घरमुंबईराणीबागेतील पेंग्विनच्या जन्मावर अनिश्चिततेचे सावट

राणीबागेतील पेंग्विनच्या जन्मावर अनिश्चिततेचे सावट

Subscribe

भायखळा येथील राणीबागेतील पेंग्विनने दिलेल्या अंड्याची मुदत आज पूर्ण होत असल्यामुळे मुंबईकरांचे लक्ष नव्या पाहुण्याच्या आगमनाकडे लागले आहे.

भायखळा येथील राणीबागेतील पेंग्विनने दिलेल्या अंड्याची मुदत आज पूर्ण होत असल्यामुळे मुंबईकरांचे लक्ष नव्या पाहुण्याच्या आगमनाकडे लागले आहे. सगळेजण त्यांची आतुरतेने वाट पाहत असले तरी या अंड्यामधून बेबी पेंग्विन जन्म घेईलच असे खात्रीपूर्वक सांगता येत नाही, अशी चिंता पेंग्विनची काळजी घेणार्‍या डॉक्टर मधुमिता काळे यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे राणीबागेत पेंग्विनचा पाळणा हलणार की नाही याविषयी साशंकता निर्माण झाली आहे. किमान ४० दिवसांच्या कालावधीनंतर अंडे कधीही फुटते. हा कालावधी आज बुधवारी पूर्ण होत आहे. त्यामुळे मुंबईकरांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

मुंबईच्या भायखळा येथील वीर जिजामाता भोसले उद्यान आणि प्राणिसंग्रहालयात दोन वर्षांपूर्वी २६ जुलै २०१६ रोजी आठ हम्बोल्ट पेंग्विन आणण्यात आले होते. यामध्ये तीन नर व पाच मादी पेंग्विन होते. त्यापैकी १८ ऑक्टोबर २०१६ रोजी मुंबईतले हवामान न मानवल्यामुळे डोरी या मादी पेंग्विनचा मृत्यू झाला होता. एका पेंग्विनचा मृत्यू झाल्याने पालिकेवर टीका झाली होती. यानंतर पालिकेने पेंग्विनसाठी काच घर बनवले. या काच घरात डॉनल्ड, डेझी, पपाय, ऑलिव्ह, बबल, मोल्ट, फ्लिपर या सात पेंग्विनना ठेवण्यात आले आहे. गेल्या दोन वर्षांत हे सात पेंग्विन मुंबईच्या वातावरणात चांगलेच रमले असून त्यांनी आपले जोडीदारही निवडले आहेत. मात्र त्यांच्यामध्ये सर्वांत कमी वयाचा असलेला मोल्ट (तीन वर्षे) आणि त्याची जोडीदार फ्लिपर (साडेचार वर्षे) यांनी गोड बातमी दिली. फ्लिपरने ५ जुलैला एक अंडे दिले आहे. त्यामुळे राणीबागेत नव्या पाहुण्याची चाहुल लागली आहे.

- Advertisement -

भारतात पेंग्विनचा जन्म होण्याची ही पहिलीच घटना असेल. भारतात पहिल्यांदाच मुंबईच्या राणीबागेत पेंग्विनचा जन्म होणार असल्याने मुंबईकरांमध्ये उत्सुकता आहे. मुंबईकर नव्या पाहुण्याला कधी बघू याची वाट बघत आहेत. असे असताना हा नवा पाहुणा नक्की येणार का याबाबत डॉक्टारांनी स्पष्ट सांगण्यास नकार दिला आहे. अंड्याला मोल्ट आणि फ्लिपर हे आळीपाळीने ऊब देत आहेत. त्यांनी योग्यप्रकारे ऊब दिली असली तरच या अंड्यामधून बेबी पेंग्विन जन्म घेऊ शकतो. अन्यथा बेबी पेंग्विन जन्म घेऊ शकणार नाही. प्रत्येक अंड्यामधून बेबी पेंग्विन जन्म घेईलच असे नाही. अंड्यामधून बेबी पेंग्विन जन्म घ्यावा म्हणून आम्ही मोल्ट व फ्लिपर यांची विशेष काळजी घेत आहोत. त्यांना त्यांचे आवडते बोंबील, ईल, रावस, बांगडा व तारली या माशांमधून सप्लिमेंट आणि कॅल्शियम दिले जात आहे. त्यांचे वजन व आरोग्य चांगले ठेवण्याकडे आमचा भर असल्याचे डॉ. मधुमिता यांनी सांगितले.

पेंग्विनची प्रतीक्षा आणखी चार महिने –
पेंग्विनकडे आम्ही लक्ष देऊन आहोत. विशेषकरून अंड्याच्या सुरक्षेची काळजी घेतली जात आहे. येत्या चार ते पाच दिवसात अंड्यामधून बेबी पेंग्विन जन्म घेण्याची शक्यता आहे. बेबी पेंग्विन जन्माला आला तरी तो नाजूक असणार आहे. त्याला पुढील तीन ते चार महिने त्याच्या आई व वडिलांची ऊब लागणार आहे. यामुळे तीन ते चार महिने बेबी पेंन्ग्विन पाण्यामध्ये जाणार नाही. त्यानंतर मात्र तो पाण्यात जाईल.
– डॉ. मधुमिता काळे

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -