घरताज्या घडामोडीअंधाराचा गैरफायदा घेत लूटमार करणार्‍या दोनजणांना अटक

अंधाराचा गैरफायदा घेत लूटमार करणार्‍या दोनजणांना अटक

Subscribe

औरंगाबाद रोडवरील नांदूर शिवारातील पाटाच्या रस्त्यावरून दुचाकीने जाणार्‍या दोघा युवकांना चारजणांनी अडवून रोख राकमेसह गळ्यातील चांदीचा गोफ, मोबाईल असा जवळपास २३ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना बुधवारी (दि.९) रात्रीच्या सुमारास घडली होती. आडगाव पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत अवघ्या काही तासात दोनजणांना अटक केली आहे. उपनगर येथील कुणाल प्रेमलाल पटेल (वय २६) व रवी बाळू दिवे (१९) असे अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत.

बुधवारी (दि.९) रात्रीच्या सुमारास रोशन रमेश निमसे आणि त्याचा मित्र आनंद दिघे हे दोघेजण दुचाकी (एमएच १५, बीआर ३७४४) वरून दहावा मैल येथून जत्रा लिंकरोडवरून नांदूर शिवारातील पाटाच्या रस्त्याने जात होते. सुरेश निमसे यांच्या मळ्याजवळ समोरून येणारी रिक्षा (एमएच १५, एके ६४५४) आडवी करून रिक्षातील चारजणांनी रोशन निमसे व आनंद दिघे या दोघांना दमदाटी व शिवीगाळ केली. त्यांच्या खिशातील रोख रक्कम, मोबाईल व गळ्यातील चांदीचा गोफ घेऊन कुणाल पटेल व रवी दिवे फरार झाले.

- Advertisement -

दोघांनी लूटमार केल्याची माहिती पोलिसांना मिळाली. आडगाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक इरफान शेख यांनी गुन्हे शोध पथकाच्या मदतीने व गुप्त माहितीच्या आधारे अवघ्या काही तासात कुणाल पटेल व रवी दिवे या दोघांना गुरुवारी (दि.१०) अटक केली. त्यांच्यासोबत दोघा बालगुन्हेगारांना देखील ताब्यात घेतले असून, त्यांना बालसुधारगृहात पाठवण्यात आले आहे. दोघांकडून १६ हजार रुपये किमतीचे दोन मोबाईल, ५ हजार सातशे रुपये व पंधराशे रुपये किमतीचा चांदीचा गोफ असा एकूण २३ हजार दोनशे रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून, गुन्ह्यात वापरलेली रिक्षा देखील पोलिसांनी जप्त केली. दोघा संशयितांना पोलिसांनी न्यायालयात हजर केले असता १४ डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली. दोघा संशयितांनी ऑगस्ट महिन्यात रवी दिवे याने त्याच्या साथीदारासह रात्रीच्या अंधारात पाटाच्या रस्त्याने जाणार्‍या राजदेव रामदर्शन शर्मा यांना मारहाण करून मोबाईल व ग्राइंडर मशीन चोरीची कबुली दिली असून, हे दोनही मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केले आहेत.

Sushant Kirve
Sushant Kirvehttps://www.mymahanagar.com/author/ksushant/
गेल्या १२ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडियात काम. क्राईम, आरोग्य, साहित्य, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर लिखाण. शहरातील वाहतुकीला शिस्त लागावी आणि जीवघेण्या अपघातांमध्ये घट होण्यासाठी सातत्याने लेखन.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -