कल्याण पत्रीपूल पूर्णत्वासाठी आता महापौरांची नवीन डेडलाइन

मार्च २०२० महिन्यात पूलाच्या कामाची तारीख दिलेली असताना देखील मंगळवारी महापौर विनीता राणे यांनी मे २०२० ची तारीख दिल्याने खळबळ उडाली आहे.

patri bridge
कल्याणचा पत्रीपूल

कल्याणकरांच्या अत्यंत जिव्हाळ्याचा विषय असलेल्या पत्रीपुलाची नवीन डेडलाइन समोर आली आहे. या पत्रीपुलाच्या कामाच्या पूर्णत्वासाठी देण्यात आलेली फेब्रुवारी २०२० ची तारीख उलटल्याने आणि कामाला विलंब होत असल्याने त्याच्या निषेधार्थ मंगळवारी भाजपच्यावतीने धरणे आंदोलन छेडण्यात आले आहे. यावेळी भाजपने शिवसेना आणि पालकमंत्र्यांविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी मार्च २०२० महिन्यात पूलाच्या कामाची तारीख दिलेली असताना मंगळवारी महापौर विनीता राणे यांनी मे २०२० ची तारीख दिल्याने खळबळ उडाली आहे. अवघ्या आठ महिन्यांवर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक होत आहे. मात्र, पत्रीपूलावरून शिवसेना आणि भाजपमध्ये श्रेयवादाचे राजकारण रंगल्याचे दिसून येत आहे. पत्रीपूलाच्या कामासाठी तारीख पे तारीख सुरू असून, शिवसेना आणि भाजपच्या श्रेयवादात कल्याणकरांचे सॅन्डवीच झाले आहे.

भाजपचे धरणे आंदोलन…शिवसेनेवर टीकास्त्र

गेल्या दीड महिन्यांपासून पत्रीपूलाचे काम सुरू आहे. हे काम अत्यंत संथगतीने होत असल्याने वाहनचालकांना आणि नागरिकांना दररोज प्रचंड वाहतूक केांडीचा सामना करावा लागत आहे. मंगळवारपासून दहावीची परीक्षा सुरू झाली असून पत्रीपुलाच्या वाहतूक कोंडीमुळे विद्यार्थ्यांना पेपरला जायला उशिर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. परंतु, जाणीवपूर्वक या पुलाच्या कामाला विलंब लावण्यात येत असल्याचा गंभीर आरोप भाजपचे प्रदेश सरचिटणीस आणि माजी आमदार नरेंद्र पवार यांनी केला आहे. तसेच या पुलाच्या कामाचे श्रेय आपल्याला मिळू नये, यासाठी इथल्या नागरिकांना नाहक त्रासात ढकलण्यात आल्याचेही पवार यांनी सांगितले. त्यामुळे धरणे आंदोलन करीत असल्याचे त्यांनी स्पष्ट केलं. यावेळी शिवसेना, राज्य सरकार आणि पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. ‘दहावीची परीक्षा सुरू असल्याने आम्ही शांततेच्या मार्गाने आंदोलन करत असून वेळ पडल्यास नागरिकांच्या साथीने आम्ही रस्त्यावरही उतरण्याचा इशारा’ कांबळे यांनी यावेळी दिला. यावेळी माजी मंत्री जगन्नाथ पाटील, स्थायी समिती सभापती विकास म्हात्रे, माजी उपमहापौर आणि नगरसेवक मोरेश्वर भोईर, मनोज राय, रमाकांत पाटील, शिवाजी आव्हाड यांच्यासह भाजपचे अनेक नगरसेवक आणि पदाधिकारी मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते.

कपिल पाटील यांनी काय केलं? सेनेचा सवाल

पत्रीपूलाच्या विलंबाच्या कामामुळे भाजपचे धरणे आंदोलन केल्यानंतर केडीएमसीच्या महापौर विनिता राणे यांनी तातडीने पत्रकार परिषद घेतली. पत्रीपूलाचे काम मे महिन्यात पूर्ण होईल अशी माहिती महापौरांनी दिली. काही दिवसांपूर्वीच खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांनी मार्च महिना अखेरीस पूत्रीपुलाचे काम पूर्ण होईल असे स्पष्ट केले असताना महापौरांच्या नव्या डेडलाईनमुळे सर्वचजण आश्चर्य चकित झाले आहेत. भाजपचे हे आंदोलन म्हणजे निव्वळ नौटंकी असल्याची टिका करत पत्रीपुलाच्या कामासाठी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे हेच पाठपुरावा करत असल्याचे महापौर राणे यांनी सांगितले. तर पत्रीपुलाचे श्रेय घेण्यासाठी भाजप आज आंदोलन करीत आहे. या पुलाचे काम पूर्ण होण्यासाठी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे हे सतत पाठपुरावा करत आहेत. भिवंडी लोकसभेचे खासदार कपिल पाटील यांनी पत्रीपुलाच्या कामाची कधी पाहणी तरी केली का? श्रीकांत शिंदे यांच्याएवढीच कपिल पाटील यांचीही जबाबदारी आहे मात्र त्यांनी काय केलं? असा खडा सवाल सभागृह नेते प्रकाश पेणकर यांनी यावेळी केला.


हेही वाचा – एका तक्रारीमुळे पालिकेचे वाचले ३१ कोटी