घरमुंबईअरे देवा! ST महामंडळाकडे ६ वर्षांपासून त्यांच्याच फेसबुक पेजचा पासवर्ड नाही!

अरे देवा! ST महामंडळाकडे ६ वर्षांपासून त्यांच्याच फेसबुक पेजचा पासवर्ड नाही!

Subscribe

एसटी महामंडळाने ६ वर्षांपूर्वी एक फेसबुक पेज तयार केले होते. मात्र, आता त्या पेजचा पासवर्डच महामंडळ विसरले असल्याचा अजब प्रकार समोर आला आहे.

एकीकडे सार्वजनिक वाहतूक विभाग प्रवाशांना उत्तम सेवेसाठी सोशल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणात करताना दिसून येत आहे. मात्र दुसरीकडे राज्यभरात सर्वांत मोठे जाळे असलेले एसटी महामंडळ मात्र अद्याप जणूकाही १६ व्या शतकातच वावरताना दिसून येत आहेत. एसटी महामंडळाने २७ ऑगस्ट २०१३ रोजी अर्थात ६ वर्षांपूर्वी प्रवाशांच्या सोयीसाठी स्वत:चे फेसबुक पेज सुरू केले होते. मात्र, या फेसबुक पेजचा पासवर्डच एसटी महामंडळ विसरल्याची अजब माहिती समोर आली आहे. त्यामुळे एसटी महामंडळाच्या अधिकृत फेसबुक पेजवर गेल्या ५ वर्षांपासून कोणतीही नवीन पोस्ट नाही!

१९ हजार फॉलोअर्स!

महाराष्ट्र स्टेट रोड ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन – एमएसआरटीसी या नावाने हे पेज आहे. राज्यभरात एसटीचा वाढता पसारा पाहता या पेजवर लाईक्स आणि फॉलोअर्सचा भडीमार सुरू झाला. या पेजला तब्बल १९ हजार ५४३ फेसबुक युजर्सने लाईक केले असून, १९ हजार ६४९ युजर्सने ते फॉलो केले आहे. महामंडळाच्या विविध उपक्रमांसह वेगवेगळ्या भागांत सोडण्यात येणार्‍या जादा गाड्यांची माहिती या पेजच्या माध्यमातून हजारो प्रवाशांपर्यंत पोहोचत होती. सुरूवातीच्या काळात प्रवाशांच्या समस्यांनाही या पेजवर प्रतिसाद मिळत होता. मात्र कालांतराने पेजवरील पोस्टच बंद झाल्या.

- Advertisement -

याचं कारण अजब होतं. हे पेज चालवणार्‍या अधिकार्‍याला कामावरुन काढून टाकण्यात आलं होतं. हा अधिकारी एसटीतून गेल्यानंतर या पेजची दखल कोणीच घेतली नाही. महामंडळातील अधिकाऱ्यांनाही या पेजचा विसर पडल्याचे दिसते. या पेजवर शेवटची पोस्ट ३१ ऑक्टोबर २०१५ रोजी केल्याचे निदर्शनास येते. यासंबंधीत एसटी अधिकारी यांना विचारणा केली असता, अधिकारी वर्गाकडून उडवा उडवीची उत्तरं दिली जात आहेत.

एसटीला केव्हा येणार जाग?

एसटीचा सुमारे ९० टक्के कारभार हा महामंडळाच्या वाहतूक विभागामार्फत हाकला जातो. प्रवाशांसाठी चालवण्यात येणार्‍या फेर्‍यांचे नियोजन आणि त्यांच्या तक्रारीची नोंद वाहतूक विभाग घेत असते. परिणामी, संबंधित पेजची जबाबदारी ही वाहतूक विभागाकडेच असल्याची खात्रीलायक माहिती सूत्रांनी दिली आहे. मात्र सुस्तावलेल्या वाहतूक विभागाकडून या पेजकडे दुर्लक्ष होत असल्याने एसटी प्रवाशांना हक्काच्या व्यासपीठापासून वंचित राहावे लागत आहे.

- Advertisement -

मंत्री साहेब दखल घेणार का?

एसटी कर्मचाऱ्यांचा टीकटॉक व्हिडियो सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. अशा परिस्थितीमध्ये तोट्यात चालणाऱ्या एसटी महामंडळाने सोशल मीडियाच्या मदतीने आपल्या विविध योजना आणि उपक्रमांची माहिती प्रवाशांपर्यंत पोहोचवणे गरजेचे आहे. तरीही प्रशासनाच्या उदासीनतेमुळे एवढ्या मोठ्या व्यासपीठावरही एसटीची गाडी रुळावरून घसरल्याचेच दिसते.अशा परिस्थितीत नवनिर्वाचित परिवहन मंत्री आणि महामंडळाचे अध्यक्ष अनिल परब या प्रकरणाची दखल घेणार का? आणि वाहतूक विभागाला यापुढे तरी जाग येणार का? असा प्रश्न प्रवाशांकडून उपस्थित केला जात आहे.

Nitin Binekar
Nitin Binekarhttps://www.mymahanagar.com/author/bnitin/
गेल्या ५ वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सार्वजनिक वाहतूक, शैक्षणिक विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -