घरमुंबईपूर्ण करता येतील अशीच स्वप्न दाखवा - नितीन गडकरी

पूर्ण करता येतील अशीच स्वप्न दाखवा – नितीन गडकरी

Subscribe

'जी पूर्ण होऊ शकतील अशीच स्वप्न दाखवा', असं म्हणत केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप सरकारला अप्रत्यक्षपणे टोला लगावला आहे.

एकीकडे देशभरात सध्या आगामी लोकसभा निवडणुकांचा फड रंगात येऊ लागलेला असतानाच आता केंद्रीय वाहतूक मंत्री आणि भाजपचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांनीच भाजप सरकारचे कान टोचले आहेत. ‘सपने वहीं दिखाओ, जो पूरे हो. लोगोंको सपने दिखाने वाले पसंद है. मगर सपने पूरे नहीं हुए, तो लोग पिटाई करते है’, अशा शेलक्या शब्दांमध्ये नितीन गडकरींनी आपल्याच सरकारला अप्रत्यक्षपणे टोमणा मारला आहे. विशेषत: विरोधकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी खोटी आश्वासनं देत असल्याचं सांगत रान उठवलेलं असताना नितीन गडकरींनी असं विधान करणं याच्या राजकीय संदर्भांवरून आता चर्चा रंगू लागली आहे. नवभारतीय वाहतूक संघटनेच्या वेबसाईट लाँचचा कार्यक्रम मुंबईत पार पडला. या कार्यक्रमात नितीन गडकरी बोलत होते.

‘मी नुसती स्वप्न दाखवत नाही’

दरम्यान, भाजपच्या केंद्रीय नेतृत्वावर अप्रत्यक्षपणे टीका करताना नितीन गडकरींनी त्यांच्या कामाची पद्धत देखील उपस्थितांना सांगितली. ‘मी कोणत्याही कामाबद्दल फक्त स्वप्न दाखवणाऱ्यांपैकी नाही. मी काम करतो. त्यामुळे पत्रकार मला प्रश्न विचारू शकत नाहीत. मी स्वप्न पूर्ण करतो’, असं ते यावेळी म्हणाले. नितीन गडकरींच्या या वक्तव्यामुळे भाजप अडचणीत येण्याची शक्यता आहे.

- Advertisement -

२०१४च्या लोकसभा निवडणुकांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिलेली प्रत्येकाच्या खात्यात १५ लाख, काळा पैसा भारतात आणणार, करबुडव्यांना शिक्षा करणार या आश्वासनांची अजूनही पूर्तता झालेली नसताना विरोधतांनी यावरून सरकारला वेळोवेळी घेरलं आहे. त्यामुळे नितीन गडकरींनी केलेलं हे वक्तव्य भाजपला घरचा आहेर मानला जात आहे.

मार्चमध्ये काय होईल माहीत नाही!

दरम्यान, यावेळी ‘मार्च महिन्यात काय होईल, हे मला माहीत नाही’, असं सूचक वक्तव्य देखील नितीन गडकरींनी केलं. ‘वाहतूक मंत्री म्हणून माझ्या ५ वर्षांच्या कालखंडात मी देशात होणारे अपघात ५० टक्क्यांनी कमी करू शकेन अशी मला आशा होती. पण तसं झालं नाही. आणि आता मार्चमध्ये काय होईल, हे मला माहीत नाही’, असं गडकरी म्हणाले. त्यामुळे आता त्यांच्या या वक्तव्याचा संदर्भ येणाऱ्या लोकसभा निवडणुकांमध्ये भाजपच्या कामगिरीशी जोडला जाऊ लागला आहे.

- Advertisement -

मुंबई-दिल्ली हायवेवर इलेक्ट्रिक ट्रक!

‘मुंबई-दिल्ली हायवेवर सध्या इलेक्ट्रिक ट्रक चालवण्याचा सरकारचा विचार आहे. जेणेकरून विजेच्या तारांवर देखील हे ट्रक चालतील’, असं यावेळी नितीन गडकरी म्हणाले. तसेच, ‘नवी मुंबईत विमानतळ बनण्याआधी मुंबई ते नवी मुंबई एअरबोट सुरू होईल’, असं आश्वासन यावेळी गडकरींनी दिलं.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -