घरमुंबईरक्तासाठी रिप्लेसमेंट रक्तदाता मागितल्यास तक्रार नोंदवा!

रक्तासाठी रिप्लेसमेंट रक्तदाता मागितल्यास तक्रार नोंदवा!

Subscribe

रक्तासाठी रिप्लेसमेंट रक्तदाता मागितल्यास रुग्णाने एसबीटीसीकडे तक्रारी दिल्या पाहिजेत. रुग्णाने किंवा नातेवाईकांनी एसबीटीसीला नावानिशी तक्रार दिली तर त्यावर कारवाई केली गेली जाईल.

एखाद्या रुग्णाला रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्या रुग्णाची संपूर्ण जबाबदारी ही रुग्णालय प्रशासनाकडे असते. पण, अनेकदा रुग्णांची गैरसोय होते. त्यातच थॅलेसेमिया, किडनीचा आजार असलेल्या रुग्णांना सतत रक्त चढवावं लागतं. शिवाय, रुग्णालयातील रुग्णांना रक्ताचा तुटवडा भासू नये म्हणून रक्त उपलब्ध नाही असं देखील सांगितलं जातं. त्यातून रक्त पिशवी उपलब्ध करुनही दिली जाते, पण त्या रक्ताच्या बदल्यात पुन्हा रक्त किंवा रिप्लेसमेंट म्हणून रक्तदाता आणण्यास सांगितलं जातं. पण, रक्ताच्या बदल्यात रक्तदाता आणण्यास सांगणं गुन्हा असल्याचं एसबीटीसी म्हणजे राज्य रक्त संक्रमण परिषदेने सांगितलं आहे. त्यामुळे अशा परिस्थितीतील रुग्णांनी एसबीटीसीकडे नावानिशी तक्रारी कराव्या असं आवाहन करण्यात आलं आहे. तसंच, जर याबाबत तक्रारी आल्यास त्यानुसार संबंधित रुग्णालयावर कारवाई केली जाणार असल्याचंही एसबीटीसीने स्पष्ट केलं आहे.

नातेवाईकांकडे रक्तदात्याची मागणी करु नये

राज्य रक्त संक्रमण परिषदेने खासगी आणि सरकारी रुग्णालयांना नातेवाईकांकडून रक्ताची किंवा रक्तदात्याची मागणी करू नये, अशी सूचना आधीच केली आहे. पण, काही खासगी किंवा सरकारी रुग्णालयात नातेवाईकांना बाहेरून रक्तदाते आणण्यास सांगितल जातं. त्यामुळे याचा ताण रुग्णांच्या नातेवाईकांवर येतो. यामागे रुग्णालयाचा हेतू असतो की, रक्तपेढीत रक्ताचा तुटवडा भासू नये. पण, असं करणं गुन्हा आहे.

- Advertisement -

नातेवाईकांनी एसबीटीसीला तक्रार द्यावी

याविषयी राज्य रक्त संक्रमण परिषदचे (एसबीटीसी) संचालक डॉ. अरूण थोरात यांनी सांगितलं की, “ रुग्णाच्या नातेवाईकांना रक्ताच्या बदल्यात रक्तदाता आणण्यास किंवा रक्त मागितल्यास हा गुन्हा आहे. रुग्णालयाने रिप्लेसमेंट डोनर घेऊ नये यासाठी आम्ही वारंवार पत्रकं काढली आहेत. शिवाय, ज्यांच्याकडे अशा पद्धतीने मागणी केली आहे त्यांना पुढे यायला सांगितलं आहे. असे जे रुग्ण असतात त्यांनी एसबीटीसीकडे तक्रारी दिल्या पाहिजेत. रुग्णाने किंवा नातेवाईकांनी एसबीटीसीला नावानिशी तक्रार दिली तर त्यावर कारवाई केली गेली जाईल. पण, रुग्णाच्या नातेवाईकांना रिप्लेसमेंट म्हणून रक्ताची सक्ती करणं हा कायद्यानं गुन्हा आहे. आतापर्यंत आमच्याकडे अशी एकही तक्रार नाही त्यामुळे अशी प्रकरणं समोर येत नाहीत. रुग्णालयात रक्त उपलब्ध नाही असं सांगून नातेवाईकानांच दिलेल्या रक्ताच्या बदल्यात रिप्लेसमेंट ब्लड डोनर देण्यासाठी सांगितलं जातं. जेणेकरून रुग्णालयातील रक्तपेढ्यांमध्ये रक्ताचा साठा कमी पडणार नाही.

प्रत्यक्षदर्शी भागात रक्तघटकाचे फलक लावणे गरजेचे

तसंच, ” रुग्णालयात रुग्ण दाखल झाला की, त्याची संपूर्ण जबाबदारी ही रुग्णालयाची असते. रुग्णासह त्याचे नातेवाईक आधीच त्रासलेले असतात. त्यांना माहितही नसतं कुठून रक्त घेऊन यायचे आहे. शिवाय, रक्तपेढी कुठे आहे? हे ही नातेवाईकांना माहित नसतं. त्यामुळे प्रत्येक रुग्णालयाने जवळच्या प्रत्येक रक्तपेढीशी संलग्न असणं गरजेचं असतं. रक्तपेढीत किती रक्त आणि रक्तघटकांचा साठा उपलब्ध आहे ? रक्ताची किंमत किती आहे? ही माहिती देण्याचा आदेश दिला आहे. तो माहिती फलक प्रत्यक्षदर्शी भागात लावला असला पाहिजे. पण, काही रुग्णालयांनी आजही हे आदेश पाळले नाहीत. त्यामुळे अशा रुग्णालयात राज्य रक्त संक्रमण परिषदेनं सर्वेक्षण सुरू केलं असून रुग्णांच्या अशा तक्रारी आल्यास त्या रुग्णालयावर कारवाई केली जाणार असल्याचं ही डॉ. थोरात यांनी स्पष्ट केलं आहे.

Bhagyshree Bhuwadhttps://www.mymahanagar.com/author/bhagu/
भटकंती करायला खूप आवडतं. कोषात बसून राहणं अजिबात आवडत नाही. वडापाव प्रचंड आवडतो. जेवण तयार करण्याची आवड आहे. भरतनाट्यम शिकतेय. जीवनावर मनापासून प्रेम करते. नकार हा शब्द माझ्या शब्दकोशात नाही.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -