घरमुंबईSion Bridge : सायन पुलाच्या पाडकामाचा मुहूर्त तिसऱ्यांदा पुढे ढकलला

Sion Bridge : सायन पुलाच्या पाडकामाचा मुहूर्त तिसऱ्यांदा पुढे ढकलला

Subscribe

मुंबई : सायन रेल्वे स्थानक येथील ब्रिटिश काळातील 110 वर्षे जुन्या पुलाचे पाडकाम करून नवीन पुलाची उभारणी करण्यात येणार आहे. मात्र त्यासाठी जुन्या पुलाचे पाडकाम करणे आवश्यक आहे. रेल्वे आणि मुंबई महापालिकेने या पुलाच्या पाडकामासाठी मुहूर्त काढला होता. त्यावेळी माहिम येथील जत्रेचे कारण पुढे आले व पाडकाम पुढे ढकलण्यात आले. त्यानंतर 10वी-12वीच्या परीक्षेचे कारण आले आणि पाडकाम दुसऱ्यांदा थांबले. आता पुन्हा तिसऱ्यांदा पाडकाम हाती घेण्यात आले असताना काही तासांपूर्वीच सदर पाडकाम लोकसभा निवडणूक आचारसंहिता असल्याचे कारण देत पुन्हा पुढे ढकलण्यात आले आहे. त्यामुळे आता या पुलाच्या पाडकामासाठी रेल्वे व महापालिका यांना मुहूर्तच मिळत नसल्याने चर्चेला उधाण आले आहे. (Sion bridge demolition schedule postponed for the third time)

हेही वाचा… अटल सेतू भोवती ‘एमएमआरडीए’च्या तिसर्‍या मुंबईला १२४ गावांचा विरोध 

- Advertisement -

निवडणूक आचारसंहिता 4 जूनपर्यंत तरी असणार आहे. पण त्यानंतर पावसाळा सुरू होणार आहे. परिणामी पावसाळ्यात पुलाचे पाडकाम होण्याची शक्यता फारच कमी वाटते. त्यामुळे आता पावसाळा संपल्यानंतरच कदाचित कामाला सुरुवात होईल, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. मध्य रेल्वे मार्गावरील सायन रेल्वे स्थानकाच्या वरील भागात डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग आणि एल.बी.एस. मार्ग यांना जोडण्यात महत्वाची भूमिका बजावणारा सायन पूल हा नागरिकांसाठी, प्रवासी व पादचारी यांसाठी खूपच महत्त्वाचा मानला जातो. या पुलावरून दररोज शेकडो दुचाकी, तीन चाकी, चार चाकी, बसगाड्या, मोठ्या व अवजड वाहनांची वाहतूक मोठ्या प्रमाणात होत असते.

सदर पूल हा ब्रिटिश काळातील जुना पूल असून हा पूल पाडून त्याऐवजी नवीन पुलाची उभारणी करणे गरजेचे झाले. त्यामुळे रेल्वे व महापालिकेने मिळून सदर पुलाचे बांधकाम तोडण्याचा निर्णय घेतला होता. मात्र त्याच सुमारास माहिमच्या जत्रेचे कारण समोर आले असता पुलाचे जुने बांधकाम पाडण्याचे काम पुढे ढकलण्यात आले. त्यानंतर इयत्ता 10वी व 12वीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा असल्याने त्यांची गैरसोय टाळण्यासाठी पुन्हा पुलाचे पाडकाम पुढे ढकलण्यात आले होते. तर आता बुधवारी रात्री पुलाचे पाडकाम करण्याचे नियोजन झालेले असताना आता लोकसभा निवडणूक आचारसंहिता लागू असल्याचे कारण देत पुन्हा तिसऱ्यांदा पुलाचे पाडकाम पुढे ढकलण्यात आले आहे.

- Advertisement -

निवडणूक आचारसंहिता 4 जूनपर्यंत असल्याने व त्यावेळी पावसाळा सुरू होणार असल्याने पावसाळ्यात पुलाचे पाडकाम करणे आणखीन अवघड होणार आहे. परिणामी पावसाळा संपल्यावर म्हणजे वर्षाअखेरच्या टप्प्यात पुलाचे पाडकाम करायला नव्याने मुहूर्त साधावा लागणार आहे. त्यामुळे पुलाचे पाडकाम व्हायला जेवढा उशीर होईल तेवढाच पुलाच्या उभारणीला विलंब होणार आहे. त्याचप्रमाणे दरम्यान जर सदर पुलाबाबत एखादी दुर्घटना घडल्यास त्यास रेल्वे आणि महापालिका प्रशासन यांनाच जबाबदार ठरविले जाण्याची शक्यता नाकारता येणार नाही.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -