घरमुंबईप्राध्यापकांच्या 'कामबंद'चा परीक्षांवर परिणाम?

प्राध्यापकांच्या ‘कामबंद’चा परीक्षांवर परिणाम?

Subscribe

आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी राज्यातील प्राध्यापक संघटनांनी कामबंद आंदोलनाची हाक दिली असून या आंदोलनाच्या सावटाखाली मुंबई विद्यापीठातील परीक्षादेखील आल्या आहेत. येत्या गुरुवारपासून सुरू होणार्‍या विद्यापीठाच्या परीक्षा लक्षात घेता कोणत्याही अडचणी होऊ नयेत म्हणून आता इतर संघटना पुढे सरसावल्या आहेत.

आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी राज्यातील प्राध्यापक संघटनांनी कामबंद आंदोलनाची हाक दिली असून या आंदोलनाच्या सावटाखाली मुंबई विद्यापीठातील परीक्षादेखील आल्या आहेत. येत्या गुरुवारपासून सुरू होणार्‍या विद्यापीठाच्या परीक्षा लक्षात घेता कोणत्याही अडचणी होऊ नयेत म्हणून आता इतर संघटना पुढे सरसावल्या आहेत. एमफुक्टोने या संपाची हाक दिली असली तरी परीक्षेच्या कामकाजावर कोणत्याही प्रकारचा फटका बसणार नाही, असे संघटनेने स्पष्ट केले आहे. मात्र खबरदारीचा उपाय म्हणून इतर संघटना आतापासून परीक्षेच्या कामांसाठी प्राध्यापकांना पुढे येण्याचे आवाहन करीत असल्याची माहिती विद्यापीठातील सूत्रांनी दिली आहे.

प्रलंबित मागण्यांसाठी प्राध्यापकांचं आंदोलन

मुंबई विद्यापीठासह राज्यातील इतर विद्यापीठांमध्ये कार्यरत असलेल्या प्राध्यापकांच्या प्रलंबित मागण्यांसंदर्भात वेळोवेळी आंदोलन करण्यात आले होते. मात्र त्यानंतरही कोणत्याही प्रकारचे ठोस आश्वासन न मिळाल्याने एमफुक्टो या संघटनेने सोमवारपासून कामबंद आंदोलन सुरू केले होते. प्राचार्य, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचार्‍यांच्या रिक्तपदांची भरती, नव्याने लागू झालेल्या विद्यापीठ कायद्यात समाविष्ट अधिकार्‍यांच्या नियुक्त्या, तासिका तत्वावरील प्राध्यापकांची वेतनवृद्धी, वेतनेतर अनुदान, सातवा वेतन आयोग, आंदोलक प्राध्यापकांचे रोखलेले वेतन, संपकाळात रोखलेले वेतन यासारख्या अनेक मागण्यांसाठी हे आंदोलन सुरू करण्यात आले होते. या मागण्यासंदर्भात मुंबईसह राज्यातील सर्व प्राध्यापक संघटनांबरोबर शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी बैठकही घेतली होती.

- Advertisement -

विद्यापीठाने घेतली गंभीर दखल

या बैठकीत प्राध्यापकांच्या मागण्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली असली तरी लेखी आश्वासन न मिळाल्याने एमफुक्टोने जोपर्यंत लेखी आश्वासन मिळत नाही, तोपर्यंत आंदोलनावर ठाम असल्याचे जाहीर केले होते. त्यानुसार सोमवारच्या बैठकीच्या इतिवृत्त संघटनांना पाठविण्यात आल्यानंतर त्यात प्राध्यापकांच्या मागण्यासंदर्भात ठोस आश्वासन नसल्याने प्राध्यापकांचे आंदोलन सुरुच आहे. प्राध्यापकांच्या या आंदोलनामुळे काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या कॉलेजांच्या परीक्षांच्या नियोजनालाही फटका बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे याची गंभीर दखल आता विद्यापीठ आणि इतर संघटनांनी घेतल्याचे कळते.

विनोद तावडेंचे आंदोलन मागे घेण्याचे आवाहन

एमफुक्टोने परीक्षा कामांवर कोणताही परिणाम होणार नसल्याचे याअगोदरच स्पष्ट केले आहे. पण आंदोलन सुरुच असल्याने विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. त्यामुळे आता इतर संघटनांनी यासाठी प्राध्यापकांच्या बैठका घेऊन त्यांचे मतपरिवर्तन करण्यास सुरुवात केल्याची माहिती समोर आली आहे. तर शनिवारी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनीदेखील आता पुन्हा एकदा प्राध्यापकांना आंदोलन मागे घेण्याचे आवाहन केले आहे. यासाठी विनोद तावडे यांनी त्यांच्या मागण्यासाठी आपण सकारात्मक असून आता प्राध्यापकांनी आंदोलन मागे घ्यावे, असे आवाहन ही फेसबुकवरुन केले आहे. त्यामुळे आता प्राध्यापक संघटना याबाबत काय निर्णय घेेतात याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -