Sunday, September 26, 2021
27 C
Mumbai
घर मुंबई फेरीवाल्यांचा उच्छाद आटोक्यात आणावाच लागेल -मुख्यमंत्री

फेरीवाल्यांचा उच्छाद आटोक्यात आणावाच लागेल -मुख्यमंत्री

Related Story

- Advertisement -

ठाणे महापालिकेच्या सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे यांच्यावर अनधिकृत फेरीवाल्याने जीवघेणा हल्ला केला. यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रुग्णालयात उपचार घेणार्‍या पिंपळे यांच्याशी फोनद्वारे संपर्क साधत हल्लेखोर अनधिकृत फेरीवाल्यावर कठोर कारवाईचे आश्वासन दिले होते. आता ठाण्यातील अनधिकृत फेरीवाल्यांवर कठोर कारवाई करण्याची भूमिका उद्धव ठाकरे यांनी घेतली आहे. आता दयामाया नाही, फेरीवाल्यांचा उच्छाद आटोक्यात आणावाच लागेल, असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.

कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या विविध उपक्रमांचे लोकार्पण मंगळवारी करण्यात आले. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजेरी लावली. या कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्र्यांनी अनधिकृत फेरीवाल्यांच्या मु्द्याला हात घातला.

- Advertisement -

फेरीवाल्यांवर बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ठाण्यातील घटनेचा उल्लेख केला. ठाण्यातील घटना लक्षात घेता आता पुढील काळात आपल्याला कठोर कायदा राबवावा लागेल. आता दया-माया, क्षमा दाखवताच येणार नाही. नागरिक, माता-भगिनी आणि कर्मचार्‍यांची सुरक्षा आपल्यावर आहे. आता कुठेही हयगय करून चालणार नाही. केवळ स्कायवॉकच नाही, तर इतरही ठिकाणी फेरीवाल्यांचा उच्छाद असेल तर तो उच्छाद आपल्याला आटोक्यात आणावाच लागेल. आता आपल्याला त्या दिशेने काम करावे लागेल, असे मुख्यमंत्री कार्यक्रमात बोलताना म्हणाले.

राज्यात आज मंदिरे बंद असून विरोधकांकडून मंदिरे उघडण्याची मागणी सातत्याने होत आहे. ही मंदिरे जरी बंद असली तरी अत्यावश्यक असलेली आरोग्याची मंदिरे मात्र आपण उघडत आहोत आणि त्याबद्दल जनता तुम्हाला आशीर्वाद देईल, असे मुख्यमंत्री म्हणाले. राज्यातील धार्मिक स्थळे उघडली गेली पाहिजेत हे ठिक आहे. मात्र, त्यापेक्षा तुमच्या परिसरात आरोग्य केंद्र आहे, आज त्याचीच आवश्यकता आहे, असे केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांना उद्देशून मुख्यमंत्री म्हणाले. आरोग्य केंद्र बंद करून त्याच्या बाजूची मंदिरे कशी उघडायची असे सांगत आपण राज्यातील मंदिरेही उघडणार आहोत. मात्र, टप्प्याटप्प्याने असे मुख्यमंत्री पुढे म्हणाले.

- Advertisement -