घरमुंबईशिवाजी महाराजांचा अख्ख्या देशावर प्रभाव, बाबासाहेब पुरंदरेंना पंतप्रधान मोदींकडून मराठीत शुभेच्छा

शिवाजी महाराजांचा अख्ख्या देशावर प्रभाव, बाबासाहेब पुरंदरेंना पंतप्रधान मोदींकडून मराठीत शुभेच्छा

Subscribe

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या जन्मदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ संदेशाच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या आहेत. मात्र, पंतप्रधानांनी सुरुवातीलाच बाबासाहेबांना चक्क मराठीतून शुभेच्छा दिल्यामुळे सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या. यावेळी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बाबासाहेबांच्या कार्याचा गौरव करतानाच शिवाजी महाराजांचा महाराष्ट्रावरच नव्हे, तर अख्ख्या देशावर प्रभाव असल्याचे सांगितले.

आपल्या संदेशाची सुरुवात करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बाबासाहेब पुरंदरेंना मराठीतून शुभेच्छा देत साष्टांग नमस्कार केला. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंना मी सुरुवातीलाच साष्टांग नमस्कार करतो. छत्रपती शिवाजी महाराजांनी जे आदर्श उभे केले आहेत, जी शिकवण दिली आहे, तिचे आचरण करण्याची शक्ती परमेश्वराने मला द्यावी, अशी प्रार्थना मी देवाकडे करतो, अशा मराठीतून शुभेच्छा मोदींनी दिल्या.

- Advertisement -

बाबासाहेबांनी आपल्या आयुष्यात शिवाजी महाराजांना जगण्याचा प्रयत्न निष्ठेने केला आहे. त्यांनी इतिहासासोबतच वर्तमानाची देखील चिंता केली आहे. गोवा मुक्ती संग्रामपासून दादरा नगर हवेलीच्या स्वाधीनता संग्रामापर्यंत त्यांची भूमिका नेहमीच आपल्या सगळ्यांसाठी आदर्श राहिली आहे. त्यांचं कुटुंब देखील या कामात समर्पित राहिले आहे. तुम्ही आजही शिवसृष्टी निर्मितीच्या अभूतपूर्व संकल्पावर काम करत आहात. शिवाजी महाराजांच्या ज्या आदर्शांना तुम्ही देशासमोर ठेवण्याचा प्रयत्न केला आहे, ते आदर्श आम्हाला युगानुयुगे प्रेरणा देण्याचे काम करणार आहेत, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बाबासाहेबांना यावेळी शुभेच्छा दिल्या.

४० वर्षांपूर्वीची सांगितली आठवण
बाबासाहेब पुरंदरेंना शुभेच्छा देताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ४० वर्षांपूर्वीची आठवण यावेळी सांगितली. पंतप्रधान म्हणाले, मला आठवतंय की ४ दशकांपूर्वी अहमदाबादमध्ये जेव्हा तुमचे कार्यक्रम व्हायचे, तेव्हा मी नेहमीच त्यांना उपस्थित राहायचो. जाणता राजाच्या सुरुवातीच्या काळात मी एकदा तो कार्यक्रम बघण्यासाठी पुण्याला गेलो होतो. बाबासाहेबांनी नेहमीच प्रयत्न केला आहे की युवकांपर्यंत इतिहास पोहोचायला हवा. याचसोबत खरा इतिहास पोहोचावा यासाठी ते कायम आग्रही राहिले आहेत. याच संतुलनाची आज गरज आहे, असे नरेंद्र मोदी म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -