घरमुंबईसर्वसामान्यांसाठी लोकलसेवा तातडीने सुरू करा

सर्वसामान्यांसाठी लोकलसेवा तातडीने सुरू करा

Subscribe

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी; तातडीने निर्णय न घेतल्यास आंदोलनाचा इशारा

कोरोनामुळे लादलेले निर्बंध शिथिल करण्यासाठी आणि मुख्य म्हणजे मुंबईची लोकल सेवा सुरू करण्यासाठी आता तातडीने पावले उचलावीत, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुरुवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. सर्वसामान्यांनी आतापर्यंत खूप सहन केले आणि त्यांची सहन करण्याची क्षमता आता संपत चालली आहे. त्यामुळे आता यापुढे सरकारकडून काही सकारात्मक उपाय केले गेले नाहीत तर कडेलोट होईल. त्या परिस्थितीत माझा पक्ष मुंबईकरांसोबत तर उभा राहीलच परंतु लोकल प्रवास तातडीने सुरू करण्यासाठी आंदोलन सुरू करेल, असा इशाराही राज यांनी दिला आहे.

कोरोनाची दुसरी लाट सुरू झाल्यानंतर राज्य सरकारने फक्त अत्यावश्यक सेवेतील कर्मचार्‍यांना लोकल प्रवासाची मुभा दिली आहे. सर्वसामान्यांना अजूनही लोकल प्रवासासाठी मनाई आहे. त्यामुळे सर्वसामान्य मुंबईकरांसाठी रोजचा रस्ते प्रवास जिकरीचा झाला आहे. या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून लोकल प्रवास सर्वांसाठी खुला करण्याची मागणी केली आहे.

- Advertisement -

मुंबईकरांचे रोजचे हाल थांबविण्यासाठी मुंबईची लोकल सेवा, निदान ज्यांनी लसीचे दोन डोस घेतले आहेत अशा सर्वांसाठी तरी अत्यंत तातडीने सुरू केली जावी. विविध प्रकारच्या मोहिमा हातात घेऊन लसीकरण वाढवावे म्हणजे अधिकाधिक लोक लोकल प्रवासाचा लाभ घेऊ शकतील आणि मुंबईचं अर्थचक्र पुन्हा सुरळीत सुरू होईल, असे राज यांनी पत्रात म्हटले आहे. महाराष्ट्र सरकार या मागणीचा विचार करून त्वरित पावले उचलेल, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे.

गेल्या १५ महिन्यांपासून देशाप्रमाणे महाराष्ट्रात अनेक प्रकारचे निर्बंध सरकारने लागू केले आहेत. हे निर्बंध आपण सर्वच जण पाळत आलो आहोत. पण आजकाल हे निर्बंध नक्की कोणासाठी, असा प्रश्न पडू लागला आहे. त्यातल्या त्यात सध्या मुंबई शहरासाठी जे निर्णय घेतले जात आहेत ते तर अनाकलनीय आहेत, असे राज यांनी पत्रात नमूद केले आहे.

- Advertisement -

मुंबईतील जवळजवळ सर्व कार्यालये सुरू आहेत. सर्वांना घरून काम करता येणे शक्य नाही. यासाठी त्यांना रोज अनेक तास प्रवास करावा लागतो आहे. त्यात लोकल सेवा बंद असल्यामुळे मुंबईकरांचे अतोनात हाल होत आहेत. महाराष्ट्र सरकारने बस सेवेला परवानगी दिली; पण लोकल बंद असल्याने या बसमध्ये प्रचंड गर्दी होत असते. अशा गर्दीत प्रवास केल्याने रोगही अधिक पसरण्याचाच धोका आहे. त्यामुळे ‘बस सुरू आणि लोकल बंद’ ह्यानं नेमकं काय साध्य होणार? असा सवाल त्यांनी केला आहे.

ही साथ एकाएकी जाणार नाही असे जगातल्या तज्ञांचे मत आहे. त्यामुळे यापुढे आपल्याला अशा साथींबरोबरच राहण्याची सवय करून घेण्याची गरज आहे आणि त्याला धरूनच योग्य निर्णय, उपाययोजना आपल्याला करायला हव्यात. लसीकरणाचा वेग वाढवणे गरजेचे आहेच. परंतु त्यासोबतच धोरण आखणीमध्ये अधिक कल्पकता दाखवायला हवी. पण दिसतंय असं की महाराष्ट्र सरकारला अजूनही टाळेबंदी आणि निर्बंधांच्या पलिकडे काही सूचत नाही, अशी खंत राज ठाकरे यांनी बोलून दाखवली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -