घरनवी मुंबईवरुणराजा बरसला, मोरबे (Dam overflow) धरण १०० टक्के भरले!

वरुणराजा बरसला, मोरबे (Dam overflow) धरण १०० टक्के भरले!

Subscribe

नवी मुंबईकरांची पाण्याची चिंता मिटली; पाण्याचा विसर्ग सुरु

नवी मुंबई/चौक – रायगड जिल्हयातील खालापूरजनीक असणारे आणि नवी मुंबई शहराला पाणी पुरवठा करणारे मोरबे धरण यंदा १०० टक्के भरले आहे. मोरबे पुर्ण (Morbe Dam overflow) क्षमतेने भरल्याने धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आल्याची माहिती पालिकेच्या अधिकार्‍यांनी दिली. त्यामुळे नवी मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे. तर पेणसह नवी मुंबईतील सिडको वसाहतींना पाणी पुरवठा करणारे सिडकोच्या मालकीचे हेटवणे धरण ९५ टक्के भरले (Hetwane Dam is 95% full) आहे. हेटवणे धरण कधी भरणार याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

मोरबे धरण पुर्ण भरल्याने पाण्याचा विसर्ग सुरु करण्याचा निर्णय पालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने घेतला. रविवारी २४ सप्टेंबर रोजी रात्री १.३० वाजल्यापासून धरणातून ६७५ क्युसेकने पाण्याचा विसर्ग करण्यात आला. रात्री धरणाचे दोन दरवाजे १५ सेंमीने उघडण्यात आले. यावेळी चौक गावचे माजी सरपंच सचिन मते आणि पालिकेचे उप अभियंता वसंत पडघन, कनिष्ठ अभियंता मोरे यांच्यासह पाणी पुरवठा कर्मचारी उपस्थित होते.

- Advertisement -

एप्रिल महिन्यात मोरबे धरणातील पाण्याचा साठा लक्षात घेता आठही नोडमध्ये पालिकेने आठवडयातून विभागवार एक दिवस संध्याकाळचा पाणी पुरवठा बंद ठेवला होता. मोरबे धरण परिसरात पाऊस सुरु न झाल्याने जून महिन्यातील पहिले २३ दिवस कोरडेच गेल्यामुळे नवी मुंबईकरांची चिंता वाढली होती. मात्र जुलै, ऑगस्ट महिन्याचा पंधरवडा आणि सप्टेंबर महिन्यात पावसाने जोरदार हजेरी लावल्याने मोरबे धरण भरले आहे. धरणातील जलसाठयाने ८८ मीटर इतकी सर्वोच्च पातळी गाठली आहे. मोरबे धरण प्रकल्प क्षेत्रात यावर्षी आजतागायत ३५४९ मि.मी. पावसाची नोंद झाली असून सद्यस्थितीत १९०.८९० द.ल.घ.मी.जलसाठा उपलब्ध होऊन मोरबे धरण पूर्ण भरून वाहू लागल्याने नवी मुंबई जलसमृध्द झाली आहे. मोरबे धरणाचे दरवाजे १५ सेंमीने उघडण्यात आले आहेत. ६७५ क्युसेक इतका पाण्याचा विसर्ग करण्यात आला.

गणेशो उत्सवाची नवी मुंबईकरांना मिळालेली ही भेट आहे. मोरबे धरण पूर्ण क्षमतेने भरणे ही नवी मुंबईकर नागरिकांच्या दृष्टीने आनंदाची आणि समाधानाची बाब आहे. आपण जलसमृध्द असलो तरी पाण्याचे महत्व ओळखून त्याचा योग्य प्रमाणात वापर करण्याचे आवाहन नागरिकांना आहे.
-राजेश नार्वेकर, नमुंमपा-आयुक्त

  • नजीकच्या गावांना सतर्कतेचा इशारा
    मोरबे धरणाचे मध्यरात्री दोन्ही दरवाजे १५ सेंमीने उघडण्यात आले. त्यामुळे धावरी नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. कुणीही नदी काठावर जाऊ नये अशा सूचना प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत. धरण क्षेत्रात पावसाचा जोर कायम राहिल्यास आणखी विसर्ग करण्यात येईल, अशी माहिती अधिकार्‍यांनी दिली आहे.
  • हेटवणे धरण ९५ टक्के भरले
    हेटवणे धरणातून पेणसह नवी मुंबईतील सिडको क्षेत्रातील खारघर, उलवे, तळोजा, द्रोणागिरी, जेएनपीटी बंदर, दिघोडे एमआयडीसी या परिसरास सिडकोकडून पाणी पुरवठा करण्यात येतो.सिडकोच्या मालकीचे हेटवणेे धरण ९५ टक्के भरले आहे. त्यामुळे सिडको वसाहतींना काही अंशी दिलासा मिळाला आहे. मागील वर्षी ऑगस्ट महिन्यात धरण पुर्णत: भरले होते. मात्र यंदा धरणाने अद्याप काठ गाठला नाही. धरण क्षेत्रात पावसाचा जोर वाढल्यास धरण भरल्यानंतर दरवाजे उघडण्यात येतील, अशी माहिती उपविभागीय अभियंता आकाश ठोंबरे यांनी दिली.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -