घरमुंबईवांद्रे,खार पश्चिममधील मलजलाची समस्या सुटेल

वांद्रे,खार पश्चिममधील मलजलाची समस्या सुटेल

Subscribe

खार ते वांद्रे दरम्यान मलजल वाहून नेण्यासाठी बोगदा प्रकल्पाला मंजुरी,जय भारत आणि चिंबई मलजल पंपिंग स्टेशन लवकरच होणार बंद

वांद्रे,खार आणि सांताक्रूझ पश्चिम भागातील मलवाहिनींचा प्रश्न आता सुटला जाणार असून जय भारत उदंचन केंद्रापासून वांद्रे पंपिंग स्टेशनपर्यंतच्या मलजल वाहक बोगद्याच्या कामाला आता लवकरच सुरुवात होणार आहे. या बोगदा प्रकल्प कामाला शुक्रवारी स्थायी समितीने मंजुरी दिली. त्यामुळे येत्या काही दिवसांमध्ये या प्रकल्प कामाला प्रत्यक्षात सुरुवात होणार आहे. या बोगद्याचे काम पूर्ण झाल्यानंतर येथील जय भारत अणि चिंबई मलजल पंपिंग स्टेशन बंद केले जाणार आहे.

खार पश्चिम येथील जय भारत सोसायटी येथे जुने जयभारत पंपिंग स्टेशन असून याठिकाणी जमा होणारा मलजल हा सध्याच्या ३०० ते ९०० मि.मी व्यासाच्या मलवाहिनीद्वारे पंपिंग स्टेशनकडे येतो. त्यानंतर ४५० मि.मी व्यासाच्या मुख्य शक्ती वाहिनीद्वारा खार ड्राफ्ट शाफ्टला येतो. त्यानंतर १२०० मि.मी व्यासाच्या मलजल बोगद्याद्वारे नेहरु रोड वाहिनीद्वारे वांद्रे कलेक्टर मलजल बोगद्यामध्ये येतो. परंतु सध्याचे पंपिंग स्टेशन हे भविष्यातील २०५१ पर्यंत येणारे वाढीव मलजल अंदाजे २७.८ दशलक्ष प्रतिदिन वाहून नेण्यासाठी सक्षम नाही. तसेच ते ७० वर्षे जुने आहे. सखल भागात असल्यामुळे पावसाळ्यात आजुबाजूच्या परिसरातील गटार तसेच नाल्यातील पाणी पंपिंग स्टेशनमध्ये शिरते. त्यामुळे पंपिंगमध्येही बाधा येते.

- Advertisement -

त्यामुळेच जयभारत पंपिंग स्टेशन येथून स्वयंचलित पध्दतीने वांद्रे पंपिंग स्टेशनमध्ये पोहोचेल अशाप्रकारे मलजल वाहिनीकरता बोगदा बांधण्यात येणार आहे. पावसाळ्यामध्ये याशेजारी असलेल्या रेल्वे कर्मचारी वसाहत, स्वामी विवेकानंद रस्त्यांवर पूरस्थिती निर्माण होते. शिवाय वांद्रे पश्चिम येथील भविष्यात चिंबई पंपिंग स्टेशनमध्ये येणारा मलजल प्रवाह वाहून नेण्याकरता या मलजल बोगद्याचा उपयोग होणार आहे. तसेच चिंबई पंपिंग स्टेशनकडे भविष्यात येणारा ४१.३० मलजल प्रवाह हा मलजल बोगदामध्ये घेण्यात येणार आहे. त्यामुळे हा बोगदा कार्यान्वित झाल्यांनतर जय भारत आणि चिंबई पंपिंग स्टेशन बंद करण्यात येणार असल्याचे महापालिकेच्या अधिकार्‍यांचे म्हणणे आहे. या बोगदा प्रकल्पासाठी ३३४ कोटी रुपये खर्च होणार असून यासाठी आय.टी.डी सिमेंटेशन इंडिया लिमिटेड कंपनीची निवड करण्यात आली आहे. स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी हा प्रस्ताव मंजूर केला.

मात्र, ही कंत्राट रक्कम अंदाजित रकमेपेक्षा १९ टक्के अधिक आहे. पुढील ३० महिन्यांमध्ये हा प्रकल्प पूर्ण केला जाणार आहे. काँग्रेसचे स्थानिक नगरसेवक आणि स्थायी समिती सदस्य आसिफ झकेरिया यांनी याबाबत समाधान व्यक्त करत, याप्रकल्पामुळे या भागातील सिवरेजची समस्या सुटेल,असा विश्वास व्यक्त केला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -