घरCORONA UPDATEपत्नीचा कोरोनामुळे मृत्यू, पोलीस हवालदारालाही लागण, हवालदार नैराश्यग्रस्त!

पत्नीचा कोरोनामुळे मृत्यू, पोलीस हवालदारालाही लागण, हवालदार नैराश्यग्रस्त!

Subscribe

कोरोनापासून बचाव होण्यासाठी लोकांना घरातच राहण्यासाठी वारंवार सांगणारे पोलीस कर्मचारीच आता कोरोनाच्या टार्गेटवर आल्याचं चित्र निर्माण झालं आहे. मुंबई आणि ठाण्यात काही पोलिसांना कोरोनाची लागण झाल्यानंतर आता नवी मुंबईच्या एका पोलीस हवालदाराला देखील कोरोनाची लागण झाल्याचं निष्पन्न झालं आहे. धक्कादायक बाब म्हणजे त्यांच्या पत्नीचा देखील कोरोनामुळे दुर्दैवी मृत्यू झाला असून त्यांच्या मुलांना देखील क्वॉरंटाईन करण्यात आले आहे. या सगळ्या प्रकारामुळे संबंधित पोलीस हवालदाराला नैराश्य आलं असून त्यांच्या मदतीसाठी आता त्यांच्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी पुढाकार घेतला आहे. हे अधिकारी संबंधित हवालदाराचं समुपदेशन करत आहेत.

पोलीस दल कोरोनाच्या टार्गेटवर?

सामान्यांना कोरोनाची लागण होऊ नये, म्हणून मोठी जोखीम उचलून पोलीस कर्मचारी रस्त्यावर ड्युटी करत आहेत. मात्र, यामुळे त्यांच्याच जिवाला मोठा धोका निर्माण झाला आहे. आत्तापर्यंत महाराष्ट्रात दोन पोलीस अधिकाऱ्यांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. त्यामुळे आता पोलीस दलाने अधिक सजग राहण्याची आवश्यकता निर्माण झाली असून पोलीस प्रशासनाकडून अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची चाचणी करण्यात येत आहे.

- Advertisement -

सदर पोलीस हवालदार नवी मुंबईत कार्यरत आहेत. गेल्या काही दिवसांपासून ते प्रकृतीच्या कारणास्तव सुट्टीवर होते. ते ठाण्यात राहात असून त्यांचं पोस्टिंग नवी मुंबईत आहे. मात्र, काही दिवसांपूर्वीच त्यांच्या पत्नीला कोरोनाची लागण झाल्याचं निष्पन्न झालं. त्यांच्यावर उपचार सुरू असतानाच कोरोनामुळे त्यांचा मृत्यू ओढवला. त्यासोबत खुद्द हे हवालदार आणि त्यांच्या मुलांची देखील कोरोनाची चाचणी करण्यात आली असून त्याचा अहवाल अद्याप आलेला नाही. या पार्श्वभूमीवर या हवालदाराला प्रचंड नैराश्य आल्याचं त्यांच्या वरिष्ठांना समजलं. त्यांनी लगेचच या हवालदाराची भेट घेऊन त्यांचं समुपदेशन केलं. सध्या त्यांच्या परिस्थितीत सकारात्मक बदल होत आहे.

दरम्यान, सदर हवालदाराला नेमकी कोरोनाची लागण कुठून झाली? याचा माग सध्या आरोग्य प्रशासन काढत आहे. त्यावरूनच ते अजून कुणाच्या संपर्कात आले त्याचा शोध घेणं शक्य होणार आहे. या प्रकरणानंतर नवी मुंबईतल्या पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची देखील कोरोनाची चाचणी करण्यात येत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -