धारावी गॅस सिलेंडर दुर्घटना ; एकाचा मृत्यू, ९ जण गंभीर

सर्व जखमींना तात्काळ नजीकच्या सायन रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले

One killed, nine seriously injured in Dharavi gas cylinder accident
धारावी गॅस सिलेंडर दुर्घटना ; एकाचा मृत्यू, ९ जण गंभीर

धारावी, शाहू नगर, कमलानगर, मुबारक हॉटेलसमोरील एका चाळीच्या ठिकाणी रविवारी दुपारच्या सुमारास गॅस सिलिंडरचा भीषण स्फोट होऊन त्यात १७ जण जखमी झाले होते. त्यापैकी ५ जण गंभीर जखमी झाले होते. त्यांच्यावर सायन रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मात्र त्यापैकी एक असलेल्या सोनू जयस्वाल (८) या लहान मुलाचा मृत्यू झाला आहे. तर प्रमोद यादव (३७) आणि मेहरूनिसा खान (४०/ महिला) या दोघांनी डिस्चार्ज घेतला आहे. तर गंभीर लोकांची संख्या ९ वर गेली असून त्यापैकी तिघेजण व्हेंटिलेटरवर आहेत.

प्राप्त माहितीनुसार, रविवारी दुपारी १२.१० वाजताच्या सुमारास धारावी, शाहू नगर, कमलानगर येथील मुबारक हॉटेलसमोरील भागातील एका चाळीच्या ठिकाणी असलेल्या गल्लीत एका व्यक्तीने गॅस गळती होत असलेला गॅस सिलिंडर घाबरून घराबाहेरील उघड्या जागेत आणून ठेवला होता. मात्र त्या व्यक्तीच्या अक्षम्य हलगर्जीपणामुळे गॅस सिलिंडरमधील गळती लागलेल्या गॅसचा आगीशी संपर्क होऊन भीषण स्फोट झाल्याने संपूर्ण परिसर हादरून गेला होता.

या दुर्घटनेनंतर अग्निशमन दलाने तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य केले व सर्व जखमींना तात्काळ नजीकच्या सायन रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. या सर्व जणांवर सायन रुग्णालयात कक्ष क्रमांक १५ मध्ये उपचार सुरू होते. या गॅस स्फोटाला जबाबदार संबंधित दोषी व्यक्तीला पोलिसांनी शोधून काढले व कायदेशीर कारवाईसाठी ताब्यात घेतले आहे. तर, शौकत अली (५८), अंजु गौतम (२८) आणि सांतरादेवी जयस्वाल (४० महिला) हे तिघेजण गंभीर अवस्थेत व्हेंटिलेटरवर आहेत. तसेच, प्रेम जयस्वाल (३२), अंजु गौतम (२८ महिला), अलिना अन्सारी (५ मुलगी), राजेश जयस्वाल (४५), फिरोज अहमद (३५), अत्ताझम अन्सारी (४ लहान मुलगा), अमिनाबीबी हे ९ जण गंभीर अवस्थेत उपचार घेत आहेत. तर, उर्वरित ५ जणांची प्रकृती स्थिर असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.


हेही वाचा : सचिन वाझेंवर खासगी रुग्णालयात होणार शस्त्रक्रिया