घरमुंबईपाणी नाही तर मत नाही

पाणी नाही तर मत नाही

Subscribe

शहरातील नागरीकांची भूमिका

पाणी नाही, तर मत नाही, असा नागरिकांचा आक्रोश पनवेलमधील शहरी भागातील तळोजा, खारघर, रोडपाली, कामोठे येथे होत आहे. गेल्या काही दिवसांपासून नागरिकांनी विद्यमान आमदारांना धडा शिकविण्याचे तंत्रच हाती घेतले असल्याचे समोर आले आहे.

मागील विधानसभा निवडणुकीत पनवेल तालुक्यातून भाजपचे आमदार प्रशांत ठाकूर पिछाडीवर होते. मात्र येथील शहरी भागाने त्यांना तारले. मात्र याच शहरी भागाने आपल्याला होणार्‍या कटकटीपासून सावध भूमिका घेत पोकळ आश्वासनांना भीक न घालता मतदानावर बहिष्कार टाकण्याचे अस्त्र उभे केले असल्यामुळे राजकीय पक्षांच्या भुवया उंचावल्या आहेत. सिडको वसाहतींमध्ये नागरिकांना मूलभूत प्रश्नांशी सामना करावा लागतो. तळोजा, खारघर, रोडपाली या भागात नागरिकांना मुबलक पाणी मिळत नसल्यामुळे लाखो रुपयांचे पाणी खरेदी करावे लागते. यंदा सरासरीपेक्षा पाऊस अधिक झाला असला तरी भरपावसात घरातल्या नळाला पाणी नव्हते. लाखो रुपये खर्चून टँकरचे पाणी या नागरिकांना घेण्याची वेळ सिडको प्रशासन तसेच पनवेल महापालिकेमुळे आली. त्यामुळे संतप्त नागरिकांनी पाणी नाही, तर मत नाही, अशी तक्रार सुरु केली. याचे लोण पसरून खारघरच्या सेक्टर 34 सह रोडपालीतील सेक्टर-1 मधील 324 सदनिका असलेल्या मोठ्या स्प्रिंग या रहिवासी संकुलात सोसायटीतही अशी भूमिका घेण्यात आली.

- Advertisement -

कामोठे वसाहतीतील नागरिकांनी एकत्र येत मतदान न करण्याची भूमिका जाहीर केली. 10 वर्षांपूर्वी निर्माण झालेल्या कामोठे वसाहतीत विकासकामे होत नाहीत. सेक्टर-36 मधील सार्वजनिक उद्यानांत, बगिच्यांत नागरिकांना स्वच्छतागृहांची सोय नाही, महापालिकेकडे वारंवार पाठपुरावा करूनही सर्वसामान्य नागरिकांच्या हाती काही लागले नाही. रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांविषयी महापालिकेकडे तक्रार केल्यास सिडकोकडे बोट दाखविले जाते. सिडको महापालिकेला दोष देते, अशा परिस्थितीत सर्वसामान्य नागरिकांनी करायचे काय, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. सेक्टर-36 मधील वेल्फेअर ग्रुपच्या नागरिकांनी एकत्र येत रविवारी बैठक घेऊन हा निर्णय जाहीर केला. विकास नाही, मतदान नाही, अशा आशयाचे फलक लावून यंदाच्या मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय जाहीर केला. या शहरी भागात नागरिकांनी घेतलेल्या निर्णयाला त्यांच्या जवळपासच्या सोसायट्यांकडूनही पाठिंबा दर्शविण्यात आल्यामुळे शहरी भागाच्या मतदानाचा फटका नेमका प्रशांत ठाकूर यांना बसण्याची चिन्हे अधिक आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -