घरमुंबईआता बदलापूर ‘मेट्रो'ला प्राधान्य

आता बदलापूर ‘मेट्रो’ला प्राधान्य

Subscribe

मुंबई, ठाण्यानंतर लवकरच बदलापूरकरांचेही मेट्रोचे स्वप्न पूर्ण होणार आहे. मुख्यमंत्र्यांनीही हा प्रकल्प तातडीने मार्गी लावण्याचा आदेश दिला आहे.

लोकसभा निवडणुकीत मुंबईच्या परिघातून मिळालेला भरघोस प्रतिसाद लक्षात घेऊन युती शासनाने या परिसरातील विकास कामे मार्गी लावण्यासाठी आचारसंहिता संपताच पावले उचलली आहेत. ‘एमएमआरडीए’ आयुक्त आर.ए.राजीव यांनी नुकत्याच आयोजित एका बैठकीत बदलापूर मेट्रोचे सर्व सोपस्कार पूर्ण करून येत्या दहा महिन्यात प्रत्यक्ष कामाला सुरूवात होईल, अशी ग्वाही दिली आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या वांद्रे येथील मुख्य कार्यालयात नुकतीच ही बैठक पार पडली. स्थानिक आमदार किसन कथोरे यांनी चार महिन्यांपूर्वी बदलापूर मेट्रोची मागणी केली होती.

मेट्रोमुळे बदलापूरकरांचे दळणवळण होणार सुलभ

सध्या बदलापूरहून मुंबईला ये-जा करण्यासाठी उपनगरी रेल्वे सेवा हाच एक पर्याय आहे. अपुऱ्या रस्त्यांमुळे वाहनाने बदलापूरहून मुंबईला ये-जा करणे गैरसोयीचे आहे. शीळफाटा असो वा भिवंडी बायपास कोणत्याही मार्गाने प्रवास केला तरी अनेकदा वाहतूक कोंडीमुळे वेळ आणि इंधनाचा अपव्यय होतो. त्यावर उपाय म्हणून बदलापूर मेट्रोची कल्पना मांडण्यात आली आहे. कल्याण पलिकडच्या शहरांकडे मुंबई महानगर प्रदेश प्राधिकरणाने दुर्लक्ष केल्याची या भागातील रहिवाशांची भावना आहे. मेट्रोमुळे या भागातील दळणवळण सुलभ होऊ शकेल. त्यामुळे ठाणे, कल्याणप्रमाणेच बदलापूरही मुंबईही मेट्रोच्या जाळ्याचे जोडण्याची महत्त्वाकांक्षी योजना हाती घेण्यात आली आहे.

- Advertisement -

प्रकल्प तातडीने मार्गी लावण्याचे आदेश

कांजूरमार्ग, शीळफाटा, काटई, अंबरनाथ, बदलापूर, वांगणी अशी ही मेट्रो असेल. काटई-कर्जत रस्त्याला समांतर ही मेट्रो धावेल. याच भागात आनंदनगर औद्योगिक वसाहत आहे. या भागात नागरी वस्तीही झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे येथील रहिवाशांना मुंबईतील मध्य आणि पश्चिम उपनगरांमध्ये ये-जा करणे या मेट्रोमुळे सहज शक्य होणार आहे. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा प्रकल्प तातडीने मार्गी लावण्याचे आदेश दिले आहेत. या मार्गासाठी प्रकल्प तयार करण्यासाठी तंत्र सल्लागार नेमण्यापासून निविदा मंजूर करून प्रत्यक्ष काम सुरु करण्यासाठी दहा महिन्याचा कालावधी लागेल.

येत्या दहा महिन्यात प्रत्यक्ष कामाला सुरूवात होणार

येत्या दहा महिन्यात शिळफाटा- काटई- कल्याण -बदलापूर – वांगणी या प्रस्तावित मेट्रोच्या कामास प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली जाईल. एकूण ४५ किमीचे हे अंतर आहे. येत्या आठवड्यात अधिकारी प्रत्यक्ष मार्गाची पहाणी करून अहवाल सादर करतील. या प्रकल्पाला आवश्यक कारशेडसाठी लागणारी जमीन बदलापुर पालिका देण्यास तयार असल्याने अडचण येणार नाही, असेही आर.ए.राजीव यांनी सांगितले. या प्रकल्पामुळे बदलापूर मुंबईच्या अधिक जवळ येईल, असा विश्वाास आमदार किसन कथोरे यांनी व्यक्त केला आहे.

मेट्रोच्या कारशेडसाठी लागणारी जमीन देण्याबाबत बदलापूर पालिकेने ठराव केला आहे. जागेचे आरक्षण बदलण्याचे अधिकार एमएमआरडीएला आहेत. त्यामुळे कोणतीही अडचण उद्भवणार नाही.
प्रकाश बोरसे, मुख्याधिकारी, कुळगांव-बदलापूर नगरपरिषद.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -