घरमुंबईपाच पंचायत समित्यांवर शिवसेना-राष्ट्रवादीचे वर्चस्व

पाच पंचायत समित्यांवर शिवसेना-राष्ट्रवादीचे वर्चस्व

Subscribe

वसई, जव्हारमध्ये सेना-भाजप युतीची सत्ता , तलासरीत सलग 58 वर्षे माकपची सत्ता

पालघर जिल्ह्यातील आठ पंचायत समितीच्या सभापती व उपसभापतीच्या निवडणुकीत शिवसेना-राष्ट्रवादीने पाच पंचायत समितीत बाजी मारली. तलासरीत माकपने सलग 58 वर्षे सत्ता राखण्याची किमया केली आहे, तर वसई आणि जव्हार पंचायत समितीत शिवसेना-भाजप युतीची सत्ता आली आहे. पाच पंचायत समितीमध्ये महिला सभापती तर तीन ठिकाणी महिला उपसभापती विराजमान झाल्या आहेत. विक्रमगड, मोखाडा आणि वसईत दोन्ही पदांवर महिलांना संधी देण्यात आल्याने याठिकाणी खर्‍या अर्थाने महिला राज आले आहे.

शनिवारी जिल्ह्यातील आठ पंचायत समिती सभापती व उपसभापती पदाच्या निवडणुका झाल्या. यात डहाणू आणि वसई वगळयात इतर ठिकाणी बिनविरोध निवडणुका झाल्या. पालघर, डहाणू, वाडा, विक्रमगड व मोखाडा या पाच ठिकाणी शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसच्या सहकार्याने महाविकास आघाडीने सत्ता स्थापन केली, तर जव्हार व वसई येथे शिवसेना व भाजपने युती करीत सत्ता स्थापन केली. तलासरी येथे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे निर्विवाद बहुमत असल्याने त्यांनी सत्ता स्थापन केली. पालघरमध्ये पुन्हा एकदा शिवसेनेने राष्ट्रवादीसोबत सत्ता स्थापन केली. याठिकाणी शिवसेनेच्या रंजना म्हसकर सभापती तर राष्ट्रवादी काँग्रेसचे चेतन पाटील उपसभापती पदावर विराजमान झाले.

- Advertisement -

डहाणू पंचायत समितीच्या सभापतीपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्नेहलता सातवी तर उपसभापती शिवसेनेचे पिंटू गहला निवडून आले. तलासरीत पुन्हा माकपने सत्ता काबिज करीत सलग 58 वर्षे सत्तेत राहण्याचा विक्रम केला आहे. याठिकाणी माकपचे नंदकुमार हाडळ सभापती तर राजेश खरपडे उपसभापती पदावर विराजमान झाले. विक्रमगडमध्ये भाजपची सत्ता उलथवून टाकीत राष्ट्रवादी-शिवसेना महाविकास आघाडीने सत्ता स्थापन केली. सभापतीपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुचिता कोरडा आणि उपसभापती शिवसेनेच्या नम्रता गोवारी विराजमान झाल्या. दोन्ही पदांवर महिलांना संधी दिली गेल्याने खर्‍या अर्थाने विक्रमगड पंचायत समितीत महिलाराज आले आहे.

वाड्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रत्येकी चार सदस्य निवडून आल्याने याठिकाणी महाविकास आघाडीने सत्ता स्थापन केली. सभापतीपदी शिवसेनेचे योगेश गवा तर उपसभापतीपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे जगदीश पाटील बिनविरोध निवडून आले. मोखाडा पंचायत समितीत सहा पैकी पाच जागा जिंकलेल्या शिवसेनेने स्पष्ट बहुमत असतानाही एकच सदस्य असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला सत्तेत वाटा दिला. विशेष म्हणजे दोन्ही पक्षांनी महिलांना संधी दिल्याने याही ठिकाणी खर्‍या अर्थाने महिला राज आले आहे. शिवसेनेच्या सारिका निकम सलग तिसर्‍यांदा सभापतीपदी विराजमान झाल्या आहेत. तर उपसभापतीपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या लक्ष्मी भुसारा यांची निवड झाली आहे.

- Advertisement -

जव्हारमध्ये शिवसेना-भाजप युती झाली. सभापतीपदी भाजपचे सुरेश कोरडा तर उपसभापती शिवसेनेचे चंद्रकांत रंधा निवडून आले. वसईत पंचायत समितीत शिवसेना-भाजप युती होऊन आमदार हितेंद्र ठाकूर यांची सत्ता उलथवून टाकण्यात आली. याठिकाणी शिवसेनेला तीन, बविआला तीन आणि भाजपला दोन जागा मिळाल्या होत्या. त्रिशंकू असलेल्या पंचायतीत भाजपची भूमिका निर्णायक ठरली. बविआला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी शिवसेना-भाजपने हातमिळवणी केली. याठिकाणी शिवसेनेच्या अनुजा पाटील सभापतीपदी तर भाजपच्या वनिता तांडेल उपसभापतीपदी निवडून आल्या. दोन्ही पदे महिलांच्या वाटेला गेल्याने याही ठिकाणी महिला राज आले आहे. विशेष म्हणजे पंचायत समितीत पहिल्यांदाच शिवसेनेने सत्ता मिळवली आहे, तर बविलाला दुसर्‍यांदा सत्ता गमवावी लागली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -