हॉस्पिटलसाठी विक्रोळीकरांचे अनोखे ऑनलाईन आंदोलन

विक्रोळी कन्नमवार नगरमधील क्रांतीज्योती महात्मा ज्योतिबा फुले हॉस्पिटल सुपर स्पेशालिस्ट बनवण्याचे सांगत मुंबई महापालिकेकडून बंद करण्यात आले.सध्या कन्नमवार नगर कोरोना हॉटस्पॉट ठरत असल्याने विक्रोळीतील नागरिकांनी रविवारी ऑनलाईन आंदोलन करत आपल्या व्यथा प्रशासनासमोर मांडण्याचा प्रयत्न करत हॉस्पिटल तातडीने बांधण्याची मागणी केली.

vikhroli

कोरोनाच्या काळामध्ये जमावबंदीचे आदेश लागू आहेत. त्यामुळे आपल्या मागण्यांसाठी नागरिकांना रस्त्यावर उतरणे शक्य होत नाही. विक्रोळी कन्नमवार नगरमधील क्रांतीज्योती महात्मा ज्योतिबा फुले हॉस्पिटल सुपर स्पेशालिस्ट बनवण्याचे सांगत मुंबई महापालिकेकडून बंद करण्यात आले. परंतु तीन वर्षे उलटली तरी हॉस्पिटलच्या कामाला सुरुवात झाली नाही. त्यातच सध्या कन्नमवार नगर कोरोना हॉटस्पॉट ठरत असल्याने विक्रोळीतील नागरिकांनी रविवारी ऑनलाईन आंदोलन करत आपल्या व्यथा प्रशासनासमोर मांडण्याचा प्रयत्न करत हॉस्पिटल तातडीने बांधण्याची मागणी केली.

विक्रोळीतील कन्नमवार नगरमध्ये असलेले महात्मा ज्योतिबा फुले हॉस्पिटल हे विक्रोळी, कांजूरमार्ग, पवई आणि भांडुपमधील नागरिकांना आरोग्य सेवा पुरवण्यासाठी महत्त्वाचे होते. हॉस्पिटलची काही वर्षांपासून दुरवस्था झाल्याने त्याची डागडुजी करण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत होती. परंतु पालिकेने डागडुजी करण्याऐवजी जुने हॉस्पिटलपाडून त्याजागी नवे सुपरस्पेशालिस्ट हॉस्पिटल उभारण्यात येईल, असे सांगत 2018 मध्ये हॉस्पिटलची इमारत रिकामी केली. हॉस्पिटलमधील काही विभाग हे टागोर नगर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर हॉस्पिटलमध्ये स्थलांतरित केला. तीन वर्षे होऊनही महात्मा फुले हॉस्पिटलचे बांधकाम सुरू करण्यात आलेले नाही. त्यातच सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव कन्नमवार नगरमध्ये मोठ्या प्रमाणात आहे. आतापर्यंत 300 पेक्षा जास्त रुग्ण कन्नमवार नगरमध्ये आढळले असून, कन्नमवार नगर कोरोना हॉटस्पॉट बनले आहे. फुले हॉस्पिटल बंद असल्याने येथील नागरिकांना खासगी हॉस्पिटलमध्ये धाव घ्यावी लागत आहे. परिणामी आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. हे हॉस्पिटल सुरू असते तर कोरोनाच्या संकटात नागरिकांना मोठ्या प्रमाणात मदत झाली असती. त्यामुळे हॉस्पिटलचे काम तातडीने सुरू करावे यासाठी विक्रोळीतील तरुणांनी एकत्र येऊन रविवारी ऑनलाईन आंदोनल करत आपला आवाज पालिकेपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. ट्विटर आणि फेसबुकच्या माध्यमातून आमचे म्हणणे सरकारपर्यत पोहचवण्यासाठी हे आंदोलन पोहचवणार असल्याचे ‘आम्ही विक्रोळीकर’ ग्रुपमधील तरुणांनी सांगितले.

जिवंतपणी हॉस्पिटल पाहायला मिळेल का?

नवीन रुग्णालयामध्ये स्वतंत्र प्रसूती विभाग, क्ष किरण विभाग, सोनोग्राफी विभाग, एमआरआय, सीटी स्कॅन, आयसीयू यासह अनेक अत्याधुनिक सोयीसुविधांनी हे हॉस्पिटल सज्ज असेल असे सांगण्यात आले होते. मात्र जिवंतपणी तरी हे हॉस्पिटल पाहायला मिळेल का अशी खंत विक्रोळीतील वृद्ध नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.