Dussehra 2021: दसऱ्याचे महत्त्व काय? जाणून घ्या शुभ मुहूर्त, पूजा विधी

यादिवशी दुर्गादेवीने महिषासुर नावाच्या राक्षसाचा देखील वध केला होता

शारदीय नवरात्र उत्सव संपल्यानंतर दहाव्या दिवशी दसरा साजरा केला जातो. दरवर्षी अश्विन महिन्याच्या विजया दशमीच्या मुहूर्तावर दसरा साजरा केला जातो. यंदा नवरात्र केवळ आठ दिवसांची आहे त्यामुळे यंदा नवव्या दिवशी दसरा आहे. म्हणजेच १५ ऑक्टोबर रोजी दसरा साजरा केला जाणार आहे. धर्मिक कथांच्या आधारे भगवान श्री रामाने यादिवशी रावणाचा वध केला होता. त्याचप्रमाणे यादिवशी दुर्गादेवीने महिषासुर नावाच्या राक्षसाचा देखील वध केला होता. त्यामुळे दसऱ्याच्या दिवशी वाईट काळ संपून नव्या पर्वाला सुरुवात झाली असे म्हटले जाते.

दसऱ्याचा मुहूर्त

हिंदू पंचांगानुसार, अश्विन महिन्याच्या दशमीच्या तिथीला म्हणजेच १४ ऑक्टोबरला संध्याकाळी ६:५२ ते १५ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी ६:०२ वाजेपर्यंत दशमी साजरी केली जाणार आहे. दसऱ्याचा मुहूर्त १५ ऑक्टोबर दुपारी  १:३८ पासून संपूर्ण दिवस दसरा साजरा करता येणार आहे. या काळात सर्व शुभ कामे केली जातात.

दसऱ्याची विधी

दसरा सणाला विजयादशमी असे देखील म्हटले जाते. या दिवशी भगवान श्री राम, दुर्गा देवी, सरस्वती देवी, गणपती आणि हनुमानाची पूजा केली जाते. घटस्थापना करताना पेरलेले धान्य दसऱ्यापर्यंत उगवते. गायीच्या शेणाचे दहा गोळे तयार केले जातात आणि त्यात ते धान्य लावले जाते. त्यानंतर दिवा आणि धूप पेटवून देवाची पूजा केली जाते.

तर काही ठिकाणी पाटीवर सरस्वती देवीची प्रतिमा काढून समोर घरातील धान्य किंवा पैसे सोन ठेवून त्याची पूजा केली जाते. त्याचप्रमाणे आपट्यांच्या पानांची देखील दसऱ्यादिवशी पूजा केली दाते.

दसऱ्याचे महत्त्व काय?

दसऱ्याच्या दिवशी दहामुखी रावणाचा भगवान श्री रामाने वध केला होता. त्यांचे हे युद्ध नऊ दिवस सुरू होते. दहाव्या दिवशी रामाने रावणावर विजय मिळवला आणि रावणाच्या ताब्यात असलेल्या सीतादेवीला मुक्त केले. असे म्हटले जाते की रामाने युद्धाला जाण्याआधी दुर्गादेवीचे दर्शन घेतले होते. देवीने प्रसन्न होऊन रामाला विजयी होऊन येण्याचे वरदान दिले होते. तसेच या दिवशी देवीने महिषासुर नावाच्या राक्षसाचा वध करुन पृथ्वीवरील मनुष्याचा होणारा छळ थांबवला होता. त्याचे युद्ध देखील नऊ दिवस सुरू होते. दहाव्या दिवशी देवीने महिषासुराचा वध केला. दशमीच्या दिवशी वाईट गोष्टींवर विजय मिळवला म्हणून या दिवसाला दसरा किंवा विजयदशमी असे म्हणतात.


हेही वाचा – Navratri 2021 Kanya pujan: अष्टमीच्या दिवशी का केले जाते कन्यापूजन? जाणून घ्या महत्त्व, विधी आणि मुहूर्त