घरमुंबईदुर्मिळ हृदयदोषावर हृदय आणि फुफ्फुस प्रत्यारोपण शस्त्रक्रिया, तरुणीचे वाचले प्राण!

दुर्मिळ हृदयदोषावर हृदय आणि फुफ्फुस प्रत्यारोपण शस्त्रक्रिया, तरुणीचे वाचले प्राण!

Subscribe

जन्मापासून असणाऱ्या दुर्मिळ हृदयदोषावर अवयव प्रत्यारोपणाचा पर्याय काढत मुंबईतील एका २४ वर्षीय मुलीला जीवदान देण्यात डॉक्टरांना यश आलं आहे. पनवेलमध्ये राहणाऱ्या २४ वर्षीय अक्षरा अहिर हिला जन्मापासूनच हृदयदोष होता. जसजसं तिचं वय वाढत गेलं तसतसा तिचा आजारही बळावला. गेल्या दोन वर्षांत ५ मिनिट चाललं तरी तिला चक्कर यायची, अंग निळं पडायचं, दम लागायचा. अशा अनेक समस्यांसोबत अक्षरा जगत होती. यावर अनेक डॉक्टरांनी तात्पुरते उपचारही सुचवले. पण, नेमक्या आजाराचं निदान होत नव्हतं. त्यामुळे, तिच्या आई-वडिलांनी काही लोकांच्या सल्ल्यानुसार, तिला परळच्या ग्लोबल हॉस्पिटलमध्ये दाखवण्याचा निर्णय घेतला.

७ तास सुरू होती शस्त्रक्रिया

डॉक्टरांनी ती हॉस्पिटलमध्ये दाखल झाल्यानंतर काही तपासण्या केल्या. त्या तपासण्यांच्या अहवालात तिला ‘व्हेंट्रिक्युलर सेप्टल डिफेक्ट’ या आजाराचं निदान झालं. तिच्यावर औषधोपचारही सुरू होता. पण, गेल्या काही दिवसांत तिची प्रकृती खूपच ढासळली होती आणि तिला घरीच ऑक्सिजन थेरेपी देण्यात येत होती. डॉक्टरांनी तिची प्रकृती लक्षात घेत तिला हॉस्पिटलमध्ये दाखल करून घेतलं. त्यानुसार, या मुलीवर जून २०१९ मध्ये संयुक्त हृदय आणि फुफ्फुस प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्यात आली. जवळपास ६-७ तास ही शस्त्रक्रिया सुरू होती. आता अक्षराची प्रकृती ठीक असून ती साधारण आयुष्य जगत आहे. जन्मापासून असणाऱ्या आणि शस्त्रकिया न करता येण्याजोगा हृदयदोष आणि सेकंडरी पल्मोनरी हायपरटेन्शन असलेल्या रुग्णांची संख्या भारतात बरीच आहे. अशा प्रकारच्या आजाराला ‘आयसनमंजर सिण्ड्रोम’ म्हणतात. अशा रुग्णांचा रंग कालांतराने निळा पडत जातो आणि त्यांना सेरेब्रल स्ट्रोक, हृदयाचा उजवा भाग निकामी होणे, ‘इन्फेक्टिव्ह एण्डोकार्डिटिस’ हे आजार होण्याची शक्यता असते. त्यांना येणारा मृत्यूही वेदनादायी असतो.

- Advertisement -

हेही वाचा – भोपाळचं ह्रदय मुंबईत; १२ वर्षीय मुलावर यशस्वी हृदय प्रत्यारोपण

अवयवदान हाच पर्याय!

या केसविषयी ग्लेनईगल्स ग्लोबल हॉस्पिटल्सचे संचालक आणि हृदय-फुफ्फुस कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. संदीप अट्टावार यांनी सांगितलं की, “आयसनमंजर सिण्ड्रोम असलेल्या व्यक्तींवर जन्मतःच किंवा लहानपणीच हृदयदोष दूर करणारी शस्त्रक्रिया करण्यात आली तर पुढील नुकसान टाळता येऊ शकतं. आता यावरील उपचार सुविधा मोठ्या प्रमाणावर आपल्या देशात उपलब्ध होऊ लागल्या आहेत. त्यामुळे ज्यांच्यावर लहानपणीच ही शस्त्रक्रिया झाली नाही. पण, प्रत्यारोपणाचा पर्याय उपलब्ध होईपर्यंत या रुग्णांचं जगणं कठीण असतं. त्यामुळे, अवयवदान हाच यावर मोठा पर्याय आहे. सर्वांनी पुढाकार घेऊन या चळवळीत सहभाग घेतला पाहिजे.”

हृदय आणि फुप्फुस एकत्र प्रत्यारोपण कधी करावं?

इंटरनॅशनल सोसायटी फॉर हार्ट अँड लंग ट्रान्सप्लांटेशन या संस्थेनुसार, ज्या व्यक्तीला आयसनमंजर सिण्ड्रोमसह जन्मजात हृदयदोष असेल, अज्ञात कारण असलेले फुफ्फुसाचे प्राथमिक हायपरटेन्शन असेल, हृदयाचा उजवा भाग निकामी झाला असेल, पित्ताशयाचा फायब्रॉसिस आणि हृदयाच्या उजव्या बाजूचा भाग कार्य करत नसेल, तर हृदय आणि फुफ्फुस प्रत्यारोपण केलं जाऊ शकतं. ग्लोबल हॉस्पिटलचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विवेक तळवलीकर म्हणाले, “अक्षराला जीवदान देण्यात जेवढे डॉक्टरांचे प्रयत्न आहेत, तेवढीच तिच्या आई-वडिलांची आणि तिची इच्छाशक्ती प्रबळ होती. त्यामुळेच तिच्यावर हृदय आणि फुप्फुस प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करणं सोपं झालं.”

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -