घरमुंबईकोर्टाच्या इमारतीत बिल्डरचा गळा कापला

कोर्टाच्या इमारतीत बिल्डरचा गळा कापला

Subscribe

न्यायालयात सुनावणीसाठी आलेल्या नरेंद्र पटेल या बांधकाम व्यावसायिकावर न्यायालयातील शौचालयामध्ये दोघा हल्लेखोरांनी चाकूने गळ्यावर वार करून तिथून पलायन केल्याची घटना सोमवार, ३१ डिसेंबरच्या दुपारी घडली.या हल्ल्यात नरेंद्र पटेल हे गंभीर जखमी झाल्याने त्यांना अपोलो हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी घटनास्थळी सापडलेला चाकू जप्त करून हल्लेखोरांचा शोध सुरू केला आहे. या प्रकारामुळे एकच खळबळ माजली असून तत्काळ सीसीटीव्ही यंत्रणा बसवण्यात यावी, अशी मागणी वकील संघटनांकडून होऊ लागली आहे.

सीबीडी येथील न्यायालयामध्ये अज्ञात व्यक्तीकडून सोमवारी, दुपारी नरेंद्र पटेल या बिल्डरवर चाकूने हल्ला करण्याचा प्रकार घडल्याने न्यायालयातील न्यायाधीशांसह, वकील मंडळी, फिर्यादी आणि न्यायालयात तारखेनिमित्त येणार्‍या व्यक्तींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. गेल्या आठवड्यात नागपूर येथील जिल्हा न्यायालयासमोर एका कनिष्ठ वकिलाने वरिष्ठ वकील सदानंद नारनवरे यांच्यावर कुर्‍हाडीने हल्ला करून त्यांची हत्या केली होती. या घटनेपाठोपाठ नवी मुंबईतील सीबीडी येथील न्यायालयामध्ये बिल्डर पटेल यांच्यावर हल्लेखोराने न्यायालयातील शौचालयामध्ये हल्ला करून पलायन केले. त्यामुळे येथील सुरक्षा धोक्यात आली आहे. नरेंद्र पटेल हे सोमवारी दुपारी एका सिव्हील केसच्या सुनावणीसाठी सीबीडी येथील न्यायालयात आले होते. ते पाचव्या मजल्यावरील न्यायालयात हजर होते.

- Advertisement -

सुमारे १२ वाजण्याच्या सुमारास ते त्याच मजल्यावर असलेल्या शौचालयात गेले. याचवेळी त्यांच्या पाठीमागून शौचालयामध्ये घुसलेल्या दोघा अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्या गळ्यावर चाकूने दोन वार केले. पटेल यांनी हल्लेखोरांना पकडण्याचा प्रयत्न केला असता झटापटीमध्ये हल्लेखोरांकडील चाकू तिथेच पडला. त्यानंतर हल्लेखोरांनी पलायन केले. त्यानंतर पटेल यांनी न्यायालयात असलेल्या सहकार्‍याला व्हॉट्सअ‍ॅपवरून व्हिडीओ कॉल लावून बोलावून घेतले. या सहकार्‍याने एनआरआय पोलिसांना या घटनेची माहिती दिली. याबाबत माहिती मिळताच सीबीडी पोलिसांनी जखमी नरेंद्र पटेल यांना हॉस्पिटलमध्ये दाखल केले. दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली असता त्यांना न्यायालयाच्या आवारात एकही सीसीटीव्ही कॅमेरा नसल्याचे निदर्शनास आले. तसेच, हल्लेखोरांना न्यायालयाच्या आवारातून पळून जाताना कुणीच पाहिले नसल्याचेही प्राथमिक तपासात आढळून आले आहे. त्यामुळे आरोपींचा शोध घ्यायचा कसा, असा प्रश्न पोलिसांना पडला आहे. सीबीडी पोलिसांनी दोघा हल्लेखोरांवर कलम ३०७ नुसार गुन्हा दाखल करून त्यांचा शोध सुरू केला आहे. सीबीडी पोलिसांनी पटेल यांचा जबाब नोंदवून घेतला असून त्यात त्यांनी प्रभाकर म्हात्रे आणि लवेश जाधव या दोघांनी त्यांच्या माणसांकडून हा हल्ला घडवून आणल्याचे म्हटले आहे.

नवी मुंबई वकील संघटनेने स्वत: सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याबाबत पुढाकार घेतला होता. तसेच, सीसीटीव्ही यंत्रणेच्या देखभाल दुरुस्तीची जबाबदारी घेण्याचीही तयारी दर्शविली होती. मात्र, त्या अगोदरच हा प्रकार घडल्याने न्यायालयाच्या आवारात तत्काळ सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यासाठी परवानगी मिळावी यासाठी नवी मुंबई वकील संघटना उच्च न्यायालय तसेच जिल्हा न्यायालयाकडे मागणी करणार आहे. तसेच, न्यायाधीश, वकील आणि न्यायालयात येणार्‍या नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने न्यायालयाच्या आवारात फक्त न्यायाधीश, वकील आणि सरकारी अधिकार्‍यांच्या वाहनांनाच प्रवेश देण्यात यावा, अशी मागणीसुद्धा वकील संघटनेकडून करण्यात येणार आहे.
– अ‍ॅड. काशीद, सदस्य, नवी मुंबई वकील संघटना

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -