घरमुंबईबेस्ट समितीने ट्रायमॅक्सचा मुदतवाढीचा प्रस्ताव फेटाळला

बेस्ट समितीने ट्रायमॅक्सचा मुदतवाढीचा प्रस्ताव फेटाळला

Subscribe

ट्रायमॅक्स मशिनमुळे बेस्ट प्रशासनाला आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे. बेस्टला हे नुकसान परवडणारे नसल्याने प्रशासनाने आणलेला हा मुदतवाढीचा प्रस्ताव अखेर बेस्ट समितीने फेटाळला आहे.

बेस्ट उपक्रमामध्ये गेले आठ वर्षे तिकीट वाटपासाठी सुरु असलेल्या ट्रायमॅक्स मशिनमुळे आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे. असे नुकसान आर्थिक घाट्यात असलेल्या बेस्टला परवडणारे नसल्याने प्रशासनाने आणलेला मुदतवाढीचा प्रस्ताव बेस्ट समितीने फेटाळला. यावेळी महाव्यवस्थापक बेस्ट समितीविरोधात नगरविकास विभागाकडे जाणार असतील आणि समितीची बदनामी करणार असतील तर महाव्यवस्थापकांवर अविश्वास ठराव आणून त्यांना परत पाठवावे असे आवाहन रवी राजा यांनी केले.

ट्रायमॅक्सला दिली जाते मुदतवाढ

मे. ट्रायमॅक्स आय. टी. इन्फ्रास्ट्रक्चर अँड सर्व्हिसेस या कंपनीला २०१० पासून बेस्टमध्ये तिकीट वितरणाचे कंत्राट देण्यात आले होते. हे कंत्राट तीन वर्षाचे होते नंतर ते पाच वर्षापर्यंत वाढवण्यात आले. २०१६ मध्ये नवीन प्रस्ताव मंजूर करताना ईटीआयएस, मशीन व सर्व्हर बदलण्याची गरज असल्याचे सांगण्यात आले. दोन डेपोमध्ये ४०० मशीन देऊन पायलट प्रोजेक्ट राबवण्यात आला. या दरम्यान तत्कालीन महाव्यवस्थापक जगदीश पाटील यांची बदली झाली. हे कंत्राट देताना गो लाईव्ह प्रोजेक्ट सुरु होई पर्यंत तिकीट वाटप प्रणाली सुरु ठेवावी असे वाक्य नमूद केल्याने ट्रायमॅक्सला मुदतवाढ दिली जात असल्याचा आरोप बेस्ट समिती सदस्य सुनील गणाचार्य यांनी केला.

- Advertisement -

गेल्या दोन वर्षांपासून ट्रायमॅक्सचा प्रकल्प आपल्या ताब्यात घेण्यासाठी प्रशासनाकडून मुदत वाढ मागितली जात आहे. प्रशासनाने ट्रायमॅक्स नको म्हणून पत्र दिले आहे. असे असताना आता मात्र त्याच मशिनला मुदतवाढ देण्याचा प्रस्ताव आणला असल्याने हा प्रस्ताव नामंजूर करावा अशी मागणी गणाचार्य यांनी केली. महाव्यवस्थापक अद्याप अस्तित्वात नसलेल्या सिंगल तिकीटसाठी लागणार्‍या मशीन घेण्यासाठी प्रयत्न करत आहेत. या मशिनमधून बेस्टमध्ये वितरित केली जाणारी ८ रुपयांच्या तिकिटासाठी प्रवासी विसा आणि रुपये कार्ड वापरतील का असा प्रश्न गणाचार्य यांनी केला.

२४९ कोटी रुपयांचे नुकसान

मेट्रो पूर्ण व्हायला दोन ते तीन वर्ष लागणार आहेत. एक तिकीट प्रणालीवर अद्याप काम सुरु आहे. ही प्रणाली अद्याप विकसित झाली नसताना या मशीन विकत घेण्यामागे प्रशासनाचा काय उद्देश आहे हे स्पष्ट करावे अशी मागणी सुहास सामंत यांनी केली. बेस्टमध्ये ट्रायमॅक्सच्या ९५०८ मशीन असून त्यापैकी २६७६ मशीन दुरुस्त करून वापरल्या जात आहेत. तर सात हजार मशीन नादुरुस्त आहेत. ट्रायमॅक्समुळे मे २०१७ पासून २४९ कोटी रुपयांचे नुकसान झाले असल्याचे सामंत म्हणाले. ट्रायमॅक्समुळे बेस्टचा महसूल बुडत असल्याने या नुकसानीची जबाबदारी महाव्यवस्थापकांनी घ्यावी असे आवाहन विरोधी पक्ष नेते रवी राजा यांनी केले. यावर महाव्यस्थापकांनी खुलासा करण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी नगर विकास विभागाकडे जाऊन मंजुरी घ्यावी असे सांगत प्रस्ताव फेटाळण्याची मागणी केली.

तिकिटासाठी सुरु असलेली प्रणाली अचानक बंद करता येणार नाही. उद्या पण ट्रायमॅक्स मशीनद्वारे तिकीट वितरित केले जाईल. उद्याचे काय ते उद्या बघू.

– सुरेंद्रकुमार बागडे, महाव्यवस्थापक, बेस्ट उपक्रम

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -