घरमुंबईसिटी बजा के बोल....जागतिक शिटी स्पर्धेतील अवलिया!

सिटी बजा के बोल….जागतिक शिटी स्पर्धेतील अवलिया!

Subscribe
शिटी वाजवणे हा टपोरीपणा समजला जातो. मात्र, जपानमध्ये जगभरातील व्हिसलर्सचं ‘वर्ल्ड व्हिसलर्स कन्व्हेन्शन २०१८’ नुकतेच पार पडले. या स्पर्धेत मुंबईकर निखिल राणे या तरुणाने सलग दुसऱ्यांदा भारताला चॅम्पियनशिप मिळवून दिली. हिकीफुकी या प्रकारात त्याला चॅम्पियनशिप मिळाली असून, यात वाद्य वाजवत शिटी वाजवायची असते. दोन वर्षांपूर्वी म्हणजेच २०१६ मध्ये निखिलने ‘वर्ल्ड व्हिसलर्स कन्व्हेन्शन’मध्ये सहभाग नोंदवत भारताला पहिल्यांदा चॅम्पियनशिप मिळवून दिली. विजयाची हीच परंपरा कायम राखत यंदाही निखिलने भारताचे नाव जागतिक पातळीवर पुन्हा उंचावले आहे.
‘वर्ल्ड व्हिसलर्स कन्व्हेंशन’मध्ये इस्राइल, कॅनडा, जपान, चीन, कोरिया, अमेरिका, स्पेन, ऑस्ट्रेलिया, व्हेनेझुएला आदी देशांचा सहभाग होता. सादरीकरणात निखिलने ‘शोले’ या सिनेमातील ‘मेहबूबा मेहबूबा’ हे गाणं शिट्टीतून वाजवले. यावेळी त्याने दरबुका, कहॉन बॉक्स, खंजिरी, पियानिका आणि घुंगरू ही वाद्ये देखील वाजवली. निखिलची शिट्टी वाजवतानाची पद्धत ही मूक अर्थात ‘सायलेंट व्हिसल’ आहे. जगात ‘सायलेंट व्हिसल’ वाजवणारे केवळ दोन कलाकार आहेत. त्यातील एक म्हणजे बॉस्टनचा जेफरी एमॉस आणि दुसरा निखिल राणे.
मुंबईतील ताडदेवचा रहिवासी असलेल्या मध्यमवर्गीय कुटुंबातील निखिलने आपल्या अंगी असलेल्या कलेच्या बळावर संपूर्ण जगाचे लक्ष स्वतःकडे वेधून घेतले. निखिलच्या शिटी वाजवण्याचे वैशिष्ट म्हणजे तो ‘सायलेंट व्हिसल’ वाजवतो. सर्वसाधारणपणे शिटी वाजवण्यासाठी ओठांचा चंबू करावा लागतो. परंतु, निखिल मात्र ओठांची कोणतीही हालचाल न करता कंठातून शिटी वाजवतो.
वयाच्या आठव्या वर्षापासून त्याने शिटी वाजवायला सुरवात केली. त्याचबरोबर पदवी करत असताना त्याने शास्त्रीय संगीताचेदेखिल शिक्षण घेतले. संगीताची आवड असल्यामुळे त्याने आपल्या शिटीला सुरांची साथ दिली. पाच वर्षे त्याने शास्त्रीय संगीताचे देखील शिक्षण घेतले. घरची परिस्थितीत बेताची असल्यामुळे त्याने कॉलेज शिक्षणाबरोबर अनेक ठिकाणी संगीताचे कार्यक्रमही केले आहेत. यातून मिळणाऱ्या मानधनातून तो स्वतःचा खर्च भागवतो. निखिल आरजे म्हणूनही काम करतो.
भारतात शिटी वाजवण्याच्या कलेला परफॉर्मिंग आर्टचा दर्जा मिळावा, यासाठी माझ्यासारख्या व्हिसलर्सचे प्रयत्न सुरू असल्याचे निखिलने सांगितले. अनेक कलाकारांना कलेच्या मुख्य प्रवाहात आणायचे असून, या कला प्रकाराला भारतात मानाचे स्थान मिळावे, असा प्रयत्न करत असल्याचेही निखिलने यावेळी नमूद केले. माझं यश माझ्या कुटुंबियांना आणि भारतीय तिरंग्याला समर्पित असल्याचेही तो अभिमानाने यावेळी म्हणाला.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -