घरमुंबईरुग्णालयात रुग्णांना स्वस्त दरातील फळ-भाज्यांचा पुरवठा; स्थायी समितीचा विरोध

रुग्णालयात रुग्णांना स्वस्त दरातील फळ-भाज्यांचा पुरवठा; स्थायी समितीचा विरोध

Subscribe

स्वस्त दरातील फळं-भाज्यांच्या दर्जाबाबत शंका उपस्थित करण्यात आली.

देशभरात गॅस, पेट्रोल, डिझेल, फळे, भाज्या, तेल, धान्य यांचे दर गगनाला भिडले असताना मुंबई महापालिकेच्या रुग्णालयात अवघ्या १० ते १३ रुपये प्रति किलो दराने भाज्या आणि स्वस्त दरात फळांचा पुरवठा करण्याबाबतचा प्रस्ताव मंगळवारी स्थायी समिती बैठकीत मंजुरीसाठी सादर करण्यात आला. त्यावर सर्वपक्षीय सदस्यांनी स्वस्त दरातील फळं-भाज्यांच्या दर्जाबाबत शंका व्यक्त करत सदर प्रस्ताव फेरविचारासाठी परत पाठवण्याचा निर्णय एकमताने घेतला. पालिकेच्या सहा रुग्णालयांमध्ये कंत्राटदारांकडून वर्षभरासाठी स्वस्त दरात फळ व भाज्यांचा पुरवठा केला जाणार आहे. यामध्ये १५.९९ रुपये दराने ३५ हजार किलो कांदे, ५.८४ रुपये दराने ३५ हजार किलो भोपळा, १८ रुपये दराने चार हजार किलो गवार, १३.९५ रुपये दराने पाच हजार किलो फ्लॉवर, ८.९१ रुपये दराने १५ हजार किलो काकडी आदी भाजीपाल्याचा पुरवठा करण्याची तयारी कंत्राटदाराने दर्शवली होती.

या प्रस्तावातील फळं, भाज्यांचे स्वस्त दर पाहता भाजपचे भालचंद्र शिरसाट यांनी आक्षेप घेतला. कंत्राटदार जरी स्वस्त दरात फळं, भाज्यांचा पुरवठा करणार असला तरी एवढा स्वस्त भाजीपाला तो कुठून आणणार आहे? या भाजीपाल्याच्या दर्जाचे काय? असे सवाल त्यांनी यावेळी उपस्थित करीत प्रस्ताव मंजुरीला नकार दिला. यावेळी, भाजपचे सदस्य विद्यार्थी सिंह यांनीही एवढ्या स्वस्त दरात कंत्राटदार फळं, भाज्या यांचा पुरवठा कसे करू शकतो? असा सवाल करत सदर प्रस्ताव परत प्रशासनाकडे परत पाठवण्याची मागणी केली.

- Advertisement -

शिवसेनेच्या सदस्या राजुल पटेल यांनी पालिकेच्या रुग्णालयात बाहेरून देण्यात येणाऱ्या अन्नाचा दर्जा निकृष्ठ असल्याची तक्रार केली. भाजपचे गटनेते प्रभाकर शिंदे यांनी महापालिका रुग्णालयातील रुग्णांना जेवण देण्यासाठी एपीएमसी मार्केटमधून फळं, भाजीपाला खरेदी करण्यात यावा, अशी सूचना केली. स्वस्त दरातील भाज्या, अन्नधान्य यांचा पुरवठा रुग्णालयाला करून रुग्णांच्या जीवाशी खेळ सुरु असल्याचा आरोप शिवसेनेचे संजय घाडी यांनी केला. अखेर सदर प्रस्ताव फेरविचारासाठी प्रशासनाकडे पाठविण्यात आला. यावेळी, पालिका अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी पालिका रुग्णालयांत स्वयंपाकगृहांचे कंत्राट खाजगी एजन्सीला देण्याचा अथवा बाहेरुन जेवण शिजवून देण्याचे कंत्राट दिले जाऊ शकते असे सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -