घरठाणेभिवंडीत कोविडचा दुसरा डोस घेतलेल्या इसमाचा मृत्यू

भिवंडीत कोविडचा दुसरा डोस घेतलेल्या इसमाचा मृत्यू

Subscribe

 कोरोनाचा धोका वाढू नये म्हणून देशभर नागरिकांना कोरोनापासून बचाव करणार्‍या लसीकरणास सुरुवात झाली आहे. मात्र, कोरोना लसीकरणाचा दुसरा डोस घेऊन प्रतीक्षा कक्षात थांबलेल्या इसमाला लसीकरण केंद्रातच चक्कर आल्याने त्यास उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मृत घोषित केल्याची घटना भिवंडीतील भाग्यनगर येथील लसीकरण केंद्रात मंगळवारी घडली आहे. या घटनेने शहरात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, मृत्यूचे नेमके कारण अजूनही समजले नसल्याने आरोग्य विभागात देखील मोठी खळबळ उडाली आहे.

सुखदेव किर्दत (४५) असे मृत्यू झालेल्या इसमाचे नाव असून ते ठाणे येथील मनोरमा नगर येथील रहिवासी आहेत. ते भिवंडीतील एका खासगी डॉक्टरकडे वाहन चालक म्हणून काम करत होते. मंगळवारी सकाळी ११ वाजता ते कोविड लसीचा दुसरा डोस घेण्यासाठी शहरातील भाग्यनगर येथील कोविड लसीकरण केंद्रात गेले असता दुसरा डोस घेतल्यानंतर ते लसीकरण केंद्रातील प्रतीक्षागृहात थांबले होते. त्यानंतर साधारण पंधरा मिनिटांनी त्यांना चक्कर आल्याने ते खाली पडले. त्यांना उपचारासाठी भिवंडीतील स्व. इंदिरा गांधी उपजिल्हा रुग्णालयात नेले असता येथील कर्तव्यावर असलेल्या डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

- Advertisement -

या घटनेनंतर ठाणे आरोग्य विभागाकडून वरिष्ठ अधिकार्‍यांचे पथक देखील भिवंडीत दाखल झाले आहे. शवविच्छेदन अहवालानंतरच मृत्यूचे नेमके कारण समजेल, अशी प्रतिक्रिया भिवंडी मनपाचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. के. आर. खरात यांनी दिली आहे. तर सुखदेव किर्दत हे सकाळी ११ वाजता लसीकरण केंद्रात आले. त्यांचा रुग्ण इतिहास आणि इतर वैद्यकीय बाबींची चौकशी व तपासणी केली असता सर्व व्यवस्थित होते. त्यानंतरच त्यांना लसीकरणाचा दुसरा डोस देण्यात आला. त्यांच्या अगोदर इतर सात जणांना देखील डोस देण्यात आले. ते सर्व व्यवस्थित असून ऑब्झर्व्हेशन कक्षात किर्दत बसले असता त्यांना चक्कर आल्याने त्यांना उपचारासाठी रुग्णालयात पाठविण्यात आले, अशी माहिती लसीकरण केंद्रात कर्तव्यावर असलेल्या सुगंधा कांबळे, समिधा पाईकराव, पूनम ठाकरे या वैद्यकीय कर्मचार्‍यांनी दिली आहे.

माझे पती आज दुसरा डोस घेणार असल्याची माहिती सकाळी त्यांनी मला दिली होती. नेहमीप्रमाणे आज ते कामावर देखील गेले. मात्र, दुपारी मला त्यांचा अपघात झाला असल्याचा फोन आल्याने मी आयजीएम रुग्णालयात आले असता पतीच्या निधनाची बातमी समजली. या घटनेने मला धक्का बसला असून या घटनेची सखोल चौकशी व्हावी आणि मला न्याय मिळावा, अशी प्रतिक्रिया सुखदेव किर्दत यांची पत्नी सोनाली किर्दत यांनी दिली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -