घरताज्या घडामोडीगलवान खोऱ्यातील सैन्यांच्या नावाखाली मुंबईतील व्यापऱ्याची फसवणूक

गलवान खोऱ्यातील सैन्यांच्या नावाखाली मुंबईतील व्यापऱ्याची फसवणूक

Subscribe

गलवान खोऱ्यातील भारतीय सैनिकांना सेफ्टीग्लास पाठवण्याच्या नावाखाली मस्जिद बंदर येथील एका व्यापाऱ्याची लाखो रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. या प्रकरणी शीव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शीव येथे राहणारे किर्ती कामदार यांचे मस्जिद बंदर येथे चष्म्याचे दुकान आहे. हे दुकान किर्ती यांचा मुलगा आणि ते स्वतः सांभाळतात. मुलाने इंडियामार्ट या ऑनलाईन वेबसाईटवर दुकानाचे नाव आणि मोबाईल क्रमांक दिला आहे. या वेबसाईटचा वापर व्यावसायिक कामाकरिता करण्यात येतो. काही दिवसांपूर्वी या वेबसाईटद्वारे आनंद सिंग नावाच्या व्यक्तीचा किर्ती यांच्या मुलाच्या मोबाईल क्रमांकावर फोन आला. त्याने तो भारतीय सैन्यात असल्याचे सांगून गलवान खोऱ्यातील भारतीय सैन्यासाठी सेफ्टी ग्लास (चष्मा) देणगी स्वरूपात पाठवायचा असून ४००० चष्म्याची ऑर्डर दिली. ५५ रुपये नग असे एकूण २ लाख २० हजार रुपये देण्याचे ठरले. आनंद सिंग नावाच्या कथित व्यक्तीने चष्म्याची डिलिव्हरी घेऊन बीकेसी येथील विदेश भवन येथे बोलावले.

व्यापारी किर्ती कामदार यांचा मुलगा चष्म्याचा माल पोहोचवण्यासाठी बीकेसी येथे गेला. त्याने आनंद सिंग याला फोन लावला, सिंग याने मी महत्वाच्या मिटिंगमध्ये आहे, असे सांगून थोडा वेळ वाट पहा असे सांगितले. थोड्या वेळाने पुन्हा फोन करत मी तुमचे पेमेंट पाठवतो, असे सांगून तुम्ही मला तुमच्या गुगल पे वरून दोन रुपये पाठवा, असे सांगितले आणि मुलाच्या व्हाट्सअप्पवर आर्मी चेक १०००० असा कोड पाठवून तो स्कॅन करण्यास सांगितला. मुलाने तो कोड स्कॅन करताच मुलाच्या खात्यातून लागोपाठ थोडी थोडी रक्कम करून ९९ हजार ९९७ रुपये वेगवेगळ्या खात्यावर वळते झाले. आपली फसवणूक झाल्याचे मुलाच्या लक्षात येताच त्याने शीव पोलीस ठाणे येथे धाव घेऊन तक्रार दाखल केली. पोलिसांनी माहिती तंत्रज्ञान कायदा अंतर्गत गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -