मग गुजरात आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्रीही बदलणार का?

ठाण्यातील मृत्यूदर आज ३ टक्क्यापर्यंत रोखण्यात यश आले आहे.

ठाण्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्यामुळे ठाण्याचे पालकमंत्री बदला, असे अकलेचे तारे तोडणारे भाजपचे नेते आशिष शेलार गुजरातचा मृत्यूदर देशात सर्वाधिक असल्यामुळे आणि उत्तर प्रदेशात आकड्यांची लपवाछपवी सुरू असल्यामुळे या दोन राज्यांचे मुख्यमंत्री बदलण्याची मागणी पंतप्रधानांकडे करणार का, असा सणसणीत टोला ठाण्याचे महापौर नरेश म्हस्के यांनी सोमवारी लगावला.

ठाण्यातील मृत्यूदर आज ३ टक्क्यापर्यंत रोखण्यात यश आले आहे. याउलट भाजपची सत्ता असलेल्या पुणे शहरात हा दर ४.२ टक्के आहे, तर गुजरातमध्ये हाच दर तब्बल ६.७ टक्के आहे. भाजप सातत्याने मिरवते ते गुजरात मॉडेल हेच आहे का, असा बोचरा सवालही म्हस्के यांनी केला. गुजरात सरकार कोरोनाच्या चाचण्या करत नाही. सरकारची परवानगी असल्याशिवाय चाचण्या करायच्या नाहीत, असा आदेशच सरकारने काढला आहे. या परवानग्या येण्यासाठी ३ ते ७ दिवस लागतात. शेवटी तेथील हायकोर्टालाही याची दखल घ्यावी लागली. उत्तर प्रदेशची संख्या महाराष्ट्राच्या दुप्पट असूनही तपासणीचा दर महाराष्ट्रापेक्षाही कमी आहे. गुजरात, उत्तर प्रदेशमध्ये आकड्यांची लपवाछपवी सुरू असल्याची टीका वैद्यकीय क्षेत्रातली मंडळीच करत आहेत. उत्तर प्रदेशात तर अधिक तपासण्यांची मागणी करणाऱ्या काही जिल्हाधिकाऱ्यांची राज्याच्या मुख्य सचिवांनी खरडपट्टी काढल्याचे वृत्त असून त्याबाबत टिका करणाऱ्या राज्याच्या निवृत्त आयपीएस अधिकाऱ्याच्या मागे तेथील सरकारने चौकशीचा ससेमिरा लावला आहे. त्यामुळे शेलारांनी त्यांच्या पक्षाचे नेते काय दिवे लावत आहेत, याकडे लक्ष द्यावे, असा सल्लाही म्हस्के यांनी दिला.

ठाण्यात कोरोनाबाधितांवर उपचार करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर आरोग्य सेवेचे बळकटीकरण करण्यात आले आहे. दिवसाला ७०० ते ८०० तपासण्या केल्या जातात. ठाण्यात आजमितीस करोनावरील उपचारासाठी एकूण २९९५ बेड्स उपलब्ध असून त्यापैकी ५५६ बेड्सना ऑक्सिजन पुरवठ्याची सोय आहे, तर आयसीयू बेड्स २१८ आणि ७६ व्हेंटिलेटर्स उपलब्ध आहेत. पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली एक हजार खाटांचे अद्ययावत रुग्णालय उभारण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. मुंब्रा येथे देखील क्रीडा संकुलात एक हजार खाटांचे रुग्णालय उभे करण्याचे काम प्रगतीपथावर आहे. तब्बल ५२ क्वारंटाइन सेंटर्स सुरू करण्यात आली असून तिथे १६६३५ खाटांची क्षमता उपलब्ध आहे. झोपडपट्ट्या आणि दाटीवाटीच्या वस्त्यांमध्ये घरोघरी जाऊन स्क्रीनिंग करण्यात येत असून संशयितांना तातडीने क्वारंटाइन केले जात आहे. ८३ रुग्णवाहिका सेवेत असून स्वत: पालकमंत्री एकनाथ शिंदे सातत्याने ठाणे, नवी मुंबई, अंबरनाथ, बदलापूर, उल्हासनगर, कल्याण असे ठिकठिकाणी भेट देऊन व्यवस्थेचा आढावा घेत आहेत. करोनाबाधित रुग्णांची विचारपूस करण्यासाठी स्वत: पीपीई किट घालून ते सिव्हिल रुग्णालयातील करोना वॉर्डातही गेल्याचे महाराष्ट्राने पाहिले आहे. यानंतर भाजपच्या ठाण्यातल्या नगरसेवकांनीच मला फोन करून पालकमंत्र्यांना काळजी घ्यायला सांगा, अशा शब्दांत चिंता व्यक्त केली होती. आशिष शेलार यांनी घरात बसलेल्या आपल्या आमदारांऐवजी या नगरसेवकांकडून माहिती घेतली असती तर असे अकलेचे तारे तोडले नसते, अशा शब्दांत म्हस्के यांनी शेलार यांच्या टिकेचा खरपूस समाचार घेतला.

भाजपचे नेते डरपोक

पालकमंत्री स्वत:च्या जिवाची पर्वा न करता पीपीई किट घालून करोना वॉर्डात गेल्याचे चित्र उभ्या महाराष्ट्राने पाहिले. पण शेलार पत्रकार परिषदेसाठीही मुंबईतून ठाण्यात यायला तयार नाहीत. ऑनलाइन पत्रकार परिषद घेऊन अकलेचे तारे तोडण्यात ते धन्यता मानत आहेत, अशी टीकाही म्हस्के यांनी केली. राज्य सरकार करोनाचा मुकाबला सर्व शक्तिनिशी करत आहे. सरकारचे मंत्री स्वत:ची पर्वा न करता लोकांमध्ये जाऊन काम करत असल्यामुळेच काही मंत्र्यांनाही कोरोनाची बाधा झाली. भाजपचे नेते मात्र लोकांमध्ये मिसळण्यास घाबरत असून केवळ राजभवनच्या वाऱ्या करण्यात धन्यता मानत असल्याचा टोलाही त्यांनी लगावला.