घरमुंबईकोस्टल रोडवरून वरळी कोळीवाड्यात संताप

कोस्टल रोडवरून वरळी कोळीवाड्यात संताप

Subscribe

सागरी किनारा रस्ता प्रकल्पाला (कोस्टल रोड) वरळी कोळीवाड्यातील बांधवांनी विरोध केल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भेट देवून त्यांचे म्हणणे ऐकून घेतले. राज ठाकरेंच्या भेटीनंतर कोळीबांधव आक्रमक झाले आहेत. त्यामुळे कोळीबांधव सेनेच्या विरोधात उभे राहतील याच भीतीने मंगळवारी महापौरांसह महापालिकेतील सेनेच्या नेत्यांनीही थेट वरळी कोळीवाड्याला भेट दिली. प्रकल्पामुळे बाधित होणार्‍या जागेची पाहणी करून तेथील लोकांचे म्हणणे ऐकून घेतले. परंतु यानंतरही कोळी बांधवांचे समाधान झालेले नाही. त्यांचा विरोध मात्र कायमच आहे.

कोस्टल रोडच्या कामाचे भूमिपूजन रविवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याहस्ते झाले. मुख्यमंत्र्यांना डावलून केलेल्या या सोहळ्यावर भाजपने बहिष्कार घातला होता. मात्र, कोस्टल रोडमुळे कोळीबांधवांचे नुकसान होणार असल्याने वरळी कोळीवाड्यातील बांधवांनी आता या प्रकल्पाविरोधात कंबर कसली आहे. कोळीवाड्यातील कोळी बांधवांच्या प्रतिनिधींना घेवून खासदार अरविंद सावंत, आमदार सुनील शिंदे आणि उपमहापौर हेमांगी वरळीकर यांच्यासह आयुक्तांसोबत बैठक घेतली. यावेळी कोळीवाड्यात कोस्टल रोडचे सादरीकरण केले जाईल, असे आश्वासन आयुक्तांनी कोळीबांधवांना दिले होते.

- Advertisement -

त्यानंतर रविवारी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रविवारी कोळीवाड्याला जावून भेट दिली, तेथील लोकांची बाजू ऐकून घेतली. त्यावेळी कोळीबांधव मनसेसोबत गेल्यामुळे उद्धव ठाकरे प्रचंड अस्वस्थ झाले. आमदार शिंदे आणि उपमहापौर वरळीकर यांना कोळीबांधवांना विश्वासात घेता आले नाही, त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी या दोन्ही नेत्यांबद्दल नाराजी व्यक्त केली. त्यातच सोमवारी मनसेच्या शिष्टमंडळासोबत वरळी कोळीवाड्यातील प्रतिनिधींची बैठक पार पडली. कोस्टल रोडच्या मुद्यावरून कोळीबांधव सेनेच्या विरोधात जावून मनसेसोबत जात असल्याने पक्षप्रमुखांनी महापालिकेतील नेत्यांची कानउघडणी केली. त्यानंतर मंगळवारी महापौर, उपमहापौरांसह सभागृह नेत्या विशाखा राऊत, स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव आदींनी कोळीवाड्याला भेट देवून तेथील लोकांचे म्हणणे ऐकून घेतले.

सेनेच्या या नेत्यांसह प्रकल्प राबवणारे महापालिकेचे अधिकारी आणि तांत्रिक अधिकारी उपस्थित होते. परंतु त्यांच्या उपस्थितीतही महापौरांसह सेनेच्या नेत्यांना कोळीबांधवांना ठोस लेखी आश्वासन देता आले नाही. त्यामुळे कोळीबांधवांचा विरोध कायमच आहे. या शिष्टमंडळांच्या पाहणीनंतरही कोळी बांधवांचे समाधान झालेले नाही. नुकसान भरपाईबाबत लेखी आश्वासन दिले जावे अशी मागणी कोळी बांधवांची आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -