संजय पवारांनी शिवसेनेच्या मेळाव्यात ऐकवली राजेश क्षीरसागरांची ऑडियो क्लिप, हकालपट्टीची मागणी

kolhapur

शिवसेनेत झालेल्या बंडानंतर पक्षाची पुनर्बांधणी केली जात आहे. त्यासाठी जिल्हास्तरावर मेळावे होत आहेत. या मेळाव्यात बंडखोरांवर शिवसैनिकांचा संताप दिसून येत आहे. त्याचाच प्रत्येक आज कोल्हापुरात झालेल्या शिवसेनेच्या मेळाव्यात आला. जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी माजी आमदार राजेश क्षीरसागर यांची एक ऑडिओ क्लिप भर मेळाव्यात ऐकवली. यानंतर राजेश क्षीरसागर यांच्या पक्षातून हकालपट्टीची मागणी केली.

ऑडिओ क्लिपमध्ये काय? –

या ऑडिओ क्लिपमध्ये निवडून येण्यासाठी शिवसेना पाहिजे असं नाही, असं राजेश क्षीरसागर म्हणतात. याच त्यांच्या वाक्यावर संजय पवार चांगलेच भडकलेत. तुम्ही कितीही रंग बदलले तरी तुमच्या कपाळावर आणि पाठीवर पडलेला गद्दारचा शिक्का पुसला जाणार नाही, अशा शब्दात पवारांनी क्षीरसागर यांचा समाचार घेतला.

राजेक्ष क्षीरसागर यांची संजय पवारांवर टीका –

दरम्यान राजेश क्षीरसागर यांनी देखील संजय पवारांनी केलेल्या आरोपाला प्रतिउत्तर दिले आहे. माझ्याकडेही संजय पवारांची व्हिडिओ क्लिप असल्याचा दावा राजेश क्षीरसागर यांनी केला आहे. माझ्या निवडणुकीत गद्दारी कोण करत होते असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला आहे. निवडणुकीत तुमचे डिपॉझिट जप्त झाले असा टोला देखील राजेश क्षीरसागर यांनी संजय पवार यांना लगावला आहे.