घरमुंबईविकासकाच्या दिरंगाईमुळे ट्रक टर्मिनसचे काम रखडले

विकासकाच्या दिरंगाईमुळे ट्रक टर्मिनसचे काम रखडले

Subscribe

ठाण्यातील पार्किंगची समस्या दिवसेंदिवस वाढतच आहे. रस्त्यांचे रुंदीकरण करूनही अद्याप वाहतूक कोंडी दूर झालेली नाही. सर्व्हिस रोडच्या दुतर्फा असलेल्या गॅरेजचे रस्त्यावरील अतिक्रमण आणि रोजच नवीन भर पडत असलेल्या वाहनांमुळे पार्किंगच्या समस्येने जटील स्वरूप धारण केले आहे. यावर उपाययोजना म्हणून ठाण्यात ट्रक टर्मिनस उभारण्याचा निर्णय ठाणे महानगर पालिकेने घेतला होता. मॉडेला टेक्सटाईल इंडस्ट्रीज कंपनीने दाखल केलेला विकास प्रस्ताव फेब्रुवारी 2016 मध्ये ठामपाकडून मंजूर करण्यात आला आहे. मात्र प्रस्ताव मंजुरीनंतरही हा प्रकल्प अद्यापही रखडलेला आहे. त्यामुळे तीन हात नाक्यापासून मुलुंड चेकनाका आणि वागळे इस्टेट परिसरात अवजड वाहने उभी करण्यात येत आहेत. ही वाहन रस्त्याच्या कडेला दाटीवाटीने उभी केली जात असल्यामुळे ठाणेकरांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे.

याबाबत मॉडेला टेक्सटाईल इंडस्ट्रीज कंपनीने दाखल केलेला विकास प्रस्तावामध्ये मंजूर विकास आराखड्यानुसार 17 हजार 210 चौरस मीटर क्षेत्रफळाच्या वाहनतळाचा समावेश करण्यात आला आहे. मात्र अद्यापही बांधकामाला सुरुवात न झाल्याने नियोजित ट्रक टर्मिनसवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. याप्रकरणी नोव्हेंबर 2016 मध्ये आ.संजय केळकर यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र देऊन प्रकल्पाची कासवगती निदर्शनास आणून दिली होती. त्यानुसार नगरविकास राज्यमंत्री डॉ.रणजित पाटील यांनी या प्रकरणी ठामपाला अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. ठाणे महापालिकेच्या नगररचना विभागाने जून 2017 मध्ये अहवाल सादर करून संबंधित भूखंड ताब्यात घेण्याबाबत पाठपुरावा सुरू असल्याचे उत्तर दिले.

- Advertisement -

विशेष म्हणजे त्यानंतर आतापर्यंत हा भूखंड मिळवण्यात प्रशासनाला अपयश आले आहे. प्रकल्प न्यायालयीन गुंत्यात अडकल्याने तो मार्गी लावण्यात विकासक अपयशी ठरला आहे. जिल्हा प्रशासनामार्फत भूखंड संपादित करणे आणखी वेळकाढूपणाचे ठरेल. 1966 पासून आतापर्यंत जिल्हा प्रशासनाने एकही भूखंड संपादित करून दिलेला नाही.

प्रस्ताव मंजुरीनंतरही विकासकाम सुरू करण्याबाबत विकासक सक्षम नसेल तर हा भूखंड ताब्यात घेण्याबाबत प्रशासनाने चालढकल का केली? ठामपापासून मंत्रालयापर्यंत केलेल्या पाठपुराव्यानंतरही अधिकारी ढिम्म राहिल्याने त्यांच्या भूमिकेबाबत संशय निर्माण झाला आहे. गेल्या अडीच वर्षात पालिका प्रशासनाने सकारात्मक भूमिका घेत प्रकरणास गती दिली असती किंवा पर्याय निर्माण केले असते तर ट्रक टर्मिनसची वाट ठाणेकरांना पहावी लागली नसती
– आमदार संजय केळकर

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -