घरCORONA UPDATEऑनलाईन वर्ग घेताय मुलांचे डोळे सांभाळा; नेत्रतज्ज्ञांचा सल्ला

ऑनलाईन वर्ग घेताय मुलांचे डोळे सांभाळा; नेत्रतज्ज्ञांचा सल्ला

Subscribe

सध्या ऑनलाईन वर्ग महत्वाचे असले तरी दिवसातून दोन ते तीन तास मोबाइलवर चालणारे वर्ग विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने घातक ठरण्याची शक्यता आहे.

कोरोनामुळे देशात लॉकडाऊन केल्याने अनेक शाळांनी ऑनलाईन वर्ग घेण्याला पसंती दिली आहे. सध्या ऑनलाईन वर्ग महत्वाचे असले तरी दिवसातून दोन ते तीन तास मोबाइलवर चालणारे वर्ग विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने घातक ठरण्याची शक्यता आहे. मोबाईल व लॅपटॉपवर चालणाऱ्या ऑनलाईन वर्गामुळे विद्यार्थ्यांच्या डोळ्यांवर ताण पडून डोके दुखणे, चिडचिड होणे, डोळ्यांना संसर्ग होण्याची शक्यता वाढली आहे. त्यामुळे ऑनलाईन वर्ग घेताना विद्यार्थ्यांच्या डोळ्यांची निगा राखण्याची जबाबदारी आता शिक्षक आणि पालकांवर आली आहे.

लॉकडाऊनमुळे विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी शाळांनी विविध एपच्या माध्यमातून ऑनलाईन वर्ग सुरु केले. ऑनलाईन वर्ग दोन तास चालतात. तसेच कोरोनामुळे घरातून बाहेर पडता येत नसल्यामुळे पालक मुलांना मोबाईलवर गेम खेळण्यास तसेच टीव्हीसमोर बसवत आहेत. परिणामी  १० ते १२ तास मुलांचे मोबाईल आणि टीव्हीसमोर जातात. मोबाइलच्या अतिवापराने मुलांच्या डोळ्यावर ताण पडतो. पाच ते सहा तास पुस्तक वाचल्यानंतर डोळ्यांवर येणारा ताण हा एक तास मोबाइल पाहिल्याने येत असतो. मोबाइल पाहताना मुले डोळ्यांची पापणी  हलवत नाहीत. त्यामुळे डोळे लवकर थकतात. परिणामी त्यांना डोके दुखणे, दूरचे कमी दिसणे, चीडचीड होणे, चष्म्याचा नंबर लागणे, डोळ्यांना थकवा येणे, डोळे कोरडे होणे अशा त्रासाला सामोरे जावे लागते. ऑनलाईन वर्ग ही सध्याची गरज असली तरी मुलांच्या डोळ्यांची काळजी घेण्याची जबाबदारी पालक व शिक्षकांवर पडली असल्याचे मत डॉक्टरांकडून वर्तवण्यात येत आहे.

- Advertisement -

लॉकडाऊनच्या काळात मोबाइलवर गेम खेळणे आणि टीव्ही बघण्याचे प्रमाण वाढल्याने विद्यार्थ्यांच्या डोळ्यांवर अधिकच ताण पडत आहे. त्यामुळे अभ्यासाशी संबंधित वेळेपुरताच त्यांना टॅब किंवा मोबाइल वापरण्यास द्यावा. अभ्यासासाठी मोबाइल किंवा टॅब वापरताना प्रत्येक २० मिनिटांनी १० सेकंदाचा ब्रेक घ्यावा. पण तीन तासांपेक्षा जास्त वेळ त्याचा वापर करू नये. सतत मोबाइल, संगणकाच्या स्क्रीनवर बघत राहिल्याने कम्युटर व्हिझ्युअल सिंड्रोम ही समस्या निर्माण होत असल्याची माहिती जसलोक हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरच्या नेत्रतज्ज्ञ डॉ. जान्हवी मेहता यांनी दिली.

अभ्यासासाठी मोबाइल गरजेचा असला तरी पालक व मुलांना मोबइलच्या अतिवापराबाबत शिक्षकांनी माहिती देणे आवश्यक आहे. ऑनलाईन वर्गादरम्यान मुलांनी मोबाइलकडे एकटक पाहू नये यासाठी त्यांना प्रश्न विचारणे, काही गोष्टी करायला लावल्यास त्यांच्या पापण्यांची हालचाल होत राहील. मुलानी अभ्यासासाठी मोबाइल वापरल्यानंतर तितकाच वेळ त्यांनी टीव्ही, मोबाइलपासून दूर ठेवणे गरजेचे असल्याचे नेत्रतज्ज्ञ डॉ. अभय मुंडे यांनी सांगितले.

- Advertisement -

मोबाइल, टीव्हीचा वापर करताना मुले त्याकडे एकटक पाहतात. त्यामुळे ते पापण्यांची हालचाल करत नाहीत. पापण्यांची हालचालीमुळे अश्रू येण्याची प्रक्रिया होत असते. ती थांबल्यास डोळा कोरडा होतो. त्यातून अश्रू येणे थांबते. परिणामी मुलांना डोकं दुखणे, चिडचिड होणे, दूरचे कमी दिसणे यासारख्या समस्या सुरु होतात. – डॉ. अभय मुंडे, नेत्रतज्ज्ञ

काय काळजी घ्याल 

– मोबाइलचा प्रकाश कमी ठेवणे,

– स्क्रीनचे अंतर १ ते दीड फूट लांब असावे

– मोबाइलचा वापर करताना रूममधील दिवे सुरु ठेवावेत

– मोबाइलकडे पाहताना डोळ्यांची उघडझाप करावी

– २० मिनिटांपेक्षा जास्त क्लासचा अवधी असू नये

– क्लासनंतर पाच मिनिटे डोळे बंद करून बसण्याच्या सूचना मुलांना द्याव्यात

– क्लासनंतर डोळे थंड पाण्याने धुवावेत

– पालकांनी मुलांच्या स्क्रीन टाईमवर नियंत्रण ठेवावे

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -