घरनवरात्रौत्सव 2022नाशिकचे ग्रामदैवत श्री कालिका देवी

नाशिकचे ग्रामदैवत श्री कालिका देवी

Subscribe

४४ वर्षांपूर्वी कात टाकून नव्या रुपात पदार्पण केलेले कालिकेचे मंदिर नाशिकचे आकर्षण

ग्रामदैवत असलेल्या कालिका मातेचा नवरात्रोत्सव सरकारी नियमांचे पालन करीत साजरा होत आहे. नाशिकच्या जुन्या आग्रारोड नजीक असलेले ४४ वर्षांपूर्वी कात टाकून नव्या रुपात पदार्पण केलेले कालिकेचे मंदिर म्हणजे नाशिकच्या वैभवातील एक मानाचे पान आहे. या देवस्थानाचा जीर्णोद्धार पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी इ. स. १७०५ च्या सुमारास केला. त्यांनी बांधलेले दगडी मंदिर दहा बाय दहा फूट लांबीचे व पंधरा फूट उंचीचे होते. त्या जवळच एक बारव होती, असे जुनी माणसे सांगतात. स्वातंत्र्यपूर्व काळात लोकमान्य टिळकांच्या स्वराज्याच्या चळवळीपासून नवरात्रात देवीची यात्रा भरू लागली. गावातील मंडळी सीमोल्लंघनासाठी कालिकामाता मंदिरापर्यंत येऊ लागली. तेव्हापासून देवी मंदिर परिसराला यात्रेचे स्वरूप येऊ लागले. त्यावेळी कालिकेच्या मंदिराचा आतला भाग अतिशय लहान होता. बाहेरचा सभा मंडपही पत्र्याचा व लहान असल्यामुळे यात्रेच्यावेळी भाविकांना दर्शन घेताना अत्यंत अडचण होई. त्यामुळे मंदिराच्या विस्ताराची मागणी पुढे आली. जनतेचे सहकार्य व मदत घेऊन तत्कालीन नगराध्यक्ष डॉ. वसंतराव गुप्ते यांनी २० डिसेंबर १९७४ रोजी मंदिराच्या जीर्णोद्धाराचे भूमिपूजन केले. त्यानंतर बरोबर सहा वर्षांनी १९८० साली हल्ली आग्रारोडवर दिमाखात उभे असलेले श्रीकालिका देवीचे कलाकुसरीने नटलेले विशाल मंदिर व सभामंडप तयार झाले. या मंदिराचा गाभारा अठरा बाय अठरा फुटांचा तर शिखर ३० फूट उंच आहे. गाभार्‍यापुढचा सभामंडप ४० बाय ६० फूट एवढा मोठा आहे. आता तर मंदिराला दोन्ही बाजूंना भव्य प्रवेशदारे आणि संपूर्ण परिसराला फरशी लावण्यात आली आहे. नवरात्रात आणि वर्षभर मंदिर परिसरावर क्लोजसर्किट सीसी टीव्हीद्वारे नियंत्रण ठेवले जाते. मंदिराचा गाभाराही चांदीच्या कलाकुसरयुक्त पत्र्याने सुशोभित करण्यात आला आहे.गाभार्‍यात उंच ओट्यावर महालक्ष्मी, महासरस्वती, महाकाली यांच्या मूर्ती आहेत. पूर्वी या ठिकाणी फक्त कालिकेची शेंदूरचर्चित मूर्ती होती पण तिचे कवच काढून हल्लीची नयनमनोहर मूर्ती तयार करून घेण्यात आली आहे. येथे श्रीकालिका माता कुमारिकेच्या स्वरूपांत आहे. तिचे स्वरूप चंडिकेसारखे उग्र नसून एखाद्या लहान बालिकेसारखे अतिशय लोभस आणि सात्विक आहे. देवीच्या मागे नऊ फण्यांचा शेषनाग दिसतो आहे. तिच्या पायाखाली तीन राक्षसांची मुंडकी आहेत. त्यावर कालिकादेवी उभी आहे. तिच्या उजव्या बाजूंच्या हातांत त्रिशूल व तलवार तर डाव्या बाजूंच्या हातांत डमरू व खडग आहे. तसेच कमंडलू सारखे भांडे देखील आहे.

 

राजस्थानातील जयपूरला घडल्या मूर्ती
सुरुवातीला हे फक्त कालिका मातेचे मंदिर होते. कालांतराने तिवारी, मेहेर, वाजे या देवीभक्तांनी महालक्ष्मी व महासरस्वती यांच्या मूर्ती मंदिराला भेट दिल्या. त्यानंतर थेट जयपूरहून देवींच्या तिन्ही मूर्ती तयार करून, त्यांची यथासांग प्राणप्रतिष्ठा करण्यात आली आहे.

Prashant Suryawanshi
Prashant Suryawanshihttps://www.mymahanagar.com/author/sprashant/
गेल्या १६ वर्षांपासून नाशिकमध्ये प्रिंट आणि डिजिटल मीडियात काम. तंत्रज्ञानातील बदल, पर्यावरण, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर विपुल लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -