेही वाचा- Corona In Maharashtra: चिंताजनक! राज्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत पुन्हा वाढ

- Advertisement -

 

- Advertisement -