घरमुंबईउर्मिलाच्या प्रचारासाठी शर्मिला ठाकरेंकडून राज यांच्याकडे आग्रह

उर्मिलाच्या प्रचारासाठी शर्मिला ठाकरेंकडून राज यांच्याकडे आग्रह

Subscribe

‘मोदीमुक्त भारत’चा नारा देत प्रचारात उतरलेल्या मनसेची साथ काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आघाडीला असल्याने पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांची जाहीर सभा आपल्या मतदारसंघात व्हावी, अशी आता दोन्ही काँग्रेसच्या उमेदवारांची इच्छा असते. मात्र राज ठाकरे हे केवळ ईशान्य मुंबई आणि दक्षिण मुंबई मतदारसंघात सभा घेण्याची शक्यता आहे. त्यामुळे उत्तर मुंबईच्या काँग्रेस उमेदवार उर्मिला मातोंडकर यांनी आपली बालमैत्रिण असलेल्या शर्मिला ठाकरे यांच्या मदतीने राज ठाकरे यांचे मन वळवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. उर्मिलाच्या या आग्रहानंतर शर्मिला ठाकरे यांनी त्यांचे पती राज ठाकरे यांना उत्तर मुंबईत उर्मिलाच्या प्रचारासाठी सभा घेण्याचा आग्रह धरणार आहेत.

लोकसभा निवडणुकीत यंदा मनसेने आपला एकही उमेदवार उभा केलेला नाही. मात्र, ‘मोदीमुक्त भारत’चा नारा देत त्यांनी भाजपविरोधात प्रचाराला सुरुवात केली आहे. राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याच्या सभेत आपण भाजप विरोधात प्रचारसभा काही मतदारसंघांमध्ये घेणार असल्याचे जाहीर केले. त्यानुसार त्यांची पहिली सभा शुक्रवारी, १२ एप्रिल रोजी नांदेड येथे होत आहे. त्यानंतर सोमवारी सोलापूर, मंगळवारी कोल्हापूर, बुधवारी सातारा, गुरुवारी पुणे आणि शुक्रवारी महाड, रायगड या ठिकाणी पहिल्या टप्प्यातील सभा होत आहे.

- Advertisement -

त्यानंतर, दुसर्‍या टप्प्यातील सभांचा कार्यक्रम जाहीर होणार असला तरी मुंबईत मात्र राज ठाकरेंचा दोन पेक्षा अधिक सभा होण्याची शक्यता कमी आहे. दक्षिण मुंबईतील शिवडी आणि ईशान्य मुंबईतील भांडुप या दोन ठिकाणच्या जाहीरसभांचा कार्यक्रम जवळपास निश्चित आहे. त्यामुळे काँग्रेसचे मिलिंद देवरा आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे संजय दिना पाटील यांच्या प्रचारासाठी या सभा होणार असल्या तरी काँग्रेसचे एकनाथ गायकवाड, संजय निरुपम, प्रिया दत्त आणि उर्मिला मातोंडकर यांच्यासाठी राज ठाकरे सभा घेणार नाहीत. मात्र, राज ठाकरेंची सभा व्हावी, अशी सर्वच काँग्रेसच्या उमेदवारांची इच्छा आहे. त्यामुळे प्रत्येक उमेदवारांकडून राज ठाकरे यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न होत असल्याची माहिती मिळत आहे.

उत्तर मुंबई मतदारसंघात भाजपचे गोपाळ शेट्टी यांचा पराभव करणे शक्य नसले तरी काँग्रेसच्या उमेदवार उर्मिला मातोंडकर यांचे त्यांना आव्हान आहे. उर्मिला, शेट्टींना टक्कर देत असल्याने काही प्रमाणात या मतदारसंघातील काँग्रेससह सर्वांच्या आशा पल्लवित झालेल्या आहेत. त्यामुळे राज ठाकरे यांची सभा बोरीवली किंवा कांदिवली आदी भागांमध्ये झाल्यास याचा फायदा होण्याची शक्यता आहे.

- Advertisement -

याकरता, उर्मिला मातोंडकर यांनी आपली शाळेतील बालमैत्रिण असलेल्या शर्मिला ठाकरे यांच्याशी संपर्क करून राज ठाकरेंची मनधरणी करत असल्याचे समजते. उर्मिला मातोंडकर यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर मनसेच्या सरचिटणीस शालिनी ठाकरे यांनी त्यांना पत्र पाठवून त्यांना शुभेच्छा दिल्या होत्या. त्यातच उर्मिला, शर्मिला ठाकरेंची मैत्रिण असल्याने तसेच खुद्द राज ठाकरे हे कलाप्रेमी असल्याने त्यांना उत्तर मुंबईत तिसर्‍या सभेची आखणी करावी लागेल, असे बोलले जात आहे. त्यामुळे पत्नीच्या मैत्रिणीसाठी राज ठाकरे हे उत्तर मुंबईत सभा घेतात का, याकडे सर्वांचे लक्ष आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -